Palkatv author trupti joshi kulshreshtha of study Children parent headache teacher ysh 95तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

Advertisement

हल्ली मुलांचा अभ्यास नर्सरीनंतर सुरूच होतो आणि मग अनेक घरांमध्ये दररोज मुलांना अभ्यासाला बसवताना पालकांची डोकेदुखीही सुरु होते. मुलांचं अभ्यासाचं वय पाचपासून किमान २२ ते २३ वर्षांपर्यंत तरी असतं. शिक्षक आणि पालक दोघांनीही वेगवेगळय़ा क्लृप्तय़ा वापरत त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी लावली, तर अभ्यास ही गोष्ट नावडती न राहाता आवडती होऊ शकते..

मागच्या (२३ जुलै) लेखातल्या ‘आईच्या शाळे’ला वेळेचं बंधन नसतं आणि गणवेशाची सक्तीही नसते. भारी लाडाकोडात जातात ही पाच वर्ष. पण गोबऱ्या गालांची पहिली पाच वर्ष संपल्यानंतर सहावं लागतंच!  पारतंत्र्याच्या काळातल्यासारख्या गोलमेज परिषदा भरतात. शेजारपाजारी, नातेवाईक, अनुभवी पालक या सगळय़ा सभासदांबरोबर गंभीर चर्चा होतात आणि एकदाची पाल्याची शाळा ठरते. पूर्वी माध्यम कोणतं, हाही एक चर्चेचा विषय होता. आता तो फारसा राहिलेला नाही. त्याची जागा ‘एसएससी बोर्ड’ की ‘सीबीएसई’ की ‘आयसीएस’ बोर्ड या चर्चेनं घेतली आहे. 

Advertisement

नवीन दप्तर, पाण्याची बाटली, वह्या-पुस्तकं (आता पाटी नसते) अशा सरंजामासह हे छोटे मावळे  सकाळी सकाळी शाळेच्या युद्धावर जायला तयार होतात. भारी गोंडस दिसतात हे छोटे मावळे. पण शाळेची बस दिसली की हे मावळे भोंगा पसरून रडायला लागतात आणि सोडायला आलेले आई-बाबा दटावतात, ‘टीचर रागावतील हां, जास्त लाड करू नकोस. जा गुपचूप’. बसमधून टीचरही ‘आम्ही बघून घेतो काय करायचं ते’ असं सांगतात. इथूनच शाळा म्हणजे धास्ती, एकटय़ानं लढायची लढाई, असं काहीतरी मुलांच्या मनात येतं. आईच्या शाळेत मस्ती करणाऱ्या मुलाला, ‘इथे घरी लाड चालतायत, शाळेत मात्र तुला टीचर बरोबर वठणीवर आणतील,’ असं अगदी सहज सुनावलं जातं. पण ते करताना आपण शाळेविषयीच्या नकारात्मक भावनेचं बीज पेरतो आहोत हे आपण विसरूनही जातो.

 लहानग्या अक्षराची आई मात्र अक्षराला शाळेत दाखल व्हायच्या आधीच इतर शाळांच्या बस दाखवायला घेऊन जायची. वेगवेगळय़ा गणवेशांचे रंग दाखवायची, त्या बसमधल्या मुलांना टाटा करताना ‘हे सगळं किती आनंददायक असतं’ ते सांगायची. त्यामुळे अक्षराला शाळेत जायची उत्सुकता होती. तिला बळजबरी शाळेत कधीच पाठवावं लागलं नाही. ज्या मुलांच्या मनात शाळेविषयी, शिक्षकांविषयी लहानपणीच उत्सुकता असते ती ‘टाटा’ करतच शाळेला जातात. आईला सोडून नवीन शाळेत जाताना थोडी हुरहुर वाटणारच. थोडे दिवस रडू येणारच. पण काही जणांचं रडणं बराच काळ चालतं. त्याचा उगम शाळेविषयी मनात भरलेल्या धास्तीमध्ये असतो.

Advertisement

तर अशा या छोटय़ांचा अभ्यास सुरू होतो आणि भरपूर लाड करणारी आई शस्त्र घेऊन सज्ज होते! घरात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी अवस्था होऊन बसते. दहावीच्या मुलाच्या आईला आणि त्या छोटय़ाच्या आईला सारखंच ‘टेन्शन’ असतं आणि प्रत्येक आई ‘या अभ्यासाचं काय करायचं’ असं म्हणून डोक्याला हात लावून बसते. बघू या आपण काय करता येईल या अभ्यासाचं.. अभ्यास करायचा म्हणजे धडे वाचायचे, स्व-अभ्यासासाठी वेळ काढायचा किंवा अजून किती तरी उपाय आपल्याला म्हणजे पालकांना माहिती असतातच. पण आपण इथे मुख्यत्वे पालक काय करू शकतात, त्यांची भूमिका काय असावी, हे बघत आहोत. अभ्यासाच्या पद्धती इयत्ता वाढत जातील तशा बदलत जातील, विषय वाढत राहातील. पण एकदा अभ्यासाची गोडी लागली, की मग अभ्यासासाठी मुलांच्या मागे लागावं लागत नाही.

  साधारण सहा ते आठ-नऊ वर्षांच्या मुलांच्या झोपेला थोडं प्राधान्य द्यावं लागेल. शाळा, अभ्यास याव्यतिरिक्तही ही मुलं खूप शारीरिक दगदग करत असतात. तुम्ही त्यांना नुसती हाक जरी मारलीत तरी ती पळतच येतात. घरभर चालत, पळतच राहातात. शरीराची झालेली झीज मुलं गाढ झोपल्यावरच पूर्ण होते. अशा झोपेला आलेल्या मुलांना तुम्ही गृहपाठ करण्यासाठी जागं ठेवलंत, तर अभ्यासाची गोडी लागण्याऐवजी अभ्यासाला झोपेचा वैरी म्हणून बघितलं जातं. अभ्यासाची वेळ ही खेळाच्या, झोपेच्या, खाण्याच्या आड येणारी नसावी.

Advertisement

पहिलीत असणारी ओवी म्हणजे उत्साहाचा खळखळणारा झराच आहे. शाळेतून आल्यानंतर जेवण करून झोपलेली ओवी चार वाजेपर्यंत उठायची. झोप झाल्यावर तिचं सगळं लक्ष इमारतीच्या खाली खेळणाऱ्या मुलांकडे लागायचं. मुलं एकेक करून साडेपाचपर्यंत खेळायला यायची. नेमकी त्याच वेळी ओवीची आई ऑफिसमधून घरी यायची. आल्यानंतर लगेच ती ओवीला अभ्यासाला बसवायची, कारण नंतर तिला स्वयंपाकासाठी वेळ हवा असायचा. त्यामुळे रोज ओवीची चिडचिड व्हायची आणि आईचाही पारा चढायचा. प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती थोडीफार वेगळी असेल. पण ओवीची आई तिला खेळायला सोडून आधी त्या वेळेत स्वयंपाक करून ठेवू शकते. ओवीचं खेळणं झाल्यावर तिला घेऊन अभ्यासाला बसू शकते. पण आपलं वेळापत्रक मुलांवर लादलं की त्यातून विनाकारण गोंधळ होतो. त्याऐवजी परिस्थितीचा विचार करून वेळापत्रक ठरवलं, तर सर्वाचीच सोय होऊ शकते.

 अभ्यासाच्या वेळेबाबत आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते. ती म्हणजे घरातला टीव्ही. अनेक घरांत सात वाजल्यानंतर टीव्ही लावला जातो. विशेषत: ज्या घरांमध्ये आजी-आजोबा असतात, त्यांच्यासाठी टीव्ही हा त्यांचा खास सोबती असतो. एकामागे एक असा दोन-तीन वेगवेगळय़ा मालिकांचा रतीब असतोच. आजी-आजोबांना वाटतं, की आम्ही दिवसभर नातवंडांना सांभाळलं, आता तरी आम्हाला जरा निवांत बसून टीव्ही बघू द्या. मुलांसाठीही सक्रिय अभ्यास करण्यापेक्षा खरं तर रंगीबेरंगी टीव्ही निष्क्रियपणे बघत राहाणं जास्त सोपं असतं. ‘प्राथमिक शाळेच्या मुलांचा अभ्यास तो काय असणार’ असं म्हणून त्यांच्या अभ्यासाच्या वेळेला टीव्ही बंद केला जात नाही. मान्य आहे, त्यांचा अभ्यास खूप नसतो. पण महत्त्वाचा तर असतोच. शिवाय अभ्यासाची गोडी आणि शिस्त लागायचं वय हेच असतं. तेव्हा घरातल्या सगळय़ांनीच काहीतरी तडजोड करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे. ज्या घरांमध्ये अभ्यासासाठी टीव्हीपासून लांब जागा असेल तिथे काही प्रश्न नाही, पण जिथे अशी सोय नसेल तिथे मात्र आवर्जून प्रयत्न करावे लागतील. टीव्हीसमोर बसून केलेला अभ्यास म्हणजे न करण्यासारखाच आहे. कारण हातानं केलेला अभ्यास मेंदूपर्यंत प्रवास करत नाही. ही गोष्ट प्राथमिक शाळेच्या नाही, तर सर्वच वयोगटातल्या मुला-मुलींना लागू आहे.

Advertisement

काही घरांमध्ये मुलांसाठी हे सगळं केलं जातं. पण तिथे काही वेगळे घटक कारणीभूत असू शकतात. उदाहरणार्थ- कित्येक पालक मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून स्वत: त्यांच्या वहीत अभ्यास लिहून देतात. वर्तनशास्त्रानुसार शिक्षा ही चुकांना आळा घालण्यासाठी आणि बक्षीस हे योग्य वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी असतं. त्यामुळे आपल्या पाल्याला शिक्षा होऊ नये म्हणून स्वत: त्यांच्या अभ्यासात मदत करण्यापेक्षा एखाद्-दुसऱ्यावेळी मुलांना शिक्षा होऊ देणंच जास्त योग्य असतं. झालेल्या शिक्षेनंतर पाल्याला काय वाटलं याची चर्चा करून त्याचं ते वर्तन आपण निश्चितच बदलू शकतो. त्या बदललेल्या वर्तनाला बक्षीस देऊन प्रोत्साहन देऊ शकतो. हे बक्षीस वयानुसार वेगवेगळं असू शकतं.

पाचवीतल्या पलकला रोजच अभ्यास करायचा कंटाळा यायचा. स्वत: उत्तरं शोधून लिहिणंही तिच्या जिवावर यायचं. पलकची आई तिच्यावर राग राग करत का होईना, पण व्हॉट्सअ‍ॅपवरून कोणाची तरी उत्तरं मागवून घ्यायची. केवळ उत्तरंच नाही, तर निबंधही अशा प्रकारे मागवले जायचे. अशानं आई पलकला शिक्षेपासून तर वाचवायची, पण उत्तरं शोधून लिहायची पद्धत पलकला कधी समजलीच नाही. त्याचा फटका पुढे आठवी-नववीत बसू लागला.

Advertisement

  मागच्या पिढीत फक्त दहावीलाच ‘पेपर पॅटर्न’वगैरे विषय निघायचा. पण आता पाचवी-सहावीपासून मागच्या वर्षांचे पेपर मागवले जातात. त्यातून कोणते प्रश्न विकल्पाला टाकता येतील हे पाल्याला शिकवलं जातं. मुलाला परीक्षेसाठी कमी आणि नेमका अभ्यास करून जास्त गुण कसे मिळवायचे या युक्त्या शिकवल्या, तर त्याचा तात्कालिक लाभ होईल कदाचित, पण दीर्घकाळात त्याचा तोटाच होतो. कारण या विकल्पांच्या नादात विषयाचा काही भाग नेहमीच कच्चा राहातो. माझ्याकडे समुपदेशनाला आलेली एक पहिली-दुसरीतली मुलगी शाळेत जायला अचानक नकार देऊ लागली होती. दोन सेशन्सनंतर तिनं एकदा हळूच सांगितलं, की १९ चं स्पेलिंग किती मोठं आहे, त्यापेक्षा २० जास्त अवघड असेल. त्यामुळे शाळेत न गेलेलं बरं, असा निर्णय तिनं घेतला होता. अशा वेळी तिला शब्द फोडून दाखवून सोपा करून दाखवला, तर वेळीच मदत होऊ शकते. असाच प्रश्न पचनसंस्थेचा अभ्यास करताना मुलांना येतो. एका शिक्षिकेनं एका मुलाला वर्गाच्या मधोमध झोपवलं आणि खडूनं त्याच्याभोवती बाह्यरेषा काढून शरीराचा आकार तयार केला. मग एक शेंगदाणा त्या आकारात तोंडातून पायरी पायरीने कसा पचनसंस्थेतून जातो हे दाखवत खाली आणला. पुस्तकातल्या आकृत्यांमध्ये कठीण वाटणारा हा विषय या शिक्षिकेनं अगदी सोपा करून सांगितला. निनाद शाळेतून आल्यावर त्याची आई त्याला काय शिकवलं हे तोंडी सांगायला लावायची. भाषा विषयाचे धडे तो गोष्टीसारखे आईला सांगायचा. त्यातून आपोआप निनादची उजळणी व्हायची.

नोकरी-व्यवसाय तर प्रत्येकालाच करावा लागतो, पण ज्याला ते काम आवडतं त्याच्यासाठी ते आठ-नऊ तास आनंददायक असतात. त्याचप्रमाणे ज्याला वर्गात शिकवलेलं समजतं, अभ्यास वेळेवर पूर्ण झालेला असतो, त्याला शाळा किंवा अभ्यास जाचक वाटत नाही. काही वेळा काही विषयांचा अभ्यास व्यक्तीपरत्वे अवघड वाटू शकतो. पण त्यात पालकांनी मदत केली, तर त्या विषयांतही आवड निर्माण होऊ शकते. मानसशास्त्रामध्ये स्मृतितंत्र नावाचा एक भाग सांगितला आहे. या स्मृतितंत्रांपैकी एक आदि-अंत परिणाम सांगितला जातो. सुरूवातीला वाचलेलं किंवा पाहिलेलं आपल्याला नीट लक्षात राहातं, मधला भाग मात्र जास्त लक्षात राहात नाही. म्हणून अवघड भाग अभ्यासाच्या सुरूवातीला किंवा शेवटी करावा. त्यानं लक्षात राहायला मदत होते. चित्रपटांमधली गाणी आठवा- समूह नृत्यात कितीही कलाकार असले तरी आपल्याला हिरो किंवा हिरॉईनच लक्षात राहातात, कारण त्यांना वेगळे कपडे तरी दिलेले असतात किंवा त्यांच्यात काहीतरी वेगळं केलेलं असतं. हाच नियम अवघड प्रश्नांना लावता येतो. वेगळय़ा पानावर वेगळय़ा पद्धतीनं लिहिलेलं जसंच्या तसं परीक्षेत आठवू शकतं.

Advertisement

 अभ्यासाची गोडी लागायला विषय सोपा नसला तरी तो तसा वाटला पाहिजे. आमचे सोलापूरचे गणिताचे जगताप सर अवघड गणित फळय़ावर पूर्ण सोडवून दाखवायचे आणि शेवटी विशिष्ट लयीत ‘अरे झालं पण गणित, हाय काय नाय काय!’ असं म्हणायचे. मला खरंच ते गणित सोपं असेल असं वाटायचं. तसंच ‘पाय बाय टू’ म्हणताना ‘काय बाय तू, काय बाय तू’ अशी मजा करायचे. अशी कित्येक तंत्रं आपल्याला अभ्यासामधून मिळू शकतील किंवा तुमच्या आजूबाजूला मानसशास्त्रातली तज्ज्ञ मंडळी असतील तर तेही मार्गदर्शन करू शकतात. अभ्यासाचं वय पाचपासून किमान २२ ते २३ वर्षांपर्यंत तरी असतं. आयुष्याचा एवढा मोठा काळ मुलांनी तणावात घालवण्यापेक्षा आनंदानं घालवण्यासाठी आपली भूमिका समजून घेत पालकांनी सक्रिय सहभाग घेतला, तर पाल्य आणि पालक या दोघांसाठीही ते महत्त्वाचं आणि उपयोगाचं ठरेल.

[email protected]

Advertisement

Source link

Advertisement