अहमदनगर9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जुन्या पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ग्रामीण विकासाचे कामकाज करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तब्बल १४ हजार २२८ कर्मचारी संपावर गेल्याने दिवसभर कामकाज ठप्प राहिले. केवळ वरिष्ठ अधिकारीच कार्यालयात होते.
जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी मंगळवारी सकाळीच जिल्हा परिषदेसमोर जमले होते, ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशा टोप्या घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच निदर्शने झाली. त्यानंतर वाहनतळ आवारात मंडप उभारून त्यात ठाण मांडले होते. मोठ्या संख्येने महिला कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एखाद्या कर्मचाऱ्याने कामावर जाण्याचा प्रयत्न केला, तर गद्दार, गद्दार अशा घोषणाही दिल्या जात होत्या. त्यामुळे कार्यालयांत शुकशुकाटच होता.
जिल्हा परिषद मुख्यालयात ३७८ कर्मचारी असून ४९ रजेवर आहेत, ३१ जणांनी काम केले, तर २९७ जण संपात सहभागी झाले. ग्रामीण भागातील १५ ह जार ६१५ कर्मचाऱ्यांपैकी २६९ रजेवर होते, तर कार्यालयात १ हजार ११८ जणांनी काम केले. संपात १४ हजार २२८ कर्मचारी सहभागी झाले.
ही कामे झाले ठप्प
प्रशासनात मार्चअखेरची लगबग सुरू असल्याने बिले मंजुरी, विकासकामांवर खर्च करणे यासह तांत्रिक कामे सुरू आहेत. तसेच २०२३-२०२४ चे वार्षीक अंदाजपत्रक तयार करण्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. अशातच कर्मचारी संपावर गेल्याने प्रशासकीय सर्वच कामे तूर्तास थांबली आहेत.
शाळा उघडल्याच नाही
जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवण्यासाठी अंगणवाडीसेविका तसेच इतर उपलब्ध शिक्षकांना शाळेवर पाठवण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तथापि, जिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्यासाठीही कोणी गेले नाही. खासगी अनुदानीत शाळाही बंदच होत्या.