शिक्षणाच्या आईचा घो – रचनेत नव्हे पद्धतीत नावीन्य हवे

Indian Education System
Image Source: Google Images

अनेक विषयांवर सध्या चर्चा चालू आहे त्यात बहुतांशी निरर्थक आहे किंवा सामान्यतः आपल्या आयुष्याला उपयोगी पडेल अशी काही दिसत नाही. जसं की कंगना आणि सुशांत केस, यामध्ये सुशांत सोडून आता सगळे काही दिसतेय.

महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलावं अस म्हटलं तर त्यात राजकारण आहे की फक्त सत्ताकारण? एकमेकाचा वचपा, विरोधाला विरोध आणि टोलेबाजी म्हणजे राजकारण झालं आहे.  

Advertisement

सेलिब्रिटी, क्रिकेट, राजकारण ह्या तीन गोष्टींना तसंही अवास्तव महत्व दिल्याने माध्यम म्हणून आपली प्रतिमा खालावली आहेच. माध्यमाची समज असणे आणि ते हाताळता येणे ह्या दोन गोष्टी एकत्रित ज्यांना जमू शकतात त्यांनी इतरही महत्वाच्या विषयांवर लक्ष देण्यास हरकत नाही.

म्हणूनच कोरोना, कंगना आणि राजकारण हे मुद्दे सोडून आवडीच्या आणि खरोखर लक्ष देण्याची गरज असलेल्या विषयावर मी मत मांडत आहे.

Advertisement

आपल्या देशात राज्यघटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्रसरकारची सामायिक जबाबदारी आहे. भारतात सर्वाधिक शिक्षण संस्था असूनही पहील्या २०० मध्ये आपले दुरान्वयानेही स्थान दिसत नाही. तसेच शिक्षित लोकांसोबतच शिक्षित बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे.

गरिबी, बेरोजगारी, नाविन्यनिर्मितीला लागलेली गळती, ब्रेन ड्रेन अशा अनेक प्रश्नांवर विचार करतांना प्रचलित शिक्षण पद्धती हे त्याचे मूळ असल्याचे जाणवते.

Advertisement

सर्वाधिक शिक्षण संस्था भारतात आहे आणि त्यांची संख्या रोज वाढतच आहे पण वाढत्या शिक्षण संस्थांसोबत बेरोजगारी, नवनिर्मितीस अक्षम, अशी तरुण पिढी पण वाढते आहे.

कोणतीही डिग्री घेतल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या संधी ह्या मर्यादित आहे पण फक्त शिक्षण पद्धती चुकीची आहे की तिला तसे ठेवणारे ? पर्याय काय असे म्हणत मुकाट्याने चालणारे आपणही त्याला  तेवढेच जबाबदार आहोत हे पण तितकेच खरे. 

Advertisement

जुलै महीन्याच्या शेवटी दहावीचा निकाल लागला. तब्बल १८ टक्के अधिक, २४२ जणांना १०० टक्के गुण मिळाले होते. हा आनंद एकीकडे साजरा होत होता तर दुसरीकडे गुणांच्या  फुगवट्या  बद्दल चर्चा होत होती.

त्याचवेळी केंद्रशासनाने नवीन शिक्षणपद्धती संदर्भात घोषणा केली. ‘शिक्षणपद्धतीत बोर्डच्या परीक्षांचे महत्व कमी होणार.’

Advertisement

अशा शीर्षकाखाली असलेली  ती योजना प्रथमदर्शनी  उत्तम वाटत असली तरी देखील तिची अंमलबजावणी हा महत्वाचा मुद्दा आहे. १८३५ मध्ये मॅक्ले यांनी भारतीय शिक्षणाला इंग्रजी रूप दिले. रंग आणि रूपाने भारतीय ठेवणारे परंतु आचार आणि विचाराने इंग्लिश. अशी ही रचना होती.

परंतु ह्या सर्वांचा परिपाक  म्हणजे आपण ‘धोबीका कुत्ता ना घर का ना घाटका’ झालो. १९८३ च्या सुमारास आपली आज आहे ती पद्धती रूढ झाली पण ती फक्त तुम्ही कोणत्या वर्षात किती आणि काय शिकणार हे ठरविणारी आहे. कसं आणि का? हे मुद्दे  दुर्लक्षित राहीलेत. 

Advertisement

नवीन पद्धती मध्ये मुलांना त्यांना हवे असणारे विषय लहानपणापासूनच निवडण्याची संधी आहे. गणित – विज्ञानासोबत गायन, चित्रकला ह्या विषयांना पण ते प्राधान्य देऊ शकत आहेत ही महत्वाची गोष्ट वाटते.

आज पर्यंत फक्त सक्तीचे किंवा गुणांकनात महत्व असलेले हे विषय मुलांच्या कितीही जिव्हाळ्याचे असले तरीही त्यांना मन आणि परीक्षा याव्यतिरिक्त आयुष्यात स्थान नव्हते. विषय निवडीला महत्व दिले आहे हे उत्तमच आहे.

Advertisement

प्रत्येक व्यक्ती, तिने घेतलेले अनुभव आणि वेगेवेगळ्या टप्प्यावर तिने निवडलेले विषय यामुळे असंख्य असे समीकरण तयार होतील. त्यामुळे साच्यातून बाहेर पडणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक उत्तम आणि स्वतःच अस्तित्व असणारं नवीन बाहेर पडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

‘Right Man for Right Job’ अशी संज्ञा व्यवस्थापनशास्त्रात प्रचलित आहे. ह्या पद्धतीमुळे मुलांना त्यांना right असलेला जॉब आणि जॉब ला उत्तम पद्धतीने सांभाळू शकेल असा माणूस दोन्ही मिळेल असं वाटत आहे. 

Advertisement

नवीन पद्धतीमधील सर्वाधिक सकारात्मक गोष्ट ही आहे की कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर प्रत्यक्ष इंटर्नशिप करणं यामुळे आपण जे शिकतो ते प्रत्यक्षात किती उपयोगी आहे किंवा प्रत्यक्ष काम करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यायला हवं, आपल्याला काय येत किंवा काय कमी पडतंय हे प्रत्येक पायरीवर जर समजत असेल तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होईल.

तसंच शिक्षण घेतांना काम करणं हे फक्त आर्थिक गणितासाठीच नव्हे तर मुलांना त्या पैशांचे मूल्य, त्याला किती महत्व द्यायचे, ते मिळवण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा अशा अनेक बाबतीत महत्वाचं ठरेल.

Advertisement

संपूर्ण शिक्षण झाल्यावर नोकरीच्या वेळी जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुमचं शिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा काही संबंध नाही त्यावेळी वाया जाणारा वेळ आणि खचणारा विश्वास दोन्ही गोष्टी वाचतील.

भाषा सक्ती हा आणखी वेगळा मुद्दा आहे. धर्म, जात, प्रांत या पाठोपाठ जर राजकारण होत असेल तर ते ह्या मुद्द्यावर. त्यामुळे त्याला बाजूला ठेवून फक्त त्याच्याशी संबंधित तथ्य मांडते.

Advertisement

आपल्या मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक सहजपणे मुलांना समजते आणि त्यांच्या प्रगतीला मदत करते असे संशोधन सांगते.

त्यामुळे मुलांना विषय आणि त्यातील सखोल अभ्यास समजणं हे प्राधान्य ठेवलं तर ह्या मुद्द्यावर विवाद करण्यात अर्थ वाटत नाही. मुलांना संकल्पना समजू लागल्या की ते त्यांना हवी ती भाषा समजू आणि शिकू शकतात व व्यवहारात वापरू शकतात. 

Advertisement

आज नवीन शिक्षण पद्धतीचा आणि त्याच्या पुढील वीस वर्षांच्या आराखड्याचा जेव्हा आपण गवगवा करतो तेव्हा रवींद्रनाथांची प्रकर्षाने आठवण होते. ‘शाळा नक्की कशी नसावी आणि कसं शिकवू नये’ याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाळा किंवा शिक्षण व्यवस्था आहे असे ते सांगत.

जंगलातील वाघ, सिंह, चित्ता, हरीण, जिराफ, माकड, मासे अशा सर्वांना एकत्र करून जर फक्त पळण्याची किंवा उड्या मारण्याची परीक्षा घेऊन कोण श्रेष्ठ हे ठरवलं तर काय होईल? अगदी नेमकं हेच आपल्या पद्धतीचं झालं आहे.

Advertisement

सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रचंड वेगवेगळ्या वातावरणातून येणाऱ्या मुलांना एकच मापन पद्धती होती.

यामध्ये त्या मुलाला काय येतं, आवडतं आणि तो काय करू शकतो, त्याला काही भविष्य आहे का? ह्या विचारांना थारा नव्हता. अभ्यास म्हणजे गृहपाठ नव्हे, किंवा उत्तम शिक्षण देणे म्हणजे प्रत्येक विषयाचे खाजगी क्लास लावून देणे नव्हे हे देखील कोरोना काळात समजले असेलच.

Advertisement

शिक्षण पद्धती काही कागदं आणि नियम बदलले की बदलू शकते पण इतके बदल सरकार किंवा एखाद्या व्यवस्थेने केले तरीही तीचं यश – अपयश हे लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. 

ज्या विषयांना बोर्ड ची परीक्षा जवळ आली किंवा मूल आठवीत गेलं की दुर्लक्ष करायला सुरुवात होते. जसं की भाषा कारण तो गणितासारखा स्कोरिंग नाही, किंवा पुढे त्याचा काय उपयोग, चित्रकला, खेळ असे अनेक विषय आहेत. मुलांचे व्यक्तिमत्व सर्वांगाने विकसित होण्यासाठी शिक्षण, कला, खेळ, प्रत्यक्ष जीवनभुव यांचा मिलाफ गरजेचं आहे.

Advertisement

आज एकविसाव्या शतकात आपण प्रत्येक गोष्टीवर पैसे खर्च करून त्या मुलांवर लादण्याचे काम करतो.’शांतिनिकेतन’ हे गुरुकुल त्याच्या शिक्षणपद्धतीसाठी जगतविख्यात आहे. मुलींनी स्वसंरक्षणासाठी सिद्ध असावं म्हणून त्या काळात ज्युडो आणि कराटे शिकविण्यासाठी जपानहून प्रशिक्षकांना शांतिनिकेतन मध्ये बोलावलं होतं.

त्यांनी मुलांचे शिक्षण, कला आणि एकूणच व्यक्तिमत्वाला संपन्न करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या परंतु दुर्दैवाने त्याचा उपभोग घेण्याची क्षमता आणि मानसिकता देशवासीयांत नव्हती.

Advertisement

आजही शंभर वर्षांत ती मानसिकता आणि शिक्षण काय आहे हे समजून घेण्याची कुवत आपल्यात आहे असं वाटत नाही. पद्धती बदलली म्हणून पालक त्याला महत्व देतीलच किंवा ही मानसिकता बदलेलच असं नाही. 

अधिक विश्लेषण करून एकाच बदलाकडे लक्ष वेधलं जात आहे ते म्हणजे १०+२+३ च्या ऐवजी ५+३+३+४ चा आराखडा असेल हे. तांत्रिक दृष्ट्या जरी हे महत्वाचे असले तरीही ५+३+३+४ असो की १०+२+३ असो. काय आणि कसं शिकवलं जातं आणि आपण का शिकतो ह्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात अधिक महत्वाच्या ठरतात. 

Advertisement

१. एखादा अभ्यासक्रम ठराविक कालावधीत पूर्ण करण्यापेक्षा तो समजण्याला अधिक महत्व आहे. 

२.  शिकताना असणारे निर्मितीचे स्वातंत्र्य. 

Advertisement

३. जगभरात त्या शिक्षणाचे असणारे मूल्य.

४. शिक्षणाचा व्यवहारात होणारा  उपयोग.

Advertisement

५. शिक्षणातून व्यावहारिक जीवनात नवीन संधी निर्माण करण्याची क्षमता.

६. संशोधनाला असणारे महत्व आणि वाव.

Advertisement

यावर शिक्षणाचा किंवा पद्धतीचा दर्जा ठरतो. 

थोडक्यात नियम किंवा तांत्रिक बदलांपेक्षा ह्या पद्धतीतून मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात कीती सकारात्मक बदल होतील, त्याचा त्यांच्या व्यावसायिक किंवा प्रत्यक्ष आयुष्यात किती संबंध राहतो यावर ह्या बदलाचे यश-अपयश अवलंबून आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here