photographer rita kalmankar share experiance of wildlife photography zws 70 | सोयरे सहचर : कॅमेऱ्याच्या नजरेतून..‘‘कधी वॉलरससारखा अजस्त्र प्राणी, तर कधी पोलर बेअरसारखं पांढरं शुभ्र अस्वल. कधी क्विटजलसारखा मोहमयी पक्षी, तर कधी भमेरा  वाघ.. असे अनेक प्राणी-पक्षी कॅमेराबद्ध करता आले. पण ती भेट सहज-सोपी नसायचीच. काहींसाठी दिवस दिवस प्रतीक्षा केली, तर काहींसाठी कडाक्याच्या थंडीत बर्फ तुडवला. पण त्या सगळय़ाचं सार्थक व्हायचं, जेव्हा कॅमेऱ्यात अचूक टिपता यायचं. असे असंख्य प्राणी-पक्षी जीवनात जवळून-दुरून न्याहाळता आले. निसर्गाचे अद्भुत रंग पाहता आले..’’

Advertisement

वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऋता कळमणकर यांच्या नजरेतून..

वन्यजीव छायाचित्रण हे फोटोग्राफीतलं अतिशय आव्हानात्मक अन् म्हटलं तर तितकंच अप्रतिम, अनोखं आणि दुर्मीळ अनुभव देणारं क्षेत्र. ते कधी संयमाची कसोटी पाहतं, तर कधी माय-लेकराच्या नात्यातला घट्ट बंध दाखवून जातं, कधी प्रचंड शारीरिक कस लावणारं ठरतं, तर कधी एखाद्या थरारक प्रसंगाला सामोरं जाण्याचं धाडस आपल्यात आणतं. गेली काही वर्ष निसर्ग आणि मुख्यत्वे वन्यजीवन अनुभवताना भेटणारे हे आपले सोयरे सहचर आयुष्याकडे बघण्याची नजरच बदलून टाकतात.

Advertisement

माझ्या वाइल्डलाइफ फोटोग्राफीच्या निमित्तानं मी असे अनेक अनुभव घेतले. किती तरी प्रदेश पालथे घातले. असंख्य प्राणी-पक्ष्यांना जवळून पाहिलं. खरं तर वन्य जीवन प्रत्यक्ष अनुभवणं हा केव्हाही न विसरता येणारा अनुभव, पण माझ्यासारख्या व्यक्तीला तर त्यांच्या अप्रतिम फोटोंची साथ आयुष्यभर सोबत करणारी. त्यातलेच हे काही प्रसंग- माझ्या वन्यजीवनातीले, फोटोग्राफी करताना आलेले

वॉलरस नि पोलर बेअरची भेट

Advertisement

उत्तर ध्रुवावरचा उन्हाळा म्हणजे उणे १५ ते १७ तापमान अन् २४ तास प्रकाश. झोपेचं सगळं गणितच बिघडून गेलं होतं. त्या दिवशी रात्रीचे नऊ-साडेनऊ झाले होते. सगळीकडे स्वच्छ प्रकाश होता. जहाजाच्या कॅप्टनला जवळच वॉलरस या महाकाय प्राण्याची मोठी कॉलनी असल्याची बातमी मिळाली. आम्ही मोठय़ा जहाजातून उतरून, छोटय़ा ‘झोडियॅक’ अर्थात बोटीतून निघालो, सगळीकडे पाणी आणि मधूनमधून बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र गादीवर बसलेले ते अजस्त्र प्राणी, जमिनीवर अतिशय मंद हालचाल करणारा हा प्राणी पाण्यात मात्र अत्यंत वेगवान हालचाली करतो. ‘झोडियॅक’मधून मला तिथल्या निळसर बर्फावर बसलेली वॉलरस माय-लेकरं दिसली. मोह आवरणं शक्य नव्हतं. त्यांचे फोटो काढण्यात मी मग्न असतानाच कॅप्टननं जोरजोरात ओरडून परतण्याचा इशारा दिला, पाहते तो काय, वॉलरसचा एक मोठा कळप अक्षरश: रोरावत आमच्या बोटीच्या दिशेनं धावत येत होता. अजस्त्र धूड असणारे ते अनेक प्राणी. एकाचा जरी दोन फुटी सुळा आमच्या बोटीत रुतला असता तर ती क्षणात फुटली असती. मग आमची खैर नव्हती. पण कॅप्टननं प्रसंगावधान राखत आम्हाला परत बोलावून घेतल्यानं आम्ही सुखरूप परतलो.

त्या प्रसंगातून निभावल्यानंतर सर्वजण आपापल्या कक्षात विश्रांतीसाठी गेले. मी मात्र जहाजाच्या वरच्या भागातच बसून राहिले. का कोण जाणे अपूर्णता जाणवत होती. कॉफी घेऊन डेकवर फेरफटका मारायचं ठरवलं. डेकवरून दूरवर दिसणारा बर्फाचा समुद्र.. मध्येच उडत जाणारा एखादा पक्षी. वातावरणात फक्त निळा आणि पांढरा रंग भरून राहिलेला.. आमच्या जहाजाची गती थोडी मंद झाली. तेवढय़ात बरोबरच्या एकानं समोर निर्देश केला, बर्फावर शुभ्र पोलर बेअर अर्थात ध्रुवीय अस्वल झोपलं होतं.. १० ते १५ सेकंदच मिळाले मला त्याला मन भरून पाहायला. आमची चाहूल लागताच ते बर्फात उठून पाठमोरं चालू लागलं.  पोलर बेअर नर साधारण ७०० किलो तर मादी ४५० किलो वजनाची असते. आक्र्टिक खंडाच्या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानावर असलेला हा प्राणी प्रचंड आक्रमक, धोकादायक असतो. शुभ्र फरमागची त्याची कातडी मात्र काळी असते. फर तेलकट असून झटकून टाकल्यावर अंगावर पाणी राहात नाही. आक्र्टिकच्या वातावरणात वाढत्या वैश्विक तापमानामुळे होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून येथील हे दुर्मीळ प्राणिजीवन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.. पण त्या काही सेकंदांत घेतलेल्या फोटोच्या रूपानं का होईना, माझ्याकडे ते कायम जिवंत असेल.

Advertisement

गोष्ट एका आईची..!

२०२१ मधल्या एप्रिल महिन्याचा रखरखीत उन्हाळा म्हणजे व्याघ्रदर्शनाची सुसंधीच. ताडोबाच्या जंगलातल्या सर्वच पाणवठय़ांवर बच्चेवाल्या वाघिणींचा कब्जा. रात्रीच्या पडून गेलेल्या वळवाच्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालं होतं. तिथल्या नाल्यामध्ये ‘डब्ल्यू’ या वाघिणीचे बछडे असल्याची पक्की माहिती आम्हाला मिळाली होती. तिथे पोहोचले, तेव्हा पंधरा-सोळा महिन्यांचे दोन बछडे नाल्यात झोपलेले दिसले. त्यांची आई मात्र  आजूबाजूला दिसत नव्हती. आम्ही थोडं आडोशाला थांबलो. थोडय़ा वेळानं नाल्याच्या विरुद्ध बाजूनं एक वाघीण अत्यंत सावध पावलं टाकत या बछडय़ांकडे येताना दिसली. मला वाटलं, ती त्यांची आई आहे, परंतु डोळय़ावर असलेल्या काळय़ा रंगाच्या पॅचमुळे ती शर्मिली वाघीण आहे हे लक्षात आलं. आता बछडय़ांचं काय होणार? या विचारानं हातातला कॅमेरा क्षणभर थरथरला. तोवर शर्मिली त्या बछडय़ांजवळ पोहोचली होती. तिच्या अचानक येण्यानं मादी बछडं घाबरून उठलं. तोवर, तिच्यापासून थोडय़ाच अंतरावर झोपलेला तिचा भाऊ उठून बहिणीच्या दिशेनं येऊ लागला. शर्मिलीनं डरकाळी फोडली, तसं नर बछडंही गुरगुरलं. जंगलात हे आवाज घुमले आणि वरच्या गवतातून ‘डब्ल्यू’ वाघीण बेभानपणे आपल्या संकटात सापडलेल्या बछडय़ांकडे धावत येऊ लागली. ‘डब्ल्यू’ आपली आई लारापेक्षाही देखणी. उमदं जनावर. तिच्यावरून नजर हटणार नाही, असं तिचं देखणं रुप. शर्मिली आणि बछडे खाली नाल्यात असल्यानं ‘डब्ल्यू’ला ते दिसत नव्हते. परंतु त्यांच्या गुरगुरण्यातून ते संकटात असल्याची तिला जाणीव झाली होती. तोवर इकडे शर्मिलीची त्या बछडय़ांवर आगपाखड सुरू झाली होती. पण मला भावली ती बछडय़ांच्या दिशेनं बेभानपणे धावत येणारी त्यांची आई. तेवढय़ात तिनं जंगल दणाणून टाकणारी डरकाळी फोडली. मग मात्र शर्मिलीनं आपला मोर्चा तिच्या दिशेनं वळवला. आता काय होणार, या कल्पनेनं माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मी दूर एका झाडाआड लपले होते. आता ‘डब्ल्यू’ आणि शर्मिली दोघींच्या गगनभेदी डरकाळय़ा ऐकू येऊ लागल्या. तेवढय़ात नर बछडाही आईच्या मदतीला धावला. मादी बछडं मात्र थोडं भेदरलेलंच होतं. काही क्षणांनंतर तीही भावाच्या मागोमाग गेली. पुढे काय नाटय़ रंगलं असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकत होते. वाघांच्या डरकाळय़ांच्या आवाजानं दणाणून गेलेलं जंगल हळूहळू शांत होत गेलं नि ‘डब्ल्यू’ आणि तिचे दोन्ही बछडे परत नाल्यात विश्रांतीसाठी परतले. त्यांनी शर्मिलीला हुसकावून लावण्यात यश मिळवलं. मात्र पुन्हा हल्ला होण्याची शक्यता असल्यानं ‘डब्ल्यू’ अत्यंत सावध होती. बछडी आईला मायेनं बिलगली, परंतु आईनं फारसा प्रतिसाद दिला नाही. मादी बछडय़ाच्या घाबरण्याचा तिला बहुधा राग आला असावा. हळूहळू आईच्या कुशीत बछडी गाढ झोपून गेली. आमची निघण्याची वेळ झाली. परतताना, दुसऱ्या पाणवठय़ावर बसलेली शर्मिली नजरेस पडली.  ‘डब्ल्यू’ व तिच्या बछडय़ांनी शर्मिलीच्या परिसरावर कब्जा केलेला असल्यानं ती  रागावलेली असावी. काहीही असो, पण जंगलसाम्राज्याच्या रंगलेल्या नाटकाची मी साक्षीदार ठरले. तो प्रसंग कधीही न विसरता येणारा.

Advertisement

हिमबिबळय़ाचं दर्शन

कधी कधी स्वप्न पटकन पूर्ण होतं, तर कधी संयमाची कसोटी लागते. जीव अगदी मेटाकुटीला येतो.. फोटो मिळवण्यासाठीची प्रतीक्षा, कधी चार-चार तास तर कधी पाच-पाच दिवस. पण या दीर्घ प्रतीक्षेनंतर जे हाती येतं ते मात्र अवर्णनीय. फेब्रुवारी २०२२ मध्येच स्पिती व्हॅली परिसरात हिमबिबळय़ासाठी केलेला प्रवास हे त्याचं उदाहरण म्हणता येईल. समुद्रसपाटीपासून साधारण १२ ते १४ हजार फुटांवर राहणारा, अंगावर ५ ते १२ इंच फर असलेला, करडय़ा रंगाचा, अंगावर काळे ठिपके, पण चेहरा वाघासारखा, असा हा अतिशय दुर्मीळ, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला, ‘हिमालयीन ग्रे घोस्ट’ अर्थात हिमबिबटय़ा पाहण्याची आत्यंतिक इच्छा होती. पण शारीरिक क्षमतेचा कस लावणारी ही सफर, उणे ३० सेल्सियसपर्यंत घसरणारा पारा, हायअल्टीटय़ुडचे त्रास, वर कडाक्याची थंडी. वातावरणाशी जुळवून घेत आम्ही तीन दिवसांच्या प्रवासानंतर किब्बर या स्पिती परिसरात पोहोचलो. पुढील चार-पाच दिवस फक्त प्रतीक्षा होती. दररोज निराशाच पदरी पडत होती. पाचव्या दिवशी किब्बरपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर हिमबिबटय़ा दिसल्याची खबर आली. तिथे पोहोचायला दीड तास तरी लागणार होता. तोपर्यंत तो तिथेच असेल का? पाहता येईल का? फोटो मिळतील की नाही? हे सर्व प्रश्न मनात ठेवून निघालो. दीड तासानं गाडीचा प्रवास संपला आणि त्यांनी सांगितलं, साधारण तीन किलोमीटर अंतरावर बिबटय़ा झोपलेला आहे. त्या बर्फातून, चढ-उतारावरून चालणं खूप अवघड होतं, परंतु पर्याय नव्हता. चालत निघाले, वाटेत काही जण भेटले. त्यांनी सांगितलं, तो खूप लांब आत झोपलाय. आम्हाला नाहीच मिळाले फोटो, आम्ही परत निघालोय. निराश झाले, परंतु खुद्द जाऊन खात्री करून घेणं योग्य वाटलं. प्रचंड दमल्यानंतर अखेर प्रवास संपला. दोन बछडे आणि एक  मादी तिथं असल्याचं कळलं. प्रत्यक्ष पाहिलं, तेव्हा खूप दूरवर वरच्या दगडी गुहेत मादी झोपली होती आणि बछडे खालच्या बाजूला एकमेकांच्या बाजूला बसून होते, मध्येच झोपत होते. दुपारी बारापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हेच दृश्य होतं. दुपारी चारनंतर थंडीचा कडाका वाढला, बिबळय़ांचा संचार रात्री असल्यानं हे प्राणी पूर्ण दिवस झोपूनच काढतात. त्यामुळे कडेकपारीत बिबळय़ा शोधणं हे एक दिव्यच, पाच-सव्वा पाचला परतीची वेळ झाली, प्रकाशही कमी होत होता. ते तिघं एकत्र येतील आणि त्यांचे फोटो काढता येतील हे आता शक्य वाटत नव्हतं. ट्रायपॉडवरून कॅमेरा काढला. परतीची तयारी केली, तितक्यात मादी खाली आली आणि बछडय़ांसह पुन्हा दिसेनाशी झाली. पण तेवढा वेळ पुरेसा होता. अनेक दिवसांची प्रतीक्षा आणि प्रचंड दमणुकीनंतर एक दुर्मीळ प्राणी पाहिल्याचं आणि त्याला कॅमेराबद्ध करण्याचं समाधान मनात साठलं होतं. कष्टाचं चीज झालं होतं.

Advertisement

माकडाचा कॉल

निसर्गात फिरताना एकदा गमावलेला क्षण तसाच परत कधीही मिळत नाही. सतत ‘अलर्ट’ असणं आणि संधीचा योग्य उपयोग करून घेणं महत्त्वाचं. पण कधी कधी मजेदार अनुभवही येतात, तर कधी प्राणी-पक्षी आपल्याला फोटो देण्यासाठी पोझ देताएत की काय असं वाटावं असे अनुभव येतात.. बांधवगडचं जंगल. दुपारची वेळ, आम्ही ज्या परिसरात होतो तिथेच भमेरा हा बलाढय़ अन् प्रसिद्ध वाघ असल्याची खबर मिळाली. दोन जिप्सी गाडय़ांमध्ये आम्ही एकूण सहा जण बसलो होतो. रस्त्याच्या कडेला गाडय़ा लावून वाघ रस्त्यावर येईल आणि फोटो मिळतील म्हणून अगदी सज्ज होतो. इतक्यात आमच्या डोक्यावरच्या झाडावरून एक माकड विशिष्ट आवाज करू लागलं. त्याला ‘कॉल’ म्हणतात. जंगलामध्ये वाघ दुरून दिसला की माकडं ‘कॉल’ देतात. ज्यामुळे इतर माकडं, हरिण, सांबर सावध होतात. माकड ‘कॉल’ देऊ लागलं आणि आम्ही आणखीनच सरसावून बसलो. आता कुठल्याही क्षणी वाघ येईल असं वाटू लागलं. माकडाच्या ‘कॉल’मुळे वातावरणात दहशत पसरली होती. दहा-बारा मिनिटं झाली तरी माकडाचं ओरडणं काही थांबेना. आता येईल, मग येईल म्हणून आम्ही वाट पाहू लागलो. माकड थोडं थांबलं आणि पुन्हा ‘कॉल’ करू लागलं. आसपास वाघ आहे याची आम्हाला खात्रीच पटली. बराच वेळ गेला. तेवढय़ात आमच्या गाडीतला गाईड मागे वळून दुसऱ्या गाडीतल्या एका तरुणीला म्हणाला, ‘‘मॅडम, आप अपना जाकीट निकाल के सीट के नीचे छुपालो.’’ तिनं लेपर्ड पिंट्रचं जाकीट घातलं होतं. ते काढून लपवताच माकडाचे ‘कॉल’ बंद झाले. सर्वाना हसू फुटलं. अन् तेवढय़ात समोरून एक गाडी आली. त्यातले फोटोग्राफर म्हणाले, ‘‘अरे इकडे काय करताय? भमेरा दिसला तासापूर्वीच.’’ आमची पुरती फजिती केली होती माकडानं. पुन्हा कधी माकडाचा ‘कॉल’ आला की मी आजूबाजूच्या अन् माझ्या गाडीतल्या लोकांचे कपडे चेक करते!

Advertisement

हिरवागार बांबू पिट व्हायपर

जुलै महिना अन् आंबोलीचा घाट म्हणजे धुवाधार पाऊस अन् धुकं. आंबोलीची खासियत असलेला आंबोली बुश फ्रॉग अन् ग्लायिडग फ्रॉग याची फोटोग्राफी करण्यासाठी रात्री पावसात आम्ही बाहेर पडलो होतो. रेनकोट, गमबूट अन् कॅमेरा भिजू नये म्हणून डोक्यावर छत्री अशी तयारी करून डोक्यावर लावलेल्या टॉर्चच्या उजेडात हळूहळू चालत निघालो. चालत चालत मी थोडी वळले अन् बाजूच्या फांदीवर काही तरी चमकलं, नीट पाहिलं तर काय, अतिशय सुरेख असा वेटोळं घातलेला हिरवागार, परंतु विषारी सर्प दिसला (बांबू पिट व्हायपर). अंधाराच्या काळय़ा गडद बॅकग्राऊंडवर तो हिरवा, किंचित पिवळसर झाक असलेल्या चमकदार कातडीचा सर्प डोळय़ांचं पारणं फेडत होता. असा काही पोझ देऊन बसला होता की त्याचीच फोटोग्राफी चालू आहे! मग मी अजिबात वेळ न दवडता सुरक्षित अंतरावरून फोटो घेतले. निघालो होतो बेडकासाठी अन् मिळाली या परिसरात क्वचित दिसणारी सापाची प्रजाती, अतिशय सुंदर फोटो देऊन गेली.

Advertisement

क्विटजलसाठीची दीर्घ प्रतीक्षा

तीन-चार सेकंदांतला फोटो, एकाच ठिकाणी तासन्तास हालचाल आणि आवाज न करता बसून राहणं हे वन्यजीव फोटोग्राफरसाठी नेहमीचंच. कधी कधी ट्रायपॉड आणि कॅमेरा खांद्यावर घेऊन बरीच पायपीट करावी लागते. एकाच जागी उभं राहून प्रतीक्षा करावी लागते. पक्ष्यांचे फोटो काढताना हा अनुभव हमखास येतो. मध्य अमेरिकेतल्या कोस्टा रिका या पर्यटनसमृद्ध देशात हिमग बर्ड, रेलप्लेन्डन्ट क्विटजल ( Resplendent quetzal) यांसारखे सुंदर सुंदर पक्षी पाहण्यासाठी आम्ही एका घनदाट जंगलात कॅमेरे लावून सकाळपासून उभे होतो. गाइडच्या मते तो दर तास-दोन तासांनी घरटय़ात येतो, मादीला काही खिलवतो आणि निघून जातो. दूरवर पक्ष्याची शीळ ऐकू यायची आणि आमच्या अपेक्षा उंचावायच्या. पण तो अतिशय वेगानं यायचा आणि पापणी लवायच्या आत नाहीसा व्हायचा. फोटो काढायचा तर त्यानं फांदीवर बसायला हवं होतं. पण हा बसतच नव्हता. लांबलचक हिरवेगार पंख, लालबुंद पोटाचा भाग, हिरव्यागार तोंडावर पिवळीचुटूक चोच असा देखणा  पक्षी. काही केल्या फोटो मिळत नव्हता. दुसरा दिवस. सकाळची वेळ. इतर पक्ष्यांचे फोटो काढून आम्ही दुपारी पुन्हा त्या जंगलात आलो. पुन्हा प्रतीक्षा सुरू, पण आज शीळ ऐकू आली अन् मादी घरटय़ातून हळूच बाहेर डोकावली. तितक्यात नर समोरच्या फांदीवर टेकला.. तीन-चार सेकंद.. पण तेही आमच्यासाठी पुरेसे असतात. ५०० एमएमची लेन्स, अन् क्रॉप कॅमेरा यांमुळे खूप दुरूनही स्पष्ट फोटो मिळाले. तो क्षण ज्यांना पकडता आला नाही, त्यांनी ती संधी गमावलीच. कारण पुढचे दोन दिवस तो फांदीवर बसलाच नाही. त्यामुळे कॅमेऱ्यावरची तुमची पकड, तुमचं तांत्रिक ज्ञान आणि प्रतीक्षेतलं एकाग्र मन, याचं फळ असं काही सेकंदांत मिळून जातं. अपार समाधानानं मी परतले.

Advertisement

आतापर्यंत असे असंख्य प्राणी-पक्षी भेटले. कधी अगदी जवळून, तर कधी खूप दूरून, पण प्रत्येकानं मनात घर केलं ते मात्र कायमचं..

[email protected]

Advertisement

Source link

Advertisement