महाराष्ट्रा मधील ह्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळां मध्ये समावेश होतो. जाणून घ्या कोणते आहे हे स्थळ.

Image Source: Google

राष्ट्र म्हटले कि संस्कृती आणि संस्कृती म्हटले कि वारसा हा आलाच. वारसा म्हणजे जे काही आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात परंपरागत चालत आलेले, जुन्या पिढी कडून मिळाले, जे नव्या पिढीने जोपासले, वृद्धिंगत केले ते सारे. जागतिक वारसा असे ज्याला संबोधले जाते त्यात इमारती, मंदिरे, शिल्प, कलेचे नमुने, इतिहासाच्या गोष्टी सांगणारे जे जे काही दृश्य स्वरुपात असलेले आणि स्पर्श करता येणारे आहे ते ते सारे आले. ह्याला जोपासण्या साठी, त्याबाबत जागृती व्हावी म्हणून १८ एप्रिल हा दिवस World Heritage Day म्हणून साजरा केला जातो.
ताजमहाल, खजुराहो च्या लेण्या, हम्पी, कोणार्कचे सूर्यमंदिर, आग्र्याचा किल्ला, महाबोधी मंदिर, कुतुब मिनार, सांची चा स्तूप, आणि अजून बरच काही भव्य इतिहासाची, भारतीय कलेची आणि संस्कृतीची साक्ष देते. भारतातील एकूण छत्तीस स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होतो, त्या पैकी अजिंठ्याच्या लेण्या व एलोरा/वेरूळ लेणी ह्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात असलेली वारसा स्थळे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या गौरवात मानाचे पान आहे. या निमित्ताने थोडे.


अजिंठा लेणी- ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते सहाव्या शतका दरम्यान निर्मिती झाली असे मानले जाते. पहिले सम्राट अशोकाच्या काळात तर नंतर पाचव्या-सहाव्या शतकात गुप्त कालखंडात अशी दोन टप्प्यात त्यांची निर्मिती झाली. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० किलोमीटर अंतरावर, वाघुर नदीच्या परिसरात या लेणी आहेत. डोंगर रांगामधील कातळावर कोरलेल्या ह्या २९ बौद्ध लेणी शिल्पकलेचा महत्वाचा नमुना आहेत. घनदाट जंगलाने वेढलेल्या या लेण्यांना १९८३ मध्ये युनेस्को ने भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान दिला. चित्र-शिल्पकला आणि बौद्ध तत्वज्ञान यांचा अनोखा अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. हीनयान आणि महायान अशा दोन कालखंडात यांची निर्मिती झाली, वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. भिंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांतून, जातक कथांचा आधारे कथानकान यात दिसून येते. चित्रातून व्यक्त होणार्या मानवी भावभावना हे आकर्षणाचे केंद्र आहेत.
अजिंठा लेण्यांचा शोध ब्रिटीश भारताचा अधिकार जॉन स्मिथ हा शिकारीसाठी जंगलात गेला त्यावेळी त्याने लावला. परंतु मध्ययुगातील अनेक चीनी-बौद्ध धर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या प्रवास वर्णनात अजिंठा लेण्यांचा उल्लेख  केल्याच्या नोंदी आढळतात.

Advertisement

वेरूळ/एलोरा लेणी– भारताचे राष्ट्रीय स्मारक असलेली, औरंगाबाद शहरापासून तीस कि.मी. अंतरावर हि जगप्रसिद्ध लेणी आहे. साधारण पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या ह्या एकूण  ३४ लेणी आहेत, यात १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन लेणी आहेत. सन १९८३ मध्ये युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत यांचा समावेश केला. वेरूळ च्या लेण्यांना भारताचे “राष्ट्रीय स्मारक” असे भारत सरकारने १९५१ साली घोषित केले. देशभरात एकूण १२०० लेणी आहेत त्यापैकी ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत. स्थापत्य आणि शिल्पकलेचा हजारो वर्षांचा इतिहासाची साक्ष देत त्या उभ्या आहेत. बहुतांश लेण्यांचे खोदकाम पहाडांच्या मध्यभागी झालेले आढळते परंतू  वेरूळ लेणी समूह सलग प्र्स्तारातून निर्माण झाला असून कळसापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येत हे साकारले गेले आहे. ज्या पर्वतांवर यांची निर्मिती झाली त्याला “येलू” पर्वत म्हणतात, त्यावरून ‘येलूर’ व कालांतराने वेरूळ हे नाव रूढ झाले. या लेण्यांमधील कैलास मंदिर लेणे म्हणजे महाकाव्यच जणू. शंखनिधी, पद्मनिधी द्वारपाल, महाकाय हत्ती, उंच ध्वज स्तंभ यांनी सौंदर्य आणखी खुलवले. रामायण महाभारतातील प्रमुख प्रसंग या लेनाय्त कोरलेले आहे. महाभारत कथासार, श्रीकृष्ण जन्म, महाभारत युद्ध, भरताचे राज्यारोहण, श्रीराम –हनुमान भेट हे प्रसंग खूप सजीव आणि बोलके वाटत. प्रारंभी ‘माणिकेश्वर’ नावाने हे तीन मजली मंदिर परिचित होते. याच लेण्यांतील बौध्द लेणी दक्षिणाभिमुख आहे, बुद्धांच्या विविध शैलीतील मुद्रा आणि इंद्रसभा, छोटा कैलास, जगन्नाथ सभा ह्या एक मजली लेणी, जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे.
बोलके चेहरे, साज शृंगार केलेले स्त्री-पुरुष, आकर्षक वेशभूषा आणि केशरचना, पशु-पक्षी, आणि निसर्गाचे चित्रण हे हजारो वर्ष जुन्या कलासक्त, सुसंस्कृत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवते.

अजिंठा – वेरूळ च्या लेणी म्हणजे भूमितीशास्त्र, भूगर्भ शास्त्र, पर्यावरण,पहाडी प्रदेशातील दगडांचा दर्जा अशा अनेक गोष्टींच्या सखोल अभ्यासाचे आणि कलेचे प्रतिक आहेच. काळाच्या ओघात कुठेतरी विसरत चाललेल्या भारतीय संस्कृतीचे ते चित्र आहे. हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या ह्या लेणी म्हणजे तीन धर्माचे अधिष्टान आहे. धर्माभिमानाच्या जागी परधर्म सहिष्णुतेची भारतीय संस्कृतीची शिकवण कोरलेली हि लेणी आहेत. वेगवेगळ्या संस्कृतींचा असा मिलाफ क्वचितच पाहायला मिळतो. कलाकृती निर्माण करताना धार्मिक मतभेद बाजूला ठेवून हि अनोखी निर्मिती केली आहे. एकविसाव्या शतकात अनुरल्या जाव्या अशा अनेक गोष्टी हि शिल्प पाहताना अंतर्मुख करतात. शेकडो वर्ष चाललेले काम सातत्य, निर्मितीच्या वेळी केलेला अभ्यास हि एकमेव गोष्ट अजरामर कलाकृतीचे रहस्य आहे हे सोदाहरण दिसते, कलेचे मानवी जीवनातील स्थान, धर्म आणि कला यांचा हा संगम पाहून जाणवले कि धर्म हा कलेचे बंधन नसून वृद्धीचा स्त्रोत तर कला हि धर्माला चिरंतन करणारी कृती. तीन धर्मांचा तो अनोखा संगम तर खूप काही सांगून गेला. एकविसाव्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञाने इतकी प्रगती केल्यावरही आपण अशी निर्मिती का नाही करू शकत याची काही कारणे हि पण असावीत असे वाटून गेले.

Advertisement

अशी अजरामर कलाकृती निर्माण करणारे ते अनामिक कलाकार इतिहासातच कुठेतरी दडून राहिलेत पण त्यांचे ऋण कायम आहे.
इतिहास तू वळून पाहशील पाठीमागे जरा,झुकवून मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा !!!

Advertisement