पेशव्यांच्या काळात पुणे शहरात दारुगोळा तयार करण्याचे काम खुप मोठ्या प्रमाणावर चालत असे. सन.१७३९ साली एका फ्रेंच प्रवाश्याने येथील या व्यवसायाची फार तारीफ केली होती. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात पुण्यातील तोफेचे गोळे प्रसिद्ध होते.
सुरवातीला अॅम्युनिशन फॅक्टरी मुंबईलाच होती, परंतु मुंबई समुद्र किनाऱ्या वरील बंदर असल्याने या फॅक्टरीला शत्रू पासून धोका होता. शत्रूच्या मनात आल्यास ही फॅक्टरी भस्मसात करणे बंदरात सहज शक्य होते.
शत्रू पासून बचाव करावा व संभाव्य धोका टळावा म्हणून सरकारने ही फॅक्टरी मुंबईहुन हलवून पुण्यास आणण्याचा निर्णय घेतला कारण पुणे हे बंदरा पासून दूर असलेले ठिकाण होते.
पुण्यास ही फॅक्टरी हलविण्याचे ठरल्यानंतर सरकारने खडकी भागातील जागा त्यासाठी निवडली कारण शहरातील नागरिक आणि कॅन्टोन्मेंट मधील लष्करी अधिकारी यांच्यापासून दूरचे ठिकाण सरकारला हवे होते.
शहराच्या जवळ तरीही शहरापासून दूर अशी खडकीपेक्षा कोणतीच जागा सोयीची नव्हती. सन १८३९ साली ही फॅक्टरी चालू झाली. पुण्यातील खडकी भागाची वाढ अॅम्युनिशन फॅक्टरी मुळेच झाली असे म्हणावयास हरकत नाही.