writer pg wodehouse viewpoint impact on author rajiv vaidya zws 70 | माझा ‘वूडहौशी’ दृष्टिकोन!राजीव वैद्य [email protected]

Advertisement

इंग्रजी साहित्यातले सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि पु. ल. देशपांडे यांचं प्रेरणास्थान असलेले पी. जी. वूडहाउस म्हणजे माझं आराध्य दैवत. आपल्या नर्मविनोदी शैलीतल्या लेखनातून जीवनाकडे खेळकर वृत्तीनं पाहण्याची त्यांची विनोदबुद्धी मला फारच आवडली आणि पटली. आणि म्हणूनच माझ्या आयुष्याचा प्रवास एक आनंदयात्रा होण्यासाठी ‘वूडहाऊस’ शैलीचा दृष्टिकोन मी जाणीवपूर्वक मनात रुजवला, जोपासला आणि वाढवला.

पी. जी. वूडहाउस यांच्यावर भाष्य करणारं एक मर्मग्राही विधान आहे-  In life you have a choice-  live in the real world or live in the world of Wodehouse! हे विधान माझ्या जगण्याचा मूलमंत्र बनलं. या लेखकानं लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पात्रांच्या जीवनात येणाऱ्या व्यक्ती, प्रसंग, घटना यांच्यामधला विनोद शोधत कथानकाला हलकंफुलकं स्वरूप दिलं आहे. तसेच सुखदु:खाचे, ताणतणावाचे, यशापयशाचे प्रसंग माझ्याही आयुष्यात आले, पण ध्येयानं प्रेरित झालेल्या माझ्या जगण्याला वूडहाउसनं लिहिलेल्या गोष्टींसारखंच मी मानलं. त्यातलं गांभीर्य जाणलं, पण दुखऱ्या जागांवर ‘लाइटली’, विनोदबुद्धीनं बघत फुंकर घातली आणि आनंदी आयुष्य जगलो. यालाच मी ‘वूडहौशी’ दृष्टिकोन म्हणतो.  मध्य प्रदेशमधल्या एका लहानशा गावात मिशनऱ्यांनी चालवलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मी शिकलो. वडील स्थानिक सरकारी महाविद्यालयात अध्यापक असल्यामुळे शिक्षणाला, ज्ञानार्जनाला घरातून प्रोत्साहन तर होतंच, त्याखेरीज वडिलांना वाचनाची खूप आवड असल्यानं घरातच एक छोटेखानी वाचनालयही तयार झालं होतं. साहजिकच लहानपणापासूनच पुस्तकं वाचण्याचा नाद मला लागला. अभ्यासातही माझी उत्तम गती होती. वयाच्या बाराव्या वर्षी मात्र मला एक मानसिक धक्का जाणवला. वडिलांची अचानक दुसऱ्या गावी बदली झाल्यामुळे आणि तिथे इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्यामुळे मला शाळेच्या वसतिगृहात राहावं लागलं. कोवळय़ा वयात घरापासून, विशेषत: आईपासून दूर राहावं लागल्यानं मी खूपच हळवा झालो होतो. हॉस्टेलच्या मेसमधलं निकृष्ट दर्जाचं आणि तेही अपुरं अन्न खाताना मला आईनं प्रेमानं खाऊ घातलेल्या पदार्थाची आठवण येऊन अक्षरश: रडू यायचं. कोळसा खाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बरीच मुलं माझ्याबरोबर शिकत होती. त्या निम्नस्तरीय, गरीब वर्गातल्या मुलांचं जीवन मला खूप जवळून बघायला मिळालं. अर्धपोटी राहूनदेखील जिद्दीनं, मन लावून अभ्यास करणाऱ्या मुलांचा तो सहवास माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरला. ‘मेसमध्ये मिळणाऱ्या खिचडीतले दगड हसत हसत गिळण्याची सवय झाली की खिचडी चविष्ट लागते,’ ही मला आलेली समज कदाचित माझ्या ‘वूडहौशी’ दृष्टिकोनाचाच परिणाम असावा.

Advertisement

शाळेत शिकताना विज्ञान आणि गणित विषयांमध्ये मला विशेष रुची होती, त्यामुळे विज्ञान क्षेत्रातच चांगलं करिअर करण्याची ध्येयासक्ती बाळगून मी ‘आय.आय.टी.’च्या परीक्षेची तयारी करू लागलो. रात्रंदिवस जीव तोडून, एकाग्रतेनं मेहनत केली आणि इंजिनीअिरगच्या अतिशय कठीण परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झालो. माझा आत्मविश्वास दुणावला. कानपूर ‘आय.आय.टी.’मध्ये मला प्रवेश मिळाला, तेव्हा ‘आनंद गगनात मावेना’चा खरा अर्थ मी अनुभवला. पण प्रत्यक्षात कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तो आनंद काही काळच टिकला! अत्यंत कठीण अभ्यासक्रम आणि बरोबरचे एकाहून एक बुद्धिमान विद्यार्थी बघून माझं धाबंच दणाणलं. आपला इथे निभाव लागणं कठीण आहे, असं वाटण्याआधीच ‘वूडहौशी’ भविष्यवाणी मात्र सांगून गेली, ‘प्रयत्न तर करून पाहा, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली!’ आणि काय सांगू, पाच वर्षांचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे पूर्ण करून मी इंजिनीयर झालोसुद्धा!  त्यानंतर माझ्या कर्तृत्वाची खरी कसोटी होती. आयुष्याला दिशा देणारं सर्वात आव्हानात्मक वळण! या वळणावर मला मिळालेल्या उच्च तांत्रिक शिक्षणाचा उपयोग देशासाठी व्हावा, अशी एक जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना मनात उफाळून आली आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच चालून आलेल्या संधीचा लाभ घेत भारतीय नौदलात ‘मरीन इंजिनीयर’च्या पदावर ‘नौदल अधिकारी’ म्हणून मी रुजू झालो. नौदल सेवेसाठी आवश्यक असलेलं खडतर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण घेताना शारीरिक क्षमतेबरोबरच, कणखर मानसिकतेचीही कसोटी लागते. पुन्हा एकदा माझा ‘वूडहौशी’ दृष्टिकोन माझ्या मदतीस धावून आला आणि हसतखेळत मी हे प्रशिक्षण पूर्ण केलं. भारतीय नौदलातला माझा कार्यकाळ माझ्या संपूर्ण करिअरमधला सुवर्णकाळ होता. एक कर्तबगार, कार्यक्षम मरीन इंजिनीयर अधिकारी म्हणून मी नाव कमावलं. याच दरम्यान मला माझ्या आयुष्याची सहचरी मिळाली आणि यथावकाश दोन मुलींचा बाप झालो. मला मिळालेल्या उच्च तांत्रिक शिक्षणाचं सार्थक झालं, या भावनेनंच कृतकृत्य होऊन मी नौदलातून निवृत्त झालो.

नौदलातून निवृत्त झाल्यानंतर काही काळ मी कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. या काळात उत्तर प्रदेशातल्या राजकीयदृष्टय़ा अशांत आणि अस्थिर अशा दुर्गम ग्रामीण भागात प्रोजेक्टच्या कामानिमित्तानं मला वारंवार जावं लागलं. तिथे स्थानिक राज्यकर्त्यांची ढवळाढवळ, सामाजिक क्षेत्रातला भ्रष्टाचार हा माझ्यासाठी सर्वस्वी वेगळा अनुभव होता. पण नौदलाच्या सेवेतून आलेली लष्करी शिस्त, आजवर जपलेल्या मूल्यांशी तडजोड न करण्याचा निश्चय आणि अर्थातच ताणतणावाच्या प्रसंगांत सदैव मदतीस येणारा ‘वूडहौशी’ मंत्र या तिघांच्या जोरावर मी इथेही यशस्वी झालो. असा हा माझा जगण्याचा प्रवास. रोमहर्षक आणि माणूस म्हणून सर्वार्थानं समृद्ध करणारा. आयुष्याच्या या निवांत टप्प्यावर मागे वळून पाहताना लक्षात येतं, की जीवनात ताणतणावाचे, शारीरिक-मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग आले, पण प्रत्येक वेळी त्यातून तरून गेलो. खरंच, आपल्या आनंदप्राप्तीसाठी ध्येयाची गरज जशी असते, तशीच खेळकर, दिलखुलास वृत्ती जोपासण्याचीसुद्धा! म्हणूनच पुन्हा एकदा माझा मंत्र जपतो- ‘ Live in the world of Wodehousel.

Advertisement

Source link

Advertisement