effects of failure of gslv space avakash dd 70


प्रक्षेपण अयशस्वी ठरल्यामुळे आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) पुढचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

अमिताभ सिन्हा – response.lokprabha@expressindia.com
महासाथीमुळे बराच काळ खंडित असलेल्या भारतीय अंतराळ मोहिमा जीएसएलव्ही- एफ१०च्या प्रक्षेपणापासून पुन्हा वेग घेतली अशी अपेक्षा गेल्या आठवडय़ापर्यंत व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रक्षेपण अयशस्वी ठरल्यामुळे आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) पुढचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अपयशामुळे एक महत्त्वाचा उपग्रह तर वाया गेलाच, शिवाय यामुळे भविष्यातल्या काही अतिशय महत्त्वाच्या मोहिमांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपयशाला कारणीभूत ठरलेला बिघाड किती गंभीर होता, हे इस्रोने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

भूनिरीक्षण उपग्रह (अर्थ ऑब्झव्‍‌र्हेशन सॅटेलाइट – ईओएस-०३) १२ ऑगस्टच्या पहाटे प्रक्षेपित करण्यात आला. प्रक्षेपणानंतर साधारण पाच मिनिटांनी तो त्याच्या नियोजित कक्षेबाहेर भरकटला. प्रक्षेपकाचे पहिल्या दोन टप्प्यांचे काम नियोजनानुसार पार पडले. मात्र अतिशय कमी तापमानात द्रवरूप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या साहाय्याने चालणारे क्रायोजेनिक इंजिन सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे पुढील प्रवास सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण करण्यात प्रक्षेपक अपयशी ठरला. परिणामी प्रक्षेपकाचे आणि उपग्रहाचे भाग पृथ्वीच्या दिशेने येऊ लागले. ते अंदमानजवळच्या समुद्रात कोसळले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

या प्रक्रियेत भारतीय भूभागाच्या निरीक्षणाची क्षमता असलेला अतिशय प्रभावी उपग्रह वाया गेला. हा उपग्रह मार्च २०२० मध्ये प्रक्षेपित करण्याचे नियोजन होते, मात्र सुरुवातीला तांत्रिक समस्यांमुळे आणि नंतर महासाथीमुळे प्रक्षेपण लांबणीवर पडले. या उपग्रहाद्वारे पाठवण्यात येणारी छायाचित्रे तुलनेने लहान आकाराची असली, तरी ती सातत्याने मिळत राहणार होती. त्याद्वारे भारताच्या भूभागावर विशेषत: पूर, चक्रीवादळ, जलस्रोत, पिके, वनस्पती  नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवणे शक्य होणार होते. ही मोहीम मुख्यत्वे क्रायोजेनिक स्तरात उद्भवलेल्या बिघाडामुळे अपयशी ठरली, एवढेच इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले.

चूक कुठे झाली?

या प्रक्षेपकात क्रायोजेनिक स्तरावर बिघाड होणे ही काही नवी बाब नाही. एप्रिल २०१० मध्ये जीएसएलव्ही- डी३मध्येही असाच बिघाड झाला होता. त्या वेळी प्रक्षेपकात रशियन इंजिनाच्या आराखडय़ांनुसार निर्माण करण्यात आलेले भारतीय बनावटीचे पहिलेच क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले होते. जीएसएलव्ही- एफ१०मधील इंजिनाचे त्या इंजिनाशी बरेच साधम्र्य आहे. त्या वेळीही क्रायोजेनिक इंजिन सुरू झाले नव्हते. त्यानंतर आठ महिन्यांनी पुन्हा जीएसएलव्ही प्रक्षेपकाचा वापर करून मोहीम आखण्यात आली होती. त्या वेळी रशियन क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आला होता. रशियाने १९९०च्या कराराचा भाग म्हणून दिलेल्या इंजिनांतील ते शेवटचे इंजिन होते आणि तेदेखील अपयशी ठरले.

Advertisement

तेव्हापासून आजवर भारताने हाती घेतलेल्या मोहिमांचा विचार करता, जीएसएलव्ही एमके-२ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने सहा मोहिमा राबवण्यात आल्या. या सर्व मोहिमांत भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन ऊध्र्वस्तरात वापरण्यात आले होते. यातील शेवटचे इंजिन डिसेंबर २०१८ मध्ये जीसॅट- ७ए या संपर्क उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आले. त्यामुळे क्रायोजेनिक इंजिनाची चिंता आता भूतकाळात जमा झाली आहे, असे वाटू लागले असतानाच गेल्या आठवडय़ातील घटनेमुळे या समस्येने पुन्हा डोके वर काढले.

येत्या वर्षांत जीएसएलव्ही एमके-३चा समावेश असलेल्या कोणत्याही नियोजित मोहिमा नाहीत. तरी २०२२ आणि २०२३ मध्ये या प्रक्षेपकाचा समावेश असलेल्या अनेक मोहिमा आखण्यात आल्या आहेत. वैज्ञानिकांच्या मते, हा केवळ बिघाड असल्यास या प्रक्षेपकाच्या आधारे आखण्यात आलेल्या यापुढच्या मोहिमांच्या वेळापत्रकात फारसा बदल होण्याची चिंता नाही. परंतु गंभीर समस्या असल्यास मानवी अवकाश प्रवासासारख्या महत्त्वाच्या मोहिमाही पुढे ढकलाव्या लागण्याची भीती आहे.

Advertisement

भविष्यातील मोहिमांवरील परिणाम

गगनयान आणि चांद्रयानसारख्या मोहिमा जीएसएलव्ही एमके-३च्या साहाय्याने राबवण्यात येणार आहेत. हा जीएसएलव्ही वर्गातील अधिक वजनदार पेलोड्स (अवकाशात नेण्याचे साहित्य) वाहून नेण्याची क्षमता असलेला प्रक्षेपक आहे. या प्रक्षेपकातही भारतीय बनावटीचे ऊध्र्वस्तरीय क्रायोजेनिक इंजिन आहे, मात्र ते जीएसएलव्ही एमके-२च्या इंजिनापेक्षा वेगळे आहे. सीई-२० म्हणून ओळखले जाणारे हे इंजिन तीन दशकांपेक्षा अधिक काळ केलेल्या संशोधन आणि विकासाचे फलित आहे. यात इंधनाच्या ज्वलनासाठी वेगळी पद्धत अवलंबण्यात आली आहे. या इंजिनांचे इस्रोच्या एरियन या जुन्या प्रक्षेपकांतील इंजिनांशी साधम्र्य आहे. हे प्रक्षेपक वजनदार उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी वापरले जात.

हे भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान असल्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांना त्यातल्या तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती आहे. जीएसएलव्ही एमके-३च्या साहाय्याने आजवर तीन मोहिमा यशस्वीरीत्या राबवण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये राबवण्यात आलेल्या चांद्रयान-२ मोहिमेचाही त्यात समावेश होता.

Advertisement

जीएसएलव्ही- एफ१०च्या अपयशाचा गगनयान किंवा चांद्रयान मोहिमांवर थेट परिणाम होण्याची फारशी शक्यता नाही. मात्र या मोहिमांसाठी, विशेषत: गगनयान मोहिमेसाठी करण्यात येणाऱ्या काही चाचण्यांत हे प्रक्षेपक वापरले जाऊ शकतात. तसे झाल्यास मोहिमांचे वेळापत्रक विस्कळीत होऊ शकते.

निसार

नासा आणि इस्रोने प्रथमच एकत्रितपणे हाती घेतलेल्या निसार या मोहिमेंतर्गत भूनिरीक्षण उपग्रह विकसित करण्यात येत आहे. या मोहिमेवर जीएसएलव्ही- एफ१०च्या अपयशाचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. यात संपूर्ण पृथ्वीचे १२ दिवसांत निरीक्षण करण्यासाठी दोन सिंथेटिक अपार्चर रडार्स वापरण्यात येणार आहेत. जीएसएलव्ही एमके-२ प्रक्षेपकाचा समावेश असलेली ही अतिशय महत्त्वाची मोहीम आहे.

Advertisement

पृथ्वीवरच्या परिसंस्थांतील बदलांच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि बायोमास, नैसर्गिक आपत्ती, समुद्राच्या पाणीपातळीतील वाढ आणि भूजल याविषयीची माहिती मिळण्यासाठी हाती घेण्यात आलेली ही बहुप्रतीक्षित मोहीम आहे. याद्वारे संशोधकांना पृथ्वीच्या पृष्ठभागाचा नियोजनबद्ध नकाशा तयार करण्यास मदत होणार आहे. कृषीविषयक माहिती, हिमालयातील हिमनद्यांचे निरीक्षण, वारंवार दरडी कोसळणारे भाग आणि किनारपट्टीतील बदल अशा विविध कामांसाठी इस्रोला निसारचा उपयोग करून घेता येणार आहे.

यासाठी नासा एक सिंथेटिक अपार्चर रडार (एल-बॅण्ड) वापरणार असून दुसरा रडार इस्रोकडून (एस-बॅण्ड) येणार आहे. नासा संपर्क आणि नियंत्रणाशी संबंधित यंत्रणा देणार असून प्रक्षेपण आणि त्या संदर्भातील सेवा ही इस्रोची जबाबदारी असणार आहे. सध्या तरी निसार २०२३ मध्ये श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्याचे नियोजित आहे. या प्रक्षेपणाला इस्रोने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. नुकताच झालेला अपघात, हे या मोहिमेच्या दृष्टीने एक आव्हानच आहे त्यामुळे जीएसएलव्ही- एमके२ प्रक्षेपकांत क्रायोजेनिक स्तरावर उद्भवणाऱ्या समस्यांचा पुन्हा सखोल अभ्यास करावा लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

(द इंडियन एक्स्प्रेसमधून)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement