अर्ध्या पृथ्वीचा प्रवास करून हा विषाणू आता भारताच्या दारात आलाय व भारताला त्याच्या विळख्यात घेऊ पाहतोय..
नेहमीप्रमाणेच सर्व भारतीय या संकटाला सामोरे जाण्यासाठी तन मन आणि धन याने एकवटलेले आहेत.
वर्क फ्रॉम होम सुरू झालंय तर काही कंपन्यांना सक्तीची सुट्टी दिलीय. हातावर पोट असणाऱ्या मजूरांना सध्या काम नाही पण त्यांच्या जीवनावश्यक गरजांची काळजी भारतातल्या जनतेने घेतली आहे. गोरगरीब जनतेला सरकारने मदतीचा हात दिलाच आहे पण टाटा बिर्ला सारखे उद्योगपती सढळ हाताने सरकारी निधीत पैसे ओतत आहेत.
मुलांच्या शाळा ऑनलाइन आहेत, पण मुले आपल्या जवळ आहेत ही बाब आई वडिलांची काळजी घालवणारी आहे. घरातील वृद्ध, आजारी यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
सुरक्षा सूचनांचे काटेकोर पणे पालन होईल याची काळजी प्रत्येक नागरिक घेत आहेत पण जे कायदे मोडत आहेत त्यांना योग्य शासन आमचा पोलीस वर्ग करत आहे.
या सक्तीच्या लॉक डाऊन मध्ये आम्ही हार मानलेली नाही. कधी ऑनलाईन येऊन, कधी घरच्यांबरोबर आम्ही विविध उपक्रम चालू ठेवले आहेत. मन रमवण्यासाठी आम्ही आमच्या जुन्या छंदांचा आधार घेतला आहे.
घरातल्या स्त्रीवर अतिरिक्त कामांचा ताण येणार नाही याची काळजी पुरुष वर्ग घेत आहे आणि अचानक आलेल्या आर्थिक आव्हानात महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने सामना करण्यासाठी सज्ज आहे.
भविष्यात पुढे काय हे आम्हाला ही माहिती नाही पण भविष्याची काळजी घेऊन वर्तमानात सकारात्मकतेने जगणे आम्हाला जमले आहे..
समाजातल्या कुठल्याही घटकाला या संकट काळात आम्ही एकटं सोडलेलं नाही. माणसाला माणूस म्हणून भेटणं हे आम्हाला नेहमीच जमत आलंय आणि किंबहुना अमेरिकेला औषध पुरवठा करून आम्ही माणुसकीही जपली आहे.
या देशात विविध जाती धर्माची, प्रांताची लोक आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत पण या घडीला सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र येत या विषाणूचा नायनाट करण्यासाठी कंबर कसली आहे. आमचे नेते वेळोवेळी व्हिडिओ काँफेरेन्स करून मीटिंग करत आहेत, जनतेचे मनोधैर्य उंचावत आहेत. आणि जनतेतले काही घटक बाकीच्यांचे मनोबल शाबूत राहील यासाठी प्रयत्न करत आहेत.
सकारात्मकता आणि सुरक्षा सूचनांचं काटेकोर पालन या संकटातून आम्हाला बाहेर काढू शकते हे आम्हाला माहीत आहे.
हा विषाणू भारतात आलाय पण आता तो इथेच शेवटचा श्वास घेणार ही प्रत्येक भारतीयाची प्रतिज्ञा आहे कारण कुठल्याही संकटाला न जुमानता त्यातून पार होणं हे पूर्वकाळापासून भारतीयांना जमत आलंय.
एक भारतीय म्हणून मला माझ्या देशाचा अभिमान आहेच पण माझ्या देशावर, तिथल्या डॉक्टररुपी देवावर, इथल्या प्रत्येक माणसावर माझा विश्वास आहे.
नेहमीप्रमाणे हे युद्ध ही जिंकू, हे आव्हानही पार पाडू हा आम्हाला विश्वास आहे.
एकमेकांशी कितीही भांडत असलो तरी या बाहेरच्या विषाणूरुपी शत्रूसाठी आम्ही एक आहोत हे नक्कीच लक्षात ठेवावे.
कदाचित या संकटातून पार पडल्यावर एक वेगळं जग असेल, भारत वेगळा असेल आणि तो नक्कीच आश्वासक असेल याची मला खात्री आहे.
जय हिंद!
लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. तुमच्या कडे जर interesting लेख असतील तर आम्हाला [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.