औरंगाबाद10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी खासगी दलाल नियुक्त केले आहेत. त्यांच्या मार्फत गेले तरच लायसन्स, फिटनेस, आदी कामे होतात. त्यांच्या व्यतिरिक्त गेले तर कामच होत नाही. यामुळे वाहन चालक मालक हैराण झाले आहेत. खासगी प्रतिनिधीमार्फत काम करून घेयायचे तर मग आरटीओ, अधिकारी व कर्मचारी फुकट पगार घेण्यासाठी ठेवलेत का? असा खरमरीत प्रश्न उपस्थित करून दलालीला चाप लावण्यासाठी शिवसेनेचे शहर पश्चिम विभागाचे उपशहरप्रमुख संतोष मरमठ यांनी आरटीओमार्फत मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना 14 मार्चला पत्र पाठवले आहे.
वाहन पासिंग, वाहन परवाना, यासह विविध कामे करण्यासाठी सरकारने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कॅबिन दिलेल्या आहेत. मात्र, त्यांनी नियमबाह्यरित्या खासगी दलालांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्फत गेले तरच कामे केली जातात. अन्यथा दिवसेंदिवस वाहने उभे ठेवली जातात.
प्रभारी आरटीओकडे तीन जिल्ह्यांचा कारभार आहे. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही कामकाजात सुधारणा करणे शक्य होत नाही. परिणामी आरटीओत मनमानी कारभार सुरु झाला आहे. दलालीला वाव दिला जात आहे. यामध्ये वाहन चालक मालकांचे आर्थिक, मानसिक शोषण होत असून अनमोल वेळेचाही अपव्यय होत असल्याचे मरमठ आणि दिपक संभेराव यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
अधिकारी उपलब्ध नसतात
करोडी येथे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते तास दोन तास थांबतात व निघून जातात. यामुळे वाहने उभे करून ठेवावी लागतात. वारंवार खेटा मारवे लागते. यामुळे खर्चात मोठी वाढ होते व वाहन उभे राहिल्याने होणारे नुकसान मोठे आहे. याकडे आरटीओ व परिवहन आयुक्त, परिवहन मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन मुजोर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची नितांत गरजे असल्याचे मरमठ व संभेराव यांनी म्हटले आहे. याबाबत आमदार संजय शिरसाठ व विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी आरटओंना जाब विचारणा करून कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.
३० किमीचा फेरा
रेल्वे स्टेशन येथील आरटीओ कार्यालयात वाहन चाचणीसाठी चांगला ट्रॅक होता त्यावरील चाचणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता ३० किमी दूर करोडीला जावे लागते. येथे सेवासुविधांचा अभाव आहे. काही त्रूटी, तांत्रिक अडचण निर्माण झाली तर पुन्हा शहरातील आरटीओ कार्यालयात यावे लागते. यात वेळ जातो. कामही होत नाही. यामुळे वाहन चालक त्रस्त झाले असून आरटीओच्या कामकाजात सुधारणा करावी, असे मरमठ म्हणाले.