चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यापुढे आयपीएल २०२२च्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. याच मोसमात चेन्नईचे नेतृत्व करणाऱ्या जडेजाला आयपीएल २०२२च्या उर्वरित सामन्यांमधून वगळण्यात आले आहे आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने याची अधिकृत घोषणा केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, रवींद्र जडेजाच्या बरगडीला दुखापत झाली आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तो चेन्नई सुपर किंग्जसाठी उपलब्ध नव्हता. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता आणि वैद्यकीय सल्ल्याने त्याला आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी वगळण्यात आले आहे. या मोसमात रवींद्र जडेजाने आठ सामन्यात कर्णधारपद भूषवले, ज्यामध्ये संघाला फक्त दोनच सामने जिंकता आले.
रवींद्र जडेजासाठी हा मोसम चांगला गेला नाही. जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद एमएस धोनीने आयपीएल २०२२ पूर्वी सोपवले होते. परंतु यादरम्यान ना संघ चांगली कामगिरी करू शकला ना जडेजा. जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीतही मैदानावरही संघर्ष करताना दिसला. दबावाखाली जडेजाकडूनही झेलही सुटले. यामुळेच त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले.
चेन्नई सुपर किंग्जचे प्लेऑफचे गणित
चेन्नई सुपर किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यात ४ विजय आणि ७ पराभवांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जने उर्वरित तीनही सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत असतील. मात्र, त्यानंतर त्याला नेट रन रेट आणि इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल.