शिवाजी महाराज आणि पुणे
इ.स. १६३१ साली विजापुरच्या मुरार जगदेवाने पुणे प्रांत काबीज केला. त्याने लुटमार व जाळपोळ करून सर्व पुणे उध्वस्त केले. जाताना त्याने पुण्यावरुन गाढवाचा नांगर फिरविला. त्याच सुमारास पुण्यास मोठा दुष्काळ पडला व पुणे व अवतीभवतीचा प्रदेश निर्मनुष्य झाला.
पुढे इ.स. १६३६ साली आदिलशहाने शहाजी महाराजांना पुणे व सुपे ह्या जहागिरी दिल्या. शहाजी राजांनी १६३७ साली दादाजी कोंडदेवास पुण्यास पाठविले. गाढवाचा नांगर फिरविल्यामुळे येथे भुतेखेते, चेटूक राहतात अशी लोकांची समजुत होती, त्यामुळे पुण्यास व आजुबाजुस कोणी फिरकण्यास तयार नव्हते.
लोकांची ही समजुत काढुन टाकण्यासाठी धार्मिक विधी करुन गावावरुन सोन्याचा नांगर फिरविण्यात आला. लोकांना येथील पेठांचे पाच वर्षाचे कौल देण्यात आले. आसपासच्या जमिनी लागवडी खाली आणण्यात आल्या. शिवाजी महाराज जिजाबांई समवेत पुण्यास असल्यामुळे त्यांच्यासाठी ‘लाल महाल’ एक छोटेखानी पण सुंदर राजवाडा बांधण्यात आला. आजच्या पुण्याचा पाया याच काळात घातला गेला.
शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेच्या उद्द्योगाला येथुनच सुरवात केली. शिवाजी महाराजांना आदिलशहा व दिल्लीच्या बादशहाशी सतत सामना करावा लागला.
पुढे १६६० ला मोगल सेनापती शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला व पुणे ताब्यात घेवुन ‘लाल महालात’ आपला मुक्काम ठोकला. इ.स. १६६३ ला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानास आपल्या कौशल्याने आणि पराक्रमाने सळो की पळो करुन सोडले व त्यास पुणे सोडण्यास भाग पाडले.
पण पुढे शिवाजी महाराजांनी आपली राजधानी पुण्याहुन रायगडास हलविली कारण पुणे लष्करी दृष्ट्या अगदी सपाट प्रदेशावर होते. अशा ठिकाणी शत्रुशी मुकाबला करणे कठीण होते. शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर स.न. १७२० पर्यंत पुण्याचे ऐतिहासीक महत्व बेताचेच राहिले.