article about author rajni parulekar poems zws 70 | रजनी परुळेकर.. संवेदनशीलतेचानीरजा [email protected]

Advertisement

रजनी परुळेकरांच्या कविता त्यांच्या प्रत्यक्षानुभूतीचा अविभाज्य भाग होत्या. त्यांतलं वास्तव आणि त्यांचं जगणं समांतरपणेत्यांच्या कवितांतून तपासता येतं.

रजनी गेली ही बातमी आली तेव्हा खूप संमिश्र भावना होत्या मनात. गेली अनेक वर्ष ज्या कवयित्रीच्या आणि मैत्रिणीच्या कवितेवर आपण प्रेम केलं, ती या जगात राहिली नाही याचं दु:ख होतंच; पण एक विचित्र अस्वस्थता मनात दाटून आली होती. ती संध्याकाळ रजनी मनभर पसरून राहिली होती. सत्तरच्या दशकात नावारूपाला आलेलं आणि मराठी कवितेवर स्वत:चा असा ठसा उमटवलेलं एक महत्त्वाचं नाव काळाच्या पडद्याआड गेलं याचं वाईट वाटत होतंच, पण त्याहूनही जास्त ती सुटली आणि तिला त्या भ्रमिष्ट अवस्थेत पाहण्यापासून आपणही सुटलो, या भावनेनं मनातल्या मनात एक सुस्काराही सोडला.

Advertisement

खरं तर कवयित्री म्हणून रजनी दहा-बारा वर्षांपूर्वीच थांबली होती. मला आठवतं, लोकवाङ्मय गृहानं मराठीतील काही नामवंत लेखकांच्या पुस्तकांची संपादनं करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यात रजनीच्या कवितांचं संपादन करण्यासाठी ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी मला विचारलं होतं. रजनीची कविता मला आवडत होतीच, त्यामुळे मी आनंदानं होकार दिला होता. त्यावेळी काळसेकर काकांनी ‘रजनीच्या नव्या काही कविता असतील तर त्या मागवून घे.. या पुस्तकात त्यांचा समावेश करता येईल,’ असं मला सांगितलं होतं. मी रजनीला फोन केला. प्रकल्पाबद्दल सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, ‘‘नीरजा, तुला माझी कविता आवडते म्हणून तू संपादन करतेयस. पण मी आता काही लिहीत नाही. लिहिलं असलं तरी ते कुठं आहे माहीत नाही. आणि मला छापायचंही नाही. तुला काय करायचं ते कर!’’

मी काळसेकर काकांना फोन करून त्यांनी रजनीशी बोलावं असा आग्रह धरला. पण रजनीनं त्यांनाही दाद लागू दिली नाही. मला वाटतं, तिनं तिच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे कवयित्री म्हणून तिला मिळालेलं पूर्णत्व अल्पकाळाचा शाप घेऊनच आलं असावं. त्यानंतर ती वाळवंटात भणाणा घुमणाऱ्या वाऱ्यासारखी दाही दिशा भटकत राहिली.

Advertisement

रजनीची आणि माझी पहिली ओळख झाली ती वृंदा लिमयेंच्या घरी. त्या काळात काही बुजुर्ग कवयित्रींसोबत आम्ही एकत्र यायचो- साहित्यविषयक गप्पा मारायला. कधी वृंदा लिमये यांच्या घरी, तर कधी प्रभा गणोरकर यांच्याकडे. कधी निर्मला देशपांडे, तर कधी उषा मेहता यांच्याकडे. अशा गेट-टुगेदरमध्ये केव्हातरी ती भेटायची. पण आळंदीच्या साहित्य संमेलनात आम्ही खूप जवळ आलो. त्या संमेलनाच्या अध्यक्षा शांताबाई शेळके होत्या. त्यामुळे ‘आम्ही मुक्ताईच्या लेकी’ म्हणून त्या वर्षी खास स्त्रियांचं स्वतंत्र कवयित्री संमेलन ठेवलं होतं. त्यात आम्ही एकत्र होतो आणि योगायोगानं आमची राहण्याची व्यवस्थाही एकाच खोलीत केली होती. संमेलनातील त्या दोन दिवसांत आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. खरं तर एवढी महत्त्वाची कवयित्री आपल्याबरोबर राहते आहे याचाच खूप आनंद झाला होता तेव्हा. मी तो बोलूनही दाखवला. तर ती हसली. ‘‘मी मोठी वगैरे काही नाही,’’ असं म्हणत तिने मला विचारलं, ‘‘माझी कविता खरंच चांगली आहे का?’’ मी म्हटलं, ‘‘अर्थात.’’ मग तिनं ‘अनुष्टुभ’साठी बाबांनी कशी कविता मागितली, कशा सूचना केल्या याचे किस्से सांगितले. त्याचवेळी गप्पा मारता मारता तिच्या डिप्रेशनमध्ये जाण्याच्या टेंडन्सीबद्दलही कळलं. या संमेलनात निमंत्रितांच्या संमेलनात प्रज्ञाही होती. त्या काळात आमची तिघींची गट्टीच झाली होती. त्या संमेलनाआधी आणि नंतरही कवयित्रींची अशी खास कविसंमेलनं झाली आणि होत राहिली. पुढे दोन-तीन वर्ष प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर, मल्लिका अमरशेख, प्रज्ञा दया पवार आणि मी वेगवेगळ्या कवयित्री संमेलनांत सतत भेटत असू. एनसीपीए, भारतीय विद्या भवन, कीर्ती महाविद्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालेली ती संमेलनं आजही लक्षात आहेत आणि त्यावेळची रजनीही. ती त्या काळात खूपच खूश होती. ‘‘छान वाटतं असं कविता म्हणायला. सगळ्यांना भेटायला. तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर!’’ असं म्हणायची. तेव्हाच कधीतरी प्रज्ञाच्या घरी तिनं काही दिवस मुक्कामही केल्याचं मला चांगलं आठवतंय. 

पण मग ती पुन्हा कोशात गेली. तिचे स्नेही आणि समकालीन कवी गुरुनाथ सामंत आणि सतीश काळसेकर तिच्या या मूड्स बदलण्याला खूप छान समजून घ्यायचे. पण हळूहळू रजनी सर्वाशीच तुटत गेली. स्वत:तल्या कवयित्री असण्यापासूनही दूर जाऊ लागली.

Advertisement

‘आता मला नि:श्वास टाकायचीही भीती वाटते..

..सुन्न झालेला मेंदू आणि अधू झालेली पंचेंद्रिये

Advertisement

वाटते, एखाद्या झाडाखाली

मुकाट बसून राहावे एकटे

Advertisement

पण एकटेपण सोसावे धैर्याने, तर तिथेही बळ अपुरे पडते

मग वाटते की, डोक्याचे केस भादरावेत मुळापासून

Advertisement

एकमेकांत घट्ट बसवलेले कवटीचे दोन भाग

वेगळे करावेत आपल्या हातांनी आणि सिद्ध करून दाखवाव्यात

Advertisement

उत्स्फूर्त, निष्पाप शब्दोच्चारांच्या वेळच्या

आपल्या मनातल्या प्रतिमा

Advertisement

हे सुन्नपण, हे सुनसानपण

संभाषण होऊनही निष्पन्न होणारं

Advertisement

हे केविलवाणे एकटेपण..’

(व्यंजनेच्या रानात)

Advertisement

या तिच्याच कवितेच्या ओळींत रजनीचा जगण्याच्या एका टोकावरून कोसळण्याचा आणि स्वत:ला केविलवाण्या एकटेपणात कायमचं लोटून टाकण्याचा प्रवास दिसतो.

खरं तर आम्ही कवयित्रीनींच नाही, तर एकूणच कवितेच्या वाचकांनी रजनीवर भरभरून प्रेम केलं आणि अजूनही करत होतोच. रजनीच्या मृत्यूनंतर आलेल्या बातम्यांत साहित्यविश्वानं तिची दखल घेतली नाही असं पुन:पुन्हा म्हटलं आहे. खरं तर प्रसारमाध्यमांनी तिची दखल घेतली नाही असं मी म्हणेन. साहित्यविश्वानं तिच्यावर मनापासून प्रेम केलं. त्यामुळेच २०१० नंतर तिनं स्वत:ला साहित्यविश्वापासून वेगळं केलं असलं तरी अनेक लेखक, कवी ‘रजनी कशी आहे? बरी आहे ना? आहे ना ती?’ अशी विचारणा करायचे. अशा प्रश्नांनी अस्वस्थ होऊन मग तिच्या घरी फोन लावायचे. तर पलीकडून उत्तर नाही मिळायचं काहीच. मग मी तिच्या शेजारी राहणाऱ्या माझ्या नातेवाईकांना फोन करून ती व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यायचे.

Advertisement

दोन वर्षांपूर्वी आमची मैत्रीण शुभांगी थोरात आणि मी ठरवून तिला भेटायला गेलो. तिच्याशी बोलून तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाऊ असं ठरवून तिच्या घरी निघालो, तर ती वाटेतच भेटली. अनेक पिशव्या काखोटीला मारून फूटपाथवर कोणत्या तरी फेरीवाल्याशी बोलत होती. मी जवळ जाऊन हाक मारली तर ती हसली. लगेच ओळखलं तिनं. पण त्या दिवशी त्या अवस्थेत भेटलेली रजनी काळजात कळ उमटवून गेली. हॉटेलात जाऊन बसलो. खायला मागवलं. कशी आहेस म्हणून विचारलं. कवितेविषयी विचारलं तर म्हणाली, ‘‘नाही गं. काही नाही लिहीत आता. वाचायचा त्रास होतो.’’ मग सोबतच्या गाठोडय़ातून कागदात बांधलेला खाऊ समोर धरून ‘खाणार  का?’ म्हणून मला  विचारलं. त्याच प्रेमानं, त्याच आस्थेनं चौकशी केली सर्वाची. आणि मग एका क्षणी म्हणाली, ‘‘तुम्ही जा आता. मी दमलेय. कंटाळा आला मला. मी जाते.’’ आणि निघून गेली एकटीच. कसल्या शोधात गेली ती, माहीत नाही; पण हरवून गेली झटकन् तिच्या कोणत्या तरी जगात!

‘आज संध्याकाळी वाळूवर बसलो आहोत

Advertisement

दोघी जणी

तर तू बोलावंसं खूप

Advertisement

मात्र मला समजावून घेण्यासाठी धडपडू नयेस.’

‘वाळूवर दोघी जणी’ या तिच्या कवितेतल्या या ओळींमध्ये ती जे म्हणाली तशीच काहीशी देहबोली होती तिची त्या दिवशी.

Advertisement

त्यानंतर आठ दिवसांत लॉकडाऊन लागला आणि सगळंच थांबून गेलं. फोन उचलत नव्हतं कोणीच. बाकी रजनी ठीक म्हणजे तशीच असल्याचं अधूनमधून कळत होतं.. आणि ही बातमी आली.

रजनी परुळेकर हे सत्तरीच्या दशकात पुढे आलेलं नाव. स्त्रियांच्या कवितेचा आयाम बदलून टाकणारी ही कवयित्री ‘समाजात पुरुषवेश्यांचे मोहल्ले असल्याचं ‘स्वप्न’ पाहायची.’ जे दु:ख स्त्रीच्या वाटय़ाला आलं आहे, ते पुरुषांच्याही वाटय़ाला यावं, त्याशिवाय त्यांना स्त्रियांच्या यातना, वेदना कळणार नाहीत असं वाटायचं तिला. रजनीची कविता ही आत्मनिष्ठ असली तरी ती स्त्रीनिष्ठ आणि स्त्रीवादीही आहे. ती या व्यवस्थेवर सपासप वार करत जाते. ‘काळतोंडी तू पांढऱ्या पायाची’, ‘स्वप्न’, ‘मिलॉर्ड’, ‘जन्मभर’ यांसारख्या तिच्या कवितेत ती स्त्रीच्या शारीर आणि मानसिक खच्चीकरणाबद्दल बोलते. पुरुषाच्या दुटप्पीपणावर वार करते. याबरोबरच माणसामाणसांतील नातेसंबंध, त्यातले ताण, त्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन आणि त्यातून घेतलेला स्वत:चा आणि समष्टीचा शोध हे तिच्या कवितेचे विशेष आहेत. रजनी सतत माणसांना पारखून घेताना दिसते, त्यांच्याविषयीची निरीक्षणं नोंदवताना दिसते. आयुष्यात भेटलेल्या वेगवेगळ्या स्त्रियांशी नातं जोडू पाहते. तर कधी आयुष्यातून हरवून गेलेल्या नात्यांचा शोध घेताना दिसते. एकटेपणाच्या कोषात स्वत:ला बंदिस्त करून घेतलेल्या या कवयित्रीला सतत कोणाशी तरी संवादाची गरज भासत होती. हा संवाद साधण्याचा प्रयत्न तिच्या अनेक कवितांत आपल्याला दिसतो. विशेषत: भूतकाळातल्या मैत्रिणी, आज भेटणाऱ्या तरुणी आणि कोण कोण..

Advertisement

‘तुला कल्पना नसेल

मी तुझा किती विचार करत असते

Advertisement

तुझे सौंदर्य तुझे मार्दव

पुन:पुन्हा आठवत असते..

Advertisement

(तू रागावली आहेस)

टपोऱ्या बटमोगरीसारखे

Advertisement

तू दिलेले सोनेरी क्षण,

माझ्या मोत्यांच्या कुडय़ांच्या सुबक पेटीत

Advertisement

ठेवून देईन मी ते;

कधी कधी विषण्ण, एकाकी वाटते

Advertisement

तेव्हा तळहातावर घेऊन

पाहत राहीन त्यांच्याकडे कौतुकाने

Advertisement

जशी काही जपून ठेवलेली पत्रे

मी वाचत असते अधूनमधून

Advertisement

मनाला हुरूप मिळावा म्हणून..

आयुष्याच्या या अशा टप्प्यावर

Advertisement

नितांत गरज आहे मला खऱ्याखुऱ्या मायेची

माझे शब्द, त्या कृती

Advertisement

त्या ओलांडून माझ्या अगदी निकट,

कायमचे निकट येणे

Advertisement

जमेल का तुला?’

कोणाला बोलावत होती रजनी निकट? आणि तिला हवी ती माणसं येऊ शकली नाहीत म्हणून एकटी भटकत राहिली का शोधत अशा एखाद्या मैत्रिणीला?

Advertisement

माणसांनी केलेल्या विश्वासघातांनी घायाळ झालेली ही कवयित्री माणसांवर विश्वास ठेवणंच विसरून गेली होती.

‘अनेकदा माणसे मटारच्या टपोऱ्या शेंगांप्रमाणे

Advertisement

वाटतात सुरुवातीला

आणि सोलून पाहावे तर

Advertisement

हिरव्यागार, पुष्ट किडीने कुरतडलेले दाणे!’

असले काही सहनच होत नव्हते तिच्या अतिमनस्वी वृत्तीला. आणि ते सतत कवितेतून येत होते तिच्या. आपल्या रूपानं नियतीने अतिरेकी संवेदनशीलतेला जन्म दिला आहे हे माहीत होतं तिला. पण सोशिकतेचा अभाव असलेल्या तिच्या कपाळावर सटवीनं ‘हे राक्षसी मूल जन्मण्याआधी मारून टाका असं लिहायला हवं होतं’ असं ‘पहिल्या पूर्वजानं माझ्यावर लिहिलेली कविता’ या कवितेत म्हटलं होतं तिनं. ‘हे मूल वाळवंटात भणाणा घुमणाऱ्या/ वाऱ्यासारखे/ दाही दिशा भटकत राहील/ ..याची राखही वडवानलाप्रमाणे धुमसत राहणार आहे/ समुद्राच्या तळाशी/.. ते भ्रमिष्ट होईल/ आत्मनाशाला सिद्ध होऊन/ डोंगराच्या शिखरावर उभे राहील/..’

Advertisement

आपलं भविष्यच जणू काही चितारलं होतं तिनं या कवितेत असं आज ती कविता वाचताना राहून राहून वाटतंय. स्वत:चा आपल्या हातानं कडेलोट करून घेतला तिनं आणि सर्वापासून दूर निघून स्वत:त शिरली. भौतिक गोष्टींत रमलेल्या समाजाला कळलं नाही तिचं हे असं स्वत:च्या आतली गाज ऐकणं आणि त्या आवाजाच्या दिशेने निघून जाणं. एका प्रियतम भ्रमनिरासाला स्वीकारणं आणि त्यात भोवंडून जगता जगता स्वत:च्या देहातूनही निघून जाणं.

Source link

Advertisement