दुसऱ्या बाजीरावाने रेशमाचें कापड काढणाऱ्या व विकणाऱ्यांना पैठण व नाशिक जिल्ह्यातील येवले येथून पाचारण केले व पुण्यास स्थायिक होण्यास सांगितले. पुण्यातील रेशमी कापडाच्या उत्पादनाची हीच सुरवात आहे असे मानावयास हरकत नाही.
परंतु हे विणकर पुण्यास येवून आपल्या धंद्याचा जम बसवितात न बसवितात तोच ह्या धंदयास मोठा धक्का बसला. सन १८१८ मध्ये मराठी राज्याचा अस्त झाला. त्यानंतर पुण्याचे जीवन विस्कळीत झाले. तलम रेशमी कापडाला आश्रय देणारा मातब्बर वर्गच नष्ट झाला.
पुढे सन १८५० नंतर पुणे जसे स्थिरावू लागले तसा पुन्हा हा धंदा डोके वर काढू लागला. सन १८८४ ला ह्या धंद्याची स्थिती पुष्कळशी चांगली होती. त्यावेळी ११०० ते १३०० माग चालू होते. या मागावर रेशमी व सुती अशी दोन प्रकारचे कापड निघत होते.
या दोनपैकी रेशमाचा धंदा मोठ्या तेजीत होता. या हातमागाच्या धंद्यात त्यावेळी ५०० ते ८०० कामगार काम करीत. पुण्यास त्यावेळी इतके चांगले रेशमी कापड निघत होते की, येवल्या सारख्या सुप्रसिद्ध रेशीम केंद्रास मागे टाकले होते. पुण्यास त्याकाळात रेश्माचा सुमारे अडीच लाखांच्या दरम्यान व्यापार चालत असे.