article about writer muktabai dixit marathi drama Jugar zws 70 | कस्तुरीगंध : ‘जुगार’, जुगारी आणि मुक्ताबाई

article about writer muktabai dixit marathi drama Jugar zws 70 | कस्तुरीगंध : ‘जुगार’, जुगारी आणि मुक्ताबाई



प्रा. विजय तापस vijaytapas@gmail.com

Advertisement

एका सार्वकालिक, सार्वत्रिक, स्त्री-पुरुषसंबंधित घटनेवर किंवा विषयावर अत्यंत प्रभावी नाटक लिहिणं ही गोष्ट तशी कठीणच आहे. त्यातही ‘लग्न’ हा जर नाटकाचा विषय असेल तर नाटककाराची कंबख्ती भरलीच म्हणून समजा! मात्र, विवाहावरचं नाटक लिहिण्यात मोठीच रिस्क असली तरी अगदी प्राचीन ग्रीक नाटककार ते शेक्सपियरपासून सर्वच नाटककारांनी अशी जोखीम शतकानुशतकं घेतलेली दिसते. मुक्ताबाई दीक्षित यांच्यासारखी बुद्धिमान, सामाजिक-सांस्कृतिक स्थिती-गतीचं नेमकं भान असणारी आणि त्याचं विश्लेषण करू शकणारी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जे म्हणायचं आहे ते ‘लोकरंजनी’ नसतानाही ते खुलेआम म्हणण्याचं धाडस असलेली नाटककार अशी ‘क्रिएटिव्ह रिस्क’ घेतेच घेते. हिंदू धर्मशास्त्राने अत्यंत पवित्र मानलेला, शिव-शक्तीच्या रूपकाने  नटलेला विवाह हा विधी किंवा संस्कार ज्यांनी आपल्या आयुष्यात आपलासा केला आहे, त्यापैकी केवळ शेकडा दोन टक्के जोडप्यांनाच तो ‘सुखकारक झालाय की काय’ असा अनुभव येतो. याचाच अर्थ विवाहसंस्कार  झालेली शेकडा ९८ टक्के जोडपी ‘सुखमय विवाह’ नावाच्या स्थितीला वंचित झालेली असतात. (मात्र, प्रत्यक्षात ते मान्य न करता ते आपापल्या तथाकथित ‘सुखमय विवाहा’च्या कबरीत स्वत:ला गाडून घेऊन हसऱ्या अवसानाने वावरत असतात. यात पुरुष आणि स्त्रिया असा लिंगभेद नसतो.) इथे तर नाटकाचा विषयच घरात एक पत्नी असताना पुन्हा एकदा पवित्र विवाह संस्कारांचा आधार घेऊन तिला सवत आणण्याचा आहे. म्हणजेच पुरुषाच्या दुसऱ्या विवाहाचा आहे. सुखाची बेरीज करू पाहणारा पती पहिल्या पत्नीच्या आयुष्याचं सर्वागीण अवमूल्यन करायला जणू इथे सज्ज झालेला दिसतो. ‘एकाच्या दु:खातून दुसऱ्याच्या सुखनिर्मितीची अशक्यता’ हाच नाटकाचा विषय असल्याचं मुक्ताबाई प्रस्तावनेतच म्हणतात.

मुक्ताबाई दीक्षित यांचं हे पहिलंच नाटक म्हणजे ‘जुगार’! या नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट १९५० रोजी भानुविलास नाटय़गृहात झाला. १९५१ साली हे नाटक पुस्तकरूपात प्रकाशित झालं. आणि लगेचच दोन वर्षांत पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. मराठी पुस्तकांच्या विक्रीची रडकथा पाहता मुक्ताबाईंच्या नाटकाची ‘तडाखेबंद विक्री झाली’ असंच म्हणायला पाहिजे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाची १९५३ पावेतो हिंदी, कन्नड आणि गुजराती भाषांतरंही सिद्ध झाली. आणि हे नाटक कानडी रंगभूमीवरही सादर झालं. मूळ मराठी नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी. विशेष लक्षवेधी गोष्ट अशी की, या नाटकाला संगीत दिलं होतं ‘सुविख्यात कर्नाटकी गायक’ भीमसेन जोशी यांनी. (तोवर त्यांना ‘पंडित’ ही उपाधी मिळाली नव्हती.) इतकंच नाही, तर भीमसेनजींनी नाटकात ‘चैतन्यदेव’ ही भूमिकाही साकारली होती. (हे पात्र कानडी पद्धतीचं मराठी बोलतं.) नाटकात चार स्त्री-पात्रं आणि चार पुरुष-पात्रं आहेत. आणि नाटकाच्या कथानकाचा काळ आहे जून-जुलै १९४६ मधल्या चार दिवसांचा. लेखिकेच्या म्हणण्यानुसार नाटक घडतं आहे ते मुंबई-पुण्यासारख्या शहरात. ज्याला आपण ‘दिवाणखाना पद्धतीचं’ नाटक म्हणतो तसंच हे नाटक आहे. नाटकाच्या पहिल्या अंकाचं स्थळ आहे बाबासाहेब जोशी यांचा दिवाणखाना, तर दुसरा अंक घडतो डॉ. वसंतराव यांच्या दिवाणखान्यात. यात किंचित फरक तिसऱ्या अंकात घडतो. त्याचं स्थळ आहे- जी व्यक्ती नाटकातल्या संघर्षांचं निमित्त ठरली आहे त्या उषाच्या खोलीत. आज ७१ वर्षांनंतर हे लक्षात येतं की नाटकातल्या संघर्षांचं मूळ- जो वसंतरावांचा होऊ घातलेला दुसरा विवाह आहे- आणि त्याबाबतीत जी चर्चा नाटकात घडवली जाते, त्याचं स्थळ कोणतंही असू शकेल! अर्थात बाईंनी जाणीवपूर्वकच हा संघर्ष घरात घडू दिला आहे. याला कारण- ‘घर’ या स्थळाला असलेल्या पारंपरिक अर्थाची, भावनिक सहसंवेदनेची आणि मूल्यांची पडझडच त्यांना दाखवायची आहे.

Advertisement

लक्षात घ्या- भारतात सवतबंदीचा- म्हणजेच द्विभार्याबंदीचा कायदा ब्रिटिश सरकारने १९४६ च्या जुलै-ऑगस्टमध्ये आणला. हा कायदा मोडून दुसरा विवाह करणाऱ्याला भारतीय दंड विधानानुसार सात वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षाही अस्तित्वात आली. मात्र, असा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच अनेक पुरुषांनी अपार घाईने आपले द्वितीय विवाह उरकून घेतले. नाटकातलं कथानक आकार घेतं ते हा कायदा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच्या काळात. एक-प्रवेशी पहिल्या अंकात नाटकाला सुरुवात होताच नाटकातल्या संघर्षविषयाला नाटककार मुक्ताबाईंनी हात घातला आहे. डॉ. वसंतरावांशी लग्न झालेली इंदिराबाईंची मुलगी अक्का ही ‘आपला नवरा दुसरं लग्न करणार’ या जाणिवेने प्रचंड निराश झालीय. तिचं चित्त ठिकाणावर राहिलेलं नाही. ती एका भकासतेचा अनुभव घेते आहे. तिच्या या स्थितीने तिची आई इंदिराबाई कमालीच्या अस्वस्थ आहेत. त्या मूक झाल्या आहेत. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नाटकातली जाई ही घरची मोलकरीण सोडली तर उरलेल्या तीन स्त्रियांपैकी ( बेबी, इंदिराबाई, उषा) दोघींच्या वैचारिक भूमिका या सुस्पष्ट आहेत. नाटकात दोन रहस्यं दडलेली आहेत. ती म्हणजे- बाबासाहेबांची पहिली पत्नी हयात असताना त्यांनी जिच्याशी दुसरा विवाह केला ती स्त्री म्हणजे इंदिराबाई आणि त्यांनी जिचा अव्हेर केला ती स्त्री म्हणजे उषाची आई.

या रहस्यापैकी पहिलं रहस्य ज्यांना माहिती आहे अशा व्यक्ती म्हणजे खुद्द बाबासाहेब, इंदिराबाई आणि श्रीकांत. मात्र, दुसरं रहस्य माहिती असणारं नाटकात कुणीच नाही. त्या रहस्याची उकल हा नाटकातला परमोच्च िबदू आहे. नाटकातलं पारंपरिक, जुनाट कल्पना आणि मूल्यं उराशी बाळगणारं, टिपिकल पुरुषी अहंगंड पदोपदी मिरवणारं, स्वमग्नता आणि स्वार्थ यांत लडबडलेलं पात्र म्हणजे बाबासाहेब. आपण पहिल्या पत्नीला अपत्य होत नाही म्हणून तिच्या आयुष्याचं स्मशान करण्याचं अनैतिक कृत्य केलंय याची जाणीव तर त्यांना नाहीच; पण केवळ स्वत:च्या शारीरसुखपूर्तीसाठी आपण मनमानी केली हेही त्यांना कळत नाही. सुखलोलुपता माणसाला जी वैचारिक बधिरता बहाल करते त्याचा नमुना म्हणजे बाबासाहेब! द्वितीय विवाह करून त्याचं निलाजरं समर्थन करणारा जो वर्ग तेव्हा अस्तित्वात होता, तोच वर्ग बाबासाहेबांच्या मुखाने नाटकात बोलताना, वावरताना दिसतो. नाटकात दुसरा विवाह करायला आतुर झालेला डॉ. वसंतराव हा उषाच्या प्रेमात आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी लग्न करायचं आहे. त्याचं प्रेम खोटं आहे वा असेल असं नाही, मात्र त्याला प्रीतीविवाहाची िझग चढलेली असल्याने तो त्याच्या या विवाहाचा कोणता विपरित परिणाम त्याच्या पहिल्या पत्नीवर होईल याबद्दल फारसा गंभीर विचार करताना दिसत नाही. याउलट अवस्था बाबासाहेबांच्या पुतण्याची- श्रीकांतची आहे. नाटकाच्या विकासक्रमात त्याची जी संवेदनशीलता, प्रश्न समजून घेण्याची आंतरिक ऊर्मी आणि प्रवाही वैचारिकता दिसते, ती ठाशीवपणे लक्षात येणारी आहे. या पात्राचं वर्णन करायचं तर ‘वादातून संवादाकडे आणि संवादातून सहमतीकडे’असं करावं लागेल.

Advertisement

अक्काची धाकटी बहीण बेबी ही १९५० च्या आसपासच्या काळातल्या पुणेरी कॉलेजियन तरुणींचं प्रतिरूप आहे. ‘समाजातली शहाणीसुरती माणसं ज्या कशाला मॅच्युरिटी, सेन्सिबलिटी, स्मार्टनेस आणि थॉटफूलनेस म्हणत असतील ते सारं माझ्यापाशी जन्मजात आहे’ असा ज्या तरुण जीवांचा जाज्ज्वल्य विश्वास असतो त्यापैकी एक बेबी आहे. तिच्या उक्ती-कृती नाटकाला एक गती देतात. आता उरल्या दोघीजणी- इंदिराबाई आणि उषा. पहिली कुणाची तरी दुसरी पत्नी आहे आणि दुसरी कुणाच्या तरी आयुष्यातलं ते स्थान घेऊ पाहणारी आहे. 

वसंतरावांवर कितीही गाढ प्रेम असलं तरी ‘उद्याची इंदिराबाई व्हायचं की नाही’ याचा निर्णय घेण्याची वेळ उषावर आली आहे. तसंच सुडाचं समाधान मोठं की आपण कुणा स्त्रीच्या आयुष्यातील यातनेला कारण न होण्याचं समाधान मोठं, यातून निवड करण्याची बिकट वेळ तिच्यावर आली आहे. नाटकातल्या तीन अंकांत नि:शब्द भासणाऱ्या, काहीही आंतरिक वेदनेचं न बोलणाऱ्या इंदिराबाई चौथ्या अंकात ‘दुसरेपणा’बद्दल जे  बोलतात ती खरी स्त्री-दु:खाची गाथा आहे. ‘‘का कोण जाणे, पण जीवनाचा आनंद मनमुराद असा मी कधी लुटलाच नाही. आतून मनाची टोचणी, बाहेरून समाजाची टोचणी! या दोन टोचण्यांनी माझं जीवन असह्य केलं. ‘ह्याच का दुसऱ्या सूनबाई?’ या प्रश्नानं प्रत्येक वेळी मला काळीज कापल्यासारखं वाटे. माझ्या २४ तासांच्या जीवनावर तुझ्या आईची छाया होती!’’

Advertisement

इंदिराबाईंचे हेच शब्द कदाचित उषाला तिचं भविष्य सांगणारे ठरतात आणि वसंतरावांना ती नकार देते. तिने वसंतरावांना दिलेला नकार जेवढा स्वत:साठी आहे, तेवढाच तो अक्का आणि इंदिराबाईंच्याही हिताचा आहे. अर्थात तिने जरी हा निर्णय घेतला असला तरी अक्काच्या मनाला जो तडा गेलाय तो ती भरून टाकू शकत नाही. तिसऱ्या अंकातलं बाबासाहेबांशी  बोलताना उषाच्या तोंडी असलेलं ‘‘तुम्ही जिला टाकलीत तिची मी मुलगी!’’ हे षट्पदी वाक्य संपूर्ण नाटकातलं सर्वात प्रभावी नाटय़विधान आहे यात संशय नाही. या नाटकाचा विलक्षण प्रभाव मुंबई-पुण्यात झालेल्या प्रयोगांतून प्रेक्षकांवर पडला याची साक्ष तेव्हाची सर्व इंग्रजी-मराठी वृत्तपत्रं देतातच; पण ‘‘मुक्ताबाईंच्या ‘जुगार’ने मराठी नाटकांत एक सरस भर टाकली आहे. एवढेच नव्हे तर या नाटकाने मराठी रंगभूमीचे आकर्षण वाढविले आहे..’’ हे आचार्य अत्रे यांचे ‘नवयुग’मधले उद्गारही देतात. मुक्ताबाईंनी अधिक नाटकं लिहायला हवी होती असं आज वाटत राहणं हेच त्यांचं मोठं यश नाही का?





Source link

Advertisement