सात महिन्यांच्या कालावधीनंतर आयआरसीटीसी आता १७ ऑक्टोबर, २०२० पासून तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. वृत्तानुसार तेजस एक्स्प्रेस गाड्या लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर धावतील.
ही घोषणा करण्याच्या आठवड्याभर आधी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी स्टेटमेंट दिले होते की आगामी उत्सवांसाठी रेल्वेला 15 ऑक्टोबरपासून नोव्हेंबर पर्यंत 200 हून अधिक गाड्या चालवायच्या आहेत.
आयआरसीटीसीने रेल्वे मंत्रालयाकडून दोन लोकप्रिय कॉर्पोरेट गाड्या चालवण्याची परवानगी घेतली आहे आणि सेवा, सुरक्षा आणि हेल्थ प्रोटोकॉल संबंधित प्रवाशांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची तयारी केली आहे. सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी, प्रत्येक पर्यायी जागा रिक्त ठेवली जाईल.
एकदा बसलेल्या कोणत्याही प्रवाशाला सीट बदलण्याची मुभा दिली जाणार नाही आणि प्रत्येक प्रवासी आणि कर्मचार्यांना रेल्वे प्रवासादरम्यान मास्क लावावे लागतील. याव्यतिरिक्त, मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अॅप असणे प्रवाश्याला अनिवार्य असेल.
बातमीनुसार प्रवाशांना कोविड -१९ संरक्षण किट देखील देण्यात येणार आहेत, ज्यात एक सॅनिटायझरची बॉटल, एक मास्क, शिल्ड आणि ग्लव्ज असतील. ट्रेन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाश्यांची कोवीड-१९ विषाणूच्या लक्षणांबद्दल थर्मली तपासणी केली जाईल.
प्रवाशांचे सामान रेल्वे कर्मचार्यांकडून निर्जंतुकीकरण केले जाईल. डब्यांची साफसफाई व नियमित निर्जंतुकीकरणही करण्यात येईल.