इ.स. १८५६ मध्ये पुण्यास प्रथम आगगाडी आली. पुणे-मुंबई रस्त्यावर ही आगगाडी प्रथम धावू लागली. त्यानंतर पुण्यास तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या धंद्याला तेजी आली. पेशव्यांच्या काळात व पेशवाई पतनानंतर सुरवातीस इंग्रजांच्या काळात हा धंदा नसावा असे वाटते.
इ.स. १८१८ नंतर पुण्याचा कारभार इंग्रजांकडे गेल्याबरोबर २-३ वर्षात इंग्रज अधिकाऱ्यांनी पुणे शहराची सविस्तर खानेसुमारी केली होती. त्या मध्ये पुण्याच्या व्यवसायांची देखील माहिती संकलित केली होती. या माहितीवरून इंग्रजांकडे सत्ता आल्यानंतरच्या काळात पुण्यात कासार होते, परंतु ते भांड्यांचा व्यापार करीत होते.
ते भांडी तयार करीत नव्हते असे दिसते. तसेच पेशव्यांनी लिहलेल्या उपलब्ध झालेल्या पत्रानुसार त्यांनी इतर ठिकाणच्या सरदारांना भांडी पाठवून देण्याविषयी लिहलेले आहे. या वरून त्याकाळात पुण्यास भांड्याचे कारखाने नसावेत असे अनुमान निघते.
पुढे सन १८६० नंतरच ह्या धंद्या ला सुरवात झाली असावी, याचे कारण असे की, ह्या भांड्याना लागणार जो पत्रा आहे, तो ऑस्ट्रेलिया, इंग्लड या देशातून आयात होवू लागला. हा पत्रा बाजारात आल्यानंतर भांडी तयार करण्याच्या कामास सुरवात झाली.
परंतु इतक्या उशिरा सुरवात होवून सुद्धा पुण्याने ह्या व्यवसायात थोड्या कालावधीत पुष्कळच आघाडी मारली. सन १८८३ साली प्रसिद्ध् झालेल्या सरकारी गॅझेट मध्ये त्या काळी हा धंदा पुण्यातील प्रमुख धंदा होता असे दिसते. त्या सुमारास २,३०० ते २,४०० कामगार या धंद्यात होते आणि ७० व्यापारी मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करीत होते.