maharashtra politics crisis hindutva and secularism in maharashtra politics zws 70गिरीश कुबेर

Advertisement

सध्या महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या राजकारणात जी धुमश्चक्री सुरू आहे, त्यासाठी जी कारणं पुढे केली जात आहेत ती पाहता हिंदुत्व आणि सेक्युलॅरिझम यांच्यातली ही लढाई आहे असं भासवलं जात आहे. परंतु डोळे नीट उघडे ठेवून पाहिलं तर सगळ्याच पक्षांतील राजकारण्यांचा रंग एकच असल्याचं लक्षात येईल. फक्त काळानुरूप त्याचा पासवर्ड बदललाय, इतकंच!

साधारण तीस वर्षांपूर्वीची.. १९९०-९१ सालची ही गोष्ट. राजकारणात मंडलचे वारे चांगलेच तापू लागले होते. विषय आरक्षणाचा. त्यामुळे समाजकारणही तापू लागलं होतं. त्याच्या मुळाशी होतं लालकृष्ण अडवाणींचं बाबरी मशीद आंदोलन. मार्गदर्शन मंडळात पाठवून नखं आणि दात काढलेल्या सिंहासारखे निरुपयोगी ठरायच्या आधीचे ते अडवाणी! त्यांच्यामुळे हिंदुत्वाच्या शिडात चांगलीच हवा भरली गेलेली. युतीच्या नावानं त्यातला काही वारा आपल्याकडे वळवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांनाही चांगलंच यश येऊ  लागलं होतं. अडवाणी-वाजपेयींचा भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंची सेना हे समीकरण अधिकाधिक मजबूत होत होतं, तो हा काळ.

Advertisement

त्या हिंदुत्वाच्या भगव्या काळावर पहिला मोठा ओरखडा ओढण्याची हिंमत दाखवली छगन भुजबळ यांनी. मुंबईचं महापौरपद भूषवलेले, सीमालढय़ात नाटय़पूर्ण शिवसेनागिरी केलेले भुजबळ नुकतेच नावारूपाला येत होते. अशा वेळी त्यांनी थेट शिवसेनेच्या गुहेत जाऊन बंडाचा झेंडा फडकावला. बाळासाहेब ठाकरे ऐन भरात असतानाची त्यांची ही कृती खचितच शौर्य पुरस्कारास पात्र ठरवणारी. त्यांच्यामागे अर्थातच त्यावेळच्या अभेद्य काँग्रेसचे तितकेच समर्थ शरद पवार होते हे आहेच. पण तरी भुजबळांची कृती नि:संशय धाडसाची होती. त्यांनी शिवसेना सोडून थेट काँग्रेसमध्ये जाणं हे धक्कादायक होतं.

यथावकाश भुजबळ काँग्रेसमध्ये रूळले. सेना-भाजप सरकार सत्तेवर असताना दादरमधलं किणी प्रकरण पुढे आलं. फार गाजलं त्यावेळी. त्यात राज ठाकरे यांच्यावर बालंट आलं होतं. जातीय, धर्माध वगैरे अशा सत्ताधारी सेना-भाजपविरोधात पुरोगाम्यांच्या लढाईत तेव्हा बिनीचे शिलेदार होते हे छगन भुजबळ. अगदी पुष्पा भावे प्रभृतींनाही निकटचे वाटावेत इतकं पुरोगामित्व एकेकाळच्या जातीयवादी सेनेचे भुजबळ यांनी आत्मसात केलं होतं. आज ही आठवण अनेकांसाठी ठसठसणारी ठरेल; पण त्यावेळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत, संपादक आदींनी भुजबळ यांचा इतका उदोउदो केला, की एकेकाळच्या सेनेतले लढवय्ये वगैरे भुजबळ ते हेच का, असा प्रश्न पडावा. वातावरणाची पण एक गंमत असते. ते तापवलं गेलं की आपल्याच अंगची उष्णता वाढल्याचं ते भान नसणाऱ्यांना वाटू लागतं. म्हणजे ‘मी सूर्याचा घोट घेतला..’ वगैरे. सुदैवानं तसं काही भुजबळ यांचं झालं नाही. पण तरीही त्यांनाही या पुरोगामित्वाची नशा चढली असणार. त्यामुळे आपण खरोखरच तसे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांनाच तुरुंगात टाकण्याचा घाट घातला. नवधर्मातरित अधिक जोरात बांग देतो, तसंच हे खरं तर. पण हे लक्षात घेण्याइतकं भान कोणालाच नव्हतं. त्यात ठाकरे यांना अटक कशासाठी? तर आठ-नऊ  वर्षांपूर्वी घडून गेलेल्या भयानक मुंबई दंगलींसाठी!

Advertisement

त्याबाबतचा श्रीकृष्ण समितीचा अहवाल खरं तर पूर्णपणे स्वीकारून ही कारवाई झाली असती तर ती निश्चितच स्वागतार्ह ठरली असती. पण इतकं खोलात कोणालाच जायचं नव्हतं. आणि ते तसं कधीच जायचं नसतं. मुद्दा वेळ साजरी करण्याचा असतो. खोलात वगैरे जाणं झेपत नाही त्यामुळे. त्यावेळी भुजबळांचा जोष होता तो आपण ‘हिंदुहृदयसम्राटां’स अटक करू शकतो हे सिद्ध करण्यापुरताच. म्हणजे दंगलीतल्या बळींना न्याय मिळावा, दोषींना शासन व्हावं असं काही नाही. नंतर एका वाहिनीला शिवसेना शैलीत हाताळायला गेलेल्या भुजबळांचं मंत्रिपद खुद्द पवारांनी काढून घेतलं, तेलगी प्रकरण निघालं, वगैरे वगैरे. पण एव्हाना भुजबळ हे सेक्युलरांच्या कळपात स्थिरावले होते.

हे ही वाचा : पाणी शिरू लागले… फुटीच्या धोक्याची पूर्वसूचना देणारा १३ जूनचा लोकसत्ताचा अग्रलेख

Advertisement

त्यानंतर काही वर्षांनी नारायण राणे यांच्याबाबतही पुन्हा तेच. वास्तविक राणे यांचा भूतकाळ हा अधिकृत इतिहासापेक्षा राजकीय फडांमधल्या ‘नाव न छापायच्या’ अटीतला विषय. तेही सेनाशैली पूर्णपणे अंगी मुरलेले. किती, ते समजून घ्यायची इच्छा असलेल्यांनी कणकवली वगैरे परिसरात संशोधन करावं. अशी अनेक प्रकरणं आहेत. या त्यांच्या   सेना आणि त्यातही ठाकरेनिष्ठेमुळेच मनोहरपंत जोशी यांच्या हाती श्रीफल देऊन ‘कोकणचो सुपुत्र’ नारायणाक मुख्यमंत्री करण्याची वेळ ठाकऱ्यांवर आली. त्याचा परिणाम असा की, तेव्हापासून प्रत्येक लहानसहान शिवसैनिकास आपणही मुख्यमंत्रीपदाचे ऐवज आहोत असं वाटू लागलं, हे सोडा. पण त्यामुळे हिंदुत्ववादी सेनेला आणखी धार आली हे नाकारता येणार नाही. परंतु हिंदुत्वाच्या दुर्दैवाने म्हणा किंवा सेनेच्या कमनशिबामुळे म्हणा; राणे पुन्हा काही मुख्यमंत्री होऊ  शकले नाहीत. तेव्हापासून त्यांची रयाच गेली. मुख्यमंत्रीपदाची चव तर लागलेली, आणि ते मिळालं (तर) देण्याच्या मन:स्थितीत सेना नेतृत्व नाही, अशी परिस्थिती झाल्यावर नारायणरावांनाही सेना सोडण्याखेरीज पर्याय राहिला नाही.

मग ते गेले एका धर्मवादी पक्षातून एकदम निधर्मी, सेक्युलर, सहिष्णु अशा काँग्रेसमध्ये! त्यावेळेस सोनिया दरबारात सादर झाल्यानंतरचे त्यांचे अनुभव प्रस्तुत लेखकाप्रमाणे अनेक पत्रकारांनी अनुभवले असतील. महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या सरकारात ते मंत्रीही झाले. खरं तर त्यांच्या म्हणण्यानुसार, ते मुख्यमंत्रीच व्हायचे. पण नेम चुकला. काँग्रेसचा आणि त्यांच्या वतीनं तो धरणाऱ्यांचाही! अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अशा अनेक सेक्युलर नेत्यांच्या मंत्रिमंडळातही नारायणराव होते. त्यांचं हे निधर्मीत्व त्यावेळी इतकं आंजारलं-गोंजारलं गेलं की महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्वच त्यांच्याकडे द्यायला हवं यासाठी अनेकांनी जोमानं प्रयत्न केले. थोडक्यात, भुजबळांइतका नसेल कदाचित, पण पुरोगाम्यांच्या वर्तुळात नारायणरावांनाही चांगला मानमरातब होता त्यावेळी. नंतर त्यांचं काय झालं त्याचा इतिहास इथं मांडण्याचं काही कारण नाही. तो घडतो आहेच.

Advertisement

यांच्या जोडीला महाराष्ट्रात सर्वदूर फारसं काही स्थान नसलेले, पण नवी मुंबईचे संस्थानिक म्हणजे गणेश नाईक. तेही पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते. त्यांच्यावर त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची.. आणि नंतर ते ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची.. किती कृपादृष्टी होती याची साक्ष नवी मुंबईतले इमले आणि त्याहीपेक्षा उघडेबोडके डोंगर देतील. पण भुजबळ, राणे यांच्याप्रमाणे त्यांचंही सेनेत फाटलं. मग ते आपला सर्व गोतावळा घेऊन आधी राष्ट्रवादीत गेले आणि नंतर ‘जय श्रीराम’ म्हणत भगवे उपरणे लेऊ  लागले. त्यांच्या आणि राज्याच्या सुदैवाने त्यांना नवी मुंबईच्या पलीकडे फारसा रस नाही. त्यामुळे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर त्यांच्या पुरोगामित्वाच्या दर्शनाने महाराष्ट्राचे डोळे फारसे काही दिपले नाहीत. कदाचित असंही असेल, की त्यांनी वाऱ्याची दिशा आधीच ओळखत पुरोगामित्वाला राम राम करत श्रीरामभक्तांचा आधार घ्यायचं ठरवलं. सध्या ते आदरणीय कृपाशंकर, प्रवीण दरेकर वगैरे प्रभृतींच्या बरोबरीने हिंदुहितरक्षणासाठी कंबर कसून प्रयत्न करताना दिसतात. महाराष्ट्रातली आणखीही अशी काही उदाहरणं देता येतील.

राज्याबाहेरची तर बरीच असतील. काही काही तर फारच भारी आहेत त्यातली. उदाहरणार्थ, ज्या आणीबाणीच्या नावे खडे फोडत विरोधकांना स्वत:च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यप्रेमाचे गोडवे गाता येतात, त्या आणीबाणीचे सूत्रधार विद्याचरण शुक्ल. या गृहस्थानं साक्षात् अडवाणी यांना तुरुंगात डांबलेलं. त्यामुळे भाजपला त्यांना धडा शिकवायचा होता. त्यासाठी असेल बहुधा, पण भाजपनं त्यांना आपलं म्हटलं. आणीबाणीचा हा खलनायक भाजपवासी झाला. देशातल्या भ्रष्टाचाऱ्यांचे शिरोमणी सुखराम यांनाही भाजपतच मोक्ष मिळाला. हिंदू संस्कृतीत लक्ष्मीचा अपमान करत नाहीत. शेषशायी विष्णूचे पाय भले ती चुरत असेल, पण मर्त्य मानवांनी तिचा योग्य तो आदर करायचा असतो. पण सुखराम या लक्ष्मीस पायदळी तुडवत निवांत अंगाखाली घेत. अन्य पक्षांतील उपयुक्तता संपल्यानंतर त्यांनाही हिंदुत्वाची ओढ लागली आणि तेही भाजपवासी झाले. वास्तविक धर्म हा काही पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस या पक्षाच्या राजकारणाचा धर्म नाही. त्या पक्षास ते परवडणारेही नाही. याचं कारण त्या राज्यातील अन्यधर्मीयांची संख्या! वंगभूमीच्या मातीत रुजू पाहणाऱ्या भाजपस या तृणमूलच्या घट्ट मुळांमुळे मूळ धरता येत नव्हतं. मग शारदा चीट फंड नावाचा घोटाळा आला. तो भव्य असल्यामुळे आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपनंही तसा आरोप केल्यामुळे त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली. दोषी अर्थातच तृणमूलचे नेते होते. यथावकाश त्यातल्या काहींच्या मनात हिंदुधर्महिताची भावना जागृत झाल्यामुळे ते भाजपत आले. काहींनी मात्र ममतांची साथ सोडली नाही. यानंतरचा योगायोग असा की या घोटाळ्याच्या आरोपपत्रातून भाजपत जे आरोपी आले, नेमकी त्यांचीच नावं गळाली. उर्वरितांवर मात्र पुढच्या चौकशीचे सोपस्कार रीतसर सुरू झाले. यातही परत योगायोग आहेच. म्हणजे आरोपी क्रमांक एकचंच नाव कारवाईच्या कचाटय़ात नाही. दोन, तीन, चार वगैरेंवर मात्र कारवाई. आरोपी क्रमांक एक भाजपत गेला, हा नंतरचा योगायोग. विविध राज्यांत काँग्रेसच्या, त्या त्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या डळमळीत झालेल्या राहुटय़ांत राहायचा कंटाळा आला, काही प्रकरणं उघडकीस आली की अनेकांना हिंदुत्वाची आठवण येते. आणि मूळचाच उदार असल्यानं या धर्माचा जागर करत भाजपत दाखल झाले की अशा सर्वाचं पुनर्वसन होतं. याचे अगणित नाही तरी असंख्य दाखले देता येतील.

Advertisement

पण ते देण्यामागे अमुक एक पक्ष असा आहे वा तमुक तसा आहे, असं दुरंगी चित्रीकरण करणं हा हेतू दुरान्वयानेही नाही. उलट, वास्तव याच्या विरुद्ध आहे. ते म्हणजे राजकीय पक्षांत हा एका रंगाचा, तो दुसऱ्या रंगाचा वगैरे प्रकारच नाहीत. सर्व एका रंगाचेच. ‘अवघा रंग एकचि झाला..’ असं म्हणावं अशा एकाच रंगाचेच सर्व. हे जर सत्य असेल तर.. आणि ते आहेदेखील.. तर गेल्या पाऊण दशकात आपल्या राजकारणात नक्की बदल काय झाला?

हा प्रश्न गेल्याच आठवडय़ात सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर संगणक क्षेत्रातल्या एकाशी गप्पा मारताना आला. त्यानं दिलेलं स्पष्टीकरण चपखल आहे. तो म्हणाला, ‘खेळ तोच आहे, फक्त पासवर्ड बदललाय! आता आतापर्यंत कोणीही सोम्या, गोम्या किंवा ढोम्या ‘सेक्युलर’ हा पासवर्ड वापरायचा आणि सहज काँग्रेस किंवा तशा पक्षात जायचा, तेव्हा तो पासवर्ड चालायचा. आता तो किंवा तसाच कोणताही सोम्या, गोम्या किंवा ढोम्या ‘हिंदुत्व’ हा पासवर्ड वापरतो आणि त्याच्या ईप्सित ठिकाणी पोहोचतो. म्हणजे खेळ तोच आहे, खेळणारेही तेच आहेत. बदललाय तो फक्त पासवर्ड..’ इतकंच!

Advertisement

wgirish.kuber@expressindia.com

@girishkuber

Advertisement

Source link

Advertisement