arun kolatkar creative personality in the world of advertising and poetry zws 70 | कलास्वाद : जाहिरात व काव्यजगतातील सर्जक व्यक्तिमत्त्व!१९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘जेजुरी’ या इंग्रजी काव्यसंग्रहाला राष्ट्रकुल पारितोषिक मिळाले आणि अरुण कोलटकर हे नाव थेट जागतिक पातळीवर पोहोचले.

Advertisement

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail.com

तो जे. जे. उपयोजित कला संस्थेमधील आमचा विद्यार्थिदशेतील काळ होता. त्यावेळी मोजक्याच जाहिरात संस्था होत्या. आणि त्यात मोजकेच असे आमची दैवते असलेले सर्जनशील कलाकार. त्यांत सर्वाच्याच आदरास पात्र असलेले नाव म्हणजे अरुण कोलटकर. जाहिरात जगतातील एक कलंदर अवलिया! अरुण कोलटकरांचा पिंड मुळात कवीचा. त्यात त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे अफाट वाचन. आणि त्याला जोड मिळाली चित्रकलेची. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला बहर न आला तर नवलच! १ नोव्हेंबर १९३२ साली त्यांचा जन्म झाला तो कोल्हापुरात. अन् कलापुरातील परंपरेतून आलेली कला त्यांच्यामध्येही उपजतच आली. तसे त्यांचे मूळ घराणे कोकणातले. पण पुढे वाडवडील कोल्हापुरात स्थायिक झाले. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना दोन्हीकडून मिळाला असे म्हणायला हरकत नाही. कोलटकर पुढे मुंबईला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. पेंटिंग विभागात त्यांचे चिंतनशील काम सुरू असे. वाचनाची आवड मुळात होतीच. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा त्यांचा तसा खास आवडीचा विषय नव्हता; पण ज्ञानलालसेपोटी कोलटकरांनी या विषयाचा भरपूर अभ्यास केला. प्रचंड वाचन केले. आणि पेंटिंगसोबत त्यांना काव्याचीही ओढ लागली. पेंटिंग अन् काव्य हेच जीवनाचे ध्येय ठरवलेल्या कोलटकरांनी पुढच्या आयुष्यात आपले संपूर्ण जीवन त्यात झोकून दिले. कोलटकरांनी कलेची सेवा स्वच्छंदपणे करण्यास सुरुवात केली. पण कित्येकदा मानवनिर्मित नियमावली त्यांच्या ध्यानात येत नसत. बाबूराव सडवेलकर, रवींद्र मेस्त्री हे त्यांचे सहाध्यायी. ते त्यांना अनेकदा काही गोष्टी सुचवीत. पण त्यांचे वागणे स्वाभाविक होते, त्यामुळे त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नव्हता. जे. जे.च्या आवारात त्यावेळी अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, बंडू वझे, अविनाश गुप्ते, मनोहर ओक यांच्यात वैचारिक चर्चा रंगत असत. अधूनमधून गायतोंडेही त्यांत हजेरी लावीत.

Advertisement

साठच्या दशकात कोलटकरांनी त्यावेळच्या ‘बोमास’ (आताची ‘ओगील्वी’) या आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेत प्रवेश केला. वास्तविक त्याआधीच्या काळात जाहिरात क्षेत्रात अनेक पेंटिंग पदवीधरांनी काम करण्यास आरंभ केला होता. आंबेरकर, वाघूळकर, मनोहर जोशी, द. ग. गोडसे, व्ही. एस. गुर्जर हे सर्व पेंटिंग विभागातलेच. अर्थात त्याकाळी उपयोजित कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू झाला नव्हता. सर्व भिस्त होती ती या कलाकारांवरच! त्या काळात बहुतेक जाहिराती या बोधचित्रांचा पगडा असणाऱ्या होत्या. एखाद्या उत्पादनासाठी केलेली जाहिरात असो, भित्तिचित्र असो- त्यात ते उत्पादन वापरणारी एखादी सुंदर स्त्री दाखवणे वा तत्सम प्रकारचे विलोभनीय असे दृश्य उत्पादनासह आविष्कृत करणे असे. मात्र, उपयोजित कला विभाग सुरू झाल्यावर जाहिरात हे एक शास्त्र असते याचा अभ्यास होऊ लागला. प्रशिक्षित उपयोजित कलाकार जाहिरात संस्थेत उच्च पदे भूषवू लागले. याच काळात अरुण कोलटकरांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल टाकले आणि तिथे ते सर्वोच्च पदावर पोहोचले. कला क्षेत्राला पेंटिंग, उपयोजित कला अशा भिंतींची गरज नसते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. ‘बोमस’मध्ये कोलटकरांची चित्रे अन् शब्द दोन्ही फुलू लागले. ते लिहीत त्या शब्दांना व कागदावर उतरवलेल्या प्रतिमांना एक डौल होता. ते स्वभावाने अत्यंत मितभाषी. पण जे बोलायचे ते विश्वासदर्शक असायचे.

तेव्हा फोर्टमधील ऱ्हिदम हाऊसशेजारील ‘वे साइड इन’ रेस्टॉरंट ही सर्जनशील कलावंत मंडळींची पंढरी मानली जायची. तिथे कोलटकरांचे एक टेबल ठेवलेलेच होते. दिलीप चित्रे, अशोक शहाणे, बंडू वझे, अविनाश गुप्ते, मनोहर ओक असे त्यांचे समविचारी मित्रमंडळ तिथे जमले की गप्पांची भट्टी जमत असे. मग तिथे वैचारिक चर्चा रंगत. कवितावाचन होई. काही वर्षांपूर्वी हे हॉटेल बंद झाले तेव्हा या मित्रमंडळींनी आपली बैठक फाऊंटनजवळील ‘कॅफे मिलिटरी’मध्ये हलविली. दर गुरुवारी दुपारी त्यांचा दरबार तेथे भरत असे. मध्यंतरी सलमान रश्दी मुंबईला आले तेव्हा त्यांनी अरुण कोलटकरांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी ही भेट याच ‘कॅफे मिलिटरी’मध्ये झाली होती. चांगल्या दोन तास त्यांच्या गप्पा रंगल्या.

Advertisement

‘बोमास’मध्ये कोलटकरांचे सर्जनशील मन नेहमी कल्पनाविहारात मग्न असे. तिथले अनेक जण स्वत:ला त्यांचे शिष्य म्हणवून घेत. त्यात कॉपी रायटर केरसी कात्रक हेही एक होते. १९६५ साली केरसी तिथून बाहेर पडले व त्यांनी ‘मास कम्युनिकेशन अ‍ॅन्ड मार्केटिंग’ (एम. सी. एम.) ही जाहिरात संस्था काढली आणि अरुण कोलटकर हे तिचे प्रमुख बनले. कुलाब्यातील बख्तावर इमारतीत तिचे कार्यालय थाटले गेले. सर्जनशील कामांच्या आधारे ही संस्था जाहिरात क्षेत्रातील एक मानदंड ठरली. इथे कोलटकरांनी मनसोक्त काम केले. सी. एम. सी. या संगणक कंपनीच्या लोगोपासून सर्व जाहिरात मोहिमा त्यांनी स्वत: संकल्पित केल्या व त्या कंपनीला उच्च स्थानी नेऊन ठेवले. ते संपूर्ण दशक अरुण कोलटकर जाहिरात क्षेत्रात तळपत राहिले.

कवितेची आत्यंतिक ओढ असलेल्या कोलटकरांनी १९५५ च्या सुमारास काव्यलेखनास प्रारंभ केला. १९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘जेजुरी’ या इंग्रजी काव्यसंग्रहाला राष्ट्रकुल पारितोषिक मिळाले आणि अरुण कोलटकर हे नाव थेट जागतिक पातळीवर पोहोचले. अन् पुढे ते भारतीय इंग्रजी कवी म्हणून प्रसिद्धी पावले. पाठोपाठच त्यांचा ‘अरुण कोलटकरांची कविता’ हा संग्रह अशोक शहाणे यांनी प्रकाशित केला. शहाणे हे मराठीतील अनियतकालिक चळवळीचे पहिले वारकरी. त्या मुशीतूनच अरुण कोलटकर या नावाची निर्मिती झाली. ‘जेजुरी’च्या यशामुळे मान्यता पावलेल्या कोलटकरांनी पुढे अनेक वर्षे आपला दबदबा कायम राखला. कोलटकरांचे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांचे ज्ञान प्रगाढ होते. या असामान्य भाषिक प्रभुत्वामुळेच ते उत्तम कॉपी रायटिंग करीत. शब्द व चित्रांच्या बाबतीत ते कमालीचे दक्ष असत. जाहिरातींसाठी आवश्यक कल्पनाशक्ती व सर्जनशीलता यांची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभली असल्याने त्यांच्या कल्पनांच्या भरारीला मर्यादाच नव्हती. आणि येथेच त्यांचे काम इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीचे ठरे. त्यांचे व्हिज्युअलायझेशन वैचारिक व प्रभावी असे. त्याला काव्याची जोड मिळाल्याने त्यातील गोडवा वेगळाच असे. कोलटकरांनी आपल्या जाहिरात कारकीर्दीत खूप काम केले. बोमास, युनिट- ६१, एम. सी. एम., पुढे लिंटास, स्वत:चे डिझाईन हाऊस, अजंठा अशा अनेक ठिकाणी विविध भूमिका बजावत त्यांनी असंख्य जाहिरात मोहिमांची निर्मिती केली. त्यांच्या विमानतळाजवळील सेंटॉर हॉटेलच्या जाहिरातींचे घोषवाक्य होते : ‘The only hotel with attached airport!’ त्यांनी सी. एम. सी., वामा, एचएमटी, लिबर्टी शर्ट्स आदी उत्पादकांच्या जाहिरात मोहिमाही समर्थपणे हाताळल्या. आपल्या कवितासंग्रहाची मुखपृष्ठेही ते स्वत:च करीत. ‘चिरीमिरी’ या त्यांच्या काव्यसंग्रहावर त्यांनी मोठी मधोमध कापलेली सिमला मिरची दाखवून त्यात काही ब्रिटिशकालीन नाणी कोंबलेली दाखविली होती. त्यांना बळवंतराव हे व्यक्तिमत्त्व जेव्हा भेटलं तेव्हा त्यांच्या भाजीच्या दुकानातील नोकर पैसे चोरताना ही युक्ती योजायचा. 

Advertisement

एखाद्या गोष्टीबद्दल ध्यास घेतला की कोलटकर ती आत्मसात केल्याशिवाय राहत नसत. शेजवळांकडे शिकवणी लावून ते पखवाज शिकले. संगीताचीही त्यांना उत्तम जाण होती. त्यांनी काही इंग्रजी गाणी लिहून स्वत: संगीतबद्ध केली व स्वत:च गायली. त्याचे रेकॉर्डिग शशांक लालचंद यांनी केले होते. ते बासरी वाजवायला शिकले. मध्यंतरी त्यांनी पानांपासून बनविलेल्या द्रोणांविषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. आपल्या देशात अनेक भागांत वेगवेगळ्या प्रकारचे द्रोण बनवले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या पानांचा वापर केला जातो. त्यांच्या टाचण्याही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हे द्रोण जेवण व प्रसादासाठी वापरतात. गंगेत सोडण्यात येणारे द्रोण वेगळे असतात. अशी बरीच माहिती कोलटकरांनी गोळा केली आणि त्यानंतर त्यांचा ‘द्रोण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

लौकिकार्थाने कोलटकरांचे आयुष्य दोन कलाकारांमध्ये विभागले गेले होते. एक होता त्यांच्यातील चित्रकार आणि दुसरा- सर्जनशील कवी. कोलटकरांनी दोघांनाही आपुलकी, ममत्व व अगत्याने सांभाळले. दोघांचेही पावित्र्य जपले. प्रत्येक गोष्टीत त्यांची कल्पकता दिसून येत असे. आपल्या ‘भिजकी वही’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना त्यांनी एका पाण्याच्या बादलीत वही भिजत ठेवली होती. ‘भिजकी वही’ संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

Advertisement

कोलटकरांचा पिंड कलाकाराचा. मन कवीचे. त्यांचे अंतरंग भाविक होते. संतकाव्याचे ते भोक्ते होते. ते विठोबाचे भक्त होते. दर मंगळवारी सायंकाळी हा चित्र-काव्यपंढरीचा वारकरी घरी भजनाचा कार्यक्रम करीत असे. अनेकदा ते स्वत:ही भजन अगदी खुलवून म्हणत. कोलटकर काव्यासोबत पेंटिंग, ग्राफिक्स तितक्याच प्रभावीपणे करीत. अजातशत्रू कोलटकरांना मोजके मित्र होते; पण ते सर्व जीवाभावाचे होते. ‘चित्रकला मी पोटापुरती राबवतो. पण माझे खरे काम कवितेबरोबर आहे..’ असे जरी त्यांनी म्हटले असले तरी त्यांनी कधी पोटाची फिकीर केली नाही. कोलटकरांनी जाहिरात क्षेत्रातील कलाकारांचा दर्जा वाढवला. स्वत:च्या कामाबद्दल त्यांना जबर आत्मविश्वास होता. आपल्या चित्र व कवितेवर ते अनेक दिवस मेहनत घेऊन काम करायचे. त्यामुळे आपल्या चित्रांतील एखादा घटक अथवा लिखाणातील स्वल्पविरामही ते कोणाला बदलू देत नसत. पण ते कधीच व्यवहारी नव्हते. त्यांच्या मित्रमंडळींना क्वचितच जाहिरात क्षेत्रातील त्यांचे योगदान, त्यांनी मिळविलेली पारितोषिके, सन्मान याची माहिती असे. कारण ते स्वत: कोणापाशीच त्याचा उल्लेख करीत नसत. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषा समर्थपणे हाताळणाऱ्या कोलटकरांनी त्यांच्या एका काव्यात उद्धृत केले आहे :

‘ I have a pen in my possession,         

Advertisement

which writes in 2  languages

and draws in one

Advertisement

My pencil is sharpened at both ends, 

I use one end to write in Marathi

Advertisement

the other in english… ’

कोलटकरांची तब्येत जेव्हा बिघडली तेव्हा त्यांना पुण्यातील त्यांच्या डॉक्टर भावाच्या घरी हलविले. तेथेही त्यांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी हजेरी लावीत. त्यांचा आजार बळावला तेव्हा त्यांचे जवळचे सर्व मित्र जसे कॅफे मिलिटरीमध्ये जमत, तसे पुण्यातील त्यांच्या घरी जमले. त्यांत अशोक शहाणे, बंडू वझे, दिलीप चित्रे, रतन सोहनी अशा सर्वच मित्रांचा समावेश होता. त्यांच्या कवितांची उजळणी होत होती. आपल्या सुरुवातीच्या कष्टांच्या काळातील मुंबईतील दिवसांवर त्यांनी लिहिलेल्या ‘Bombay made me beggar’ या कवितेचीही आठवण जागवली गेली. जुन्या आठवणी जागवल्या गेल्या.

Advertisement

अशा या कलावंताने २५ सप्टेंबर २००४ रोजी या जगाचा निरोप घेतला. या कलंदर जीवन जगलेल्या अवलियाने जी प्रचंड सर्जनशील निर्मिती केली आहे, ती पुढील कित्येक पिढय़ांना संशोधनात्मक कार्य करण्यास प्रवृत्त करेल यात शंकाच नाही. आज कवी म्हणून अरुण कोलटकर हे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. पण ज्या व्यक्तीने एक काळ जाहिरातींचे संपूर्ण क्षेत्र आपल्या हुकमतीखाली ठेवले, त्यात अमूल्य योगदान दिले, त्याची माहिती आजच्या पिढीला कितीशी आहे? याकरता त्यांचे जाहिरात कलेतील अमूल्य योगदान संशोधनाद्वारे प्रकाशात आणायला हवे!

Source link

Advertisement