anurag kashyap article on the godfather 50th anniversary zws 70 | एक अविरत प्रेरणास्रोतगॉडफादर’च्या महानतेत त्याची चित्रकृती जितकी मोलाची, तितकीच साहित्यकृतीदेखील महत्त्वाची आहे

Advertisement

१४ मार्च १९७२ रोजी प्रीमियर झालेला ‘गॉडफादर’ हा चित्रपट गुन्हेगारी विश्वाचे सखोल चित्रण करणारा अप्रतिम चित्रपट म्हणून रसिकांच्या चिरस्मरणात आहे. माफियांच्या कारनाम्यांवरील या चित्रपटाने इतिहास घडवला. अनेक कलावंतांची कारकीर्द तर त्याने घडवलीच, परंतु पुढे जगभरातील अनेक चित्रपटकर्मीचा हा सिनेमा एक प्रेरणास्रोत ठरला. ‘गॉडफादर’च्या या सर्वव्यापी प्रभावाची चिकित्सा करणारे चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि रामगोपाल वर्मा यांचे लेख.. ‘गॉडफादर’च्या पन्नाशीनिमित्ताने!

अनुराग कश्यप

Advertisement

‘द गॉडफादर’ हा चित्रपट मी फार उशिराने पाहिला. १९९२ साली मी मारिओ पुझोचं पुस्तक वाचलं. मात्र, हा सिनेमा पाहण्याचा योग मी दिल्लीहून मुंबईत आल्यानंतरच आला. या चित्रपटातील दृश्यांनी मला अक्षरश थक्क केलं. चित्रपटाच्या एकूण निर्मितीप्रक्रियेनंच मला झपाटून टाकलं. आणि मला वाटतं, माझ्यातील कलाप्रक्रियेला इतर कशाहीपेक्षा या सिनेमानेच आकार दिला. या कलाकृतीचा माझ्यावर झालेला परिणाम इतका मोठा होता, की मी तर म्हणेन- चित्रपटाद्वारे कथा सांगण्याची प्रेरणा मला या चित्रपटातून मिळाली.

या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान काय घडलं याचं कुतूहल मला अस्वस्थ करीत होतं. त्यातल्या घटनांनी मला पछाडलं होतं. मी पीटर बिस्किंडचं ‘इझी रायडर्स, रेजिंग बुल्स’ हे पुस्तक वाचलं आणि ‘गॉडफादर’ची निर्मितीप्रक्रिया जाणून घेतली. या प्रकल्पासंबंधात कुणालाच विश्वास नव्हता. असं असूनही कोपोला या तरुण दिग्दर्शकानं ज्या परिस्थितीत हा चित्रपट बनवला, किंवा या चित्रपटानं आणि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं पुढे जाऊन अमेरिकन चित्रपटसृष्टीत जे स्थान मिळवलं, त्या कथा मला फार महत्त्वाच्या वाटतात. कारण ज्या प्रकल्पाबद्दल, ज्या अभिनेते-दिग्दर्शकाबाबत कुणीही छातीठोकपणे हमी देऊ  शकत नव्हता,  त्यांनीच पुढे इतिहास रचला. स्टुडिओ यंत्रणेने जवळपास नाकारलेल्या अल पचिनो, रॉबर्ट डीनिरोसारख्या कलाकारांना आपल्यासह घेऊन त्याने ही महानिर्मिती करून दाखविली. सत्तरीच्या दशकात स्टुडिओचे प्राबल्य असणाऱ्या काळात या चित्रपटातील दृश्यमालिका तसेच या चित्रपटाची पटकथा, अभिनय या साऱ्याच निकषांवर असा चित्रपट बनवणं हे धाडसाचंच असल्यामुळे या कलाकृतीच्या बीजधारणेपासूनच्या अवस्था मला महत्त्वपूर्ण वाटतात. संपूर्णपणे नवं काही देणाऱ्या या लोकांनी हॉलीवूडची सरधोपट व्यवस्था मोडीत काढली. त्यांच्या कहाण्या माझ्या मनात कैक वर्षे गोंदल्या गेल्या. हा प्रभाव माझ्या सिनेमांचा प्रवाह निश्चित करण्यात मला उपयुक्त ठरला असावा.

Advertisement

आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे नैतिकतेच्या चष्म्यातून पाहण्याची सवय लागली आहे. हा चष्मा बाजूला ठेवला तर सगळ्या गोष्टी, सगळे जग हे आहे त्या रूपात दिसू लागते. ‘गॉडफादर’ ही एका कुटुंबाची गाथा आहे. ती बाप-लेकांची, त्यांच्या बायका नि बहिणींची कथा आहे. ही तीन उग्र, शीघ्रकोपी आणि निग्रही भावांची कहाणी आहे. पित्याचे झुकते माप कुणाकडे आहे, ही बाब पडताळणाऱ्या मुलींची ही गोष्ट आहे. कुटुंबातील सर्व ताण्याबाण्यांना, संघर्षांना सांभाळत सर्वाना एकत्र आणणाऱ्या आईची ही कहाणी आहे.

हा चित्रपट कधीच डॉन कॉर्लियॉनीच्या कुटुंबाच्या पलीकडे जात नाही. तो माणूस बाहेरच्या जगात काय करतो याविषयीची ही गोष्ट नाही. उतारवयातील कॉर्लियॉनी कुटुंबाच्या परिघात घडणाऱ्या कुतूूहलांची ती साखळी आहे. कुटुंबातील सर्वात तरुण मुलाला आपल्या पित्याच्या अंतरंगाचा लागलेला शोध हादेखील यातला एक

Advertisement

घटक आहे.

‘सत्या’ बनवत असताना ‘गॉडफादर’मधील संकल्पना आमच्या डोक्यात नक्कीच होत्या. शेजारच्या घरात गँगस्टर राहतोय ही कल्पनाच सर्वस्वी वेगळी होती. त्या घरातील कुटुंबप्रमुख कमावण्यासाठी कोणत्या तरी कामावर जातो, पण त्याचे काम हे खंडणी लाटण्याचे आहे. बॉलीवूडने आखून दिलेल्या गँगस्टर्सच्या परंपरेतील खलनायक इथल्या अधोविश्वात (अंडरवर्ल्ड) नाही. तर सामान्य कुटुंबातील चारचौघांसारखा वाटणारा भिकू म्हात्रे तिथे घडला आहे. भिकू म्हात्रे आणि त्याच्या बायकोमधील नातेसंबंधांमागील प्रेरणांचा मागोवा घ्यायला गेलात तर त्याची मुळं ‘गॉडफादर’मध्ये सापडतील. नैतिक मूल्यांच्या घसरणीऐवजी ही कथा कुटुंब आणि कुटुंबासाठीच्या संघर्षांची कथा म्हणून सर्वाधिक पुढे सरकत राहते. म्हणूूनच ‘गॉडफादर’च्या वेगवेगळ्या अंगांशी विविध प्रकारे ‘सत्या’ चित्रपटाची तुलना होऊ  शकते.

Advertisement

आजच्या ‘सत्योत्तर’ (पोस्ट ट्रूथ) युगाशीदेखील ‘गॉडफादर’ अधिक नातं सांगतो. त्या काळात जे अपवादात्मक होतं, ते आता सर्वमान्य मानलं जात आहे. अधोविश्वाऐवजी आता राजकीय कुटुंबांच्या हातात सत्तेची, समाज ताब्यात ठेवण्याची दोरी गेली आहे. मोठमोठय़ा राजकीय कुटुंबांत सत्तासंघर्ष आणि सत्ताशोधाचा तिढा दिसतो. या सर्व पार्श्वभूमीवर ‘गॉडफादर’चे कालातीत रूप समोर येते. ही एक अत्यंत ताकदीने तयार केलेली आणि मांडण्यात आलेली कालातीत कलाकृती आहे. कथानक,अभिनय या सर्वच बाबतींत या चित्रपटाची श्रेष्ठता मान्यच करावी लागेल. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्या, त्या भूमिकेची जणू व्याख्याच तयार केली आहे. त्यामुळे यातल्या सगळ्या कलाकारांची कारकीर्द ठळक झाली. या मंडळींनी हॉलिवुडमधील स्टुडिओ यंत्रणा आणि त्यांच्या मालकांच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडवून आणले.

स्टुडियो यंत्रणा तत्पूर्वी तिकीट बारीवर प्रेक्षकांना खेचणाऱ्या ‘म्युझिकल्स’मध्ये गुंतलेली होती. जॉन वेनसारख्या देमार मारधाडी वेस्टर्न सिनेमांमध्ये ती रमलेली होती. ‘गॉडफादर’ने या प्रवाहाला चक्क वळसा घातला. त्याने सारे वास्तवच हलवूून सोडले. ‘गॉडफादर’, ‘एक्झॉर्सिस्ट’ (१९७३), ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (१९७६) या चित्रपटांनी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात घडवून आणलेले बदल अभूतपूर्व होते. हा इतिहास फारच रोचक आणि प्रेरणादायी आहे. या कथांचा माझ्यावरील प्रभाव इतका मोठा आहे, की मीदेखील चित्रपटनिर्मिती करत असताना ‘गॉडफादर’च्या वेळी घडलेल्या घटनांचं अनुकरण केलेलं आहे.

Advertisement

साध्या-सरळ कथानकातील संकल्पनात्मक स्तरावरील वैश्विकता खरी महत्त्वाची ठरते. ती कोणत्याही देशात, संस्कृतीत, समूहात, धर्मात घडू शकते. तुम्ही कोणत्याही भाषेत चित्रपटाचे रूपांतर कराल, त्या भाषेची ती बनते. कारण कुठल्याही कुटुंबाची ती सर्वत्र घडू शकणारी आत्यंतिक सोप्या सिनेभाषेत सांगितलेली कहाणी आहे. महत्त्वाकांक्षा आणि फसवणुकीची लोभस चित्रे त्यातील व्यक्तिरेखांतून उतरतात.

‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये (२०१२) एक व्यक्ती आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहतेय-ज्यात त्या व्यक्तीसमवेत त्याच्या कुटुंबाची कथा दिसते. कुटुंब या संकल्पनेत इतकी वैश्विकता आहे, की प्रत्येक गोष्ट तुम्ही या संकल्पनेशी आणि पर्यायाने ‘द गॉडफादर’शी जोडू शकता. ही गोष्ट वासेपूर या गावाची आहे. आता ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या पहिल्या भागाचा शेवट हा ‘द गॉडफादर’मधील सनीच्या मृत्यूसारखा वाटतो. पण ‘वासेपूर’मधील ज्या खऱ्या घटनांवर हा चित्रपट बेतलेला होता, त्यातही असा मृत्यू घडून आला होता. आता ‘वासेपूर’मध्ये मृत्यू झालेला तो माणूस किंवा त्याचा खून घडवून आणणारी व्यक्ती किंवा प्रत्यक्ष खून करणारे लोक यांपैकी कुणीच ‘द गॉडफादर’ हे पुस्तक वाचलेलं नव्हतं, किंवा तो चित्रपटदेखील त्यांनी पाहिलेला नव्हता. तरीही यात घडणाऱ्या घटनांमध्ये एक अगम्य साम्य आढळून येतं. हाणामारीसाठी निश्चित जागी पात्रांचं येणं, तिथे वाट पाहण्याची प्रक्रिया आणि नंतर उडणारा कल्लोळ आदी घटना ‘वासेपूर’मधील कलाकारांनी ‘गॉडफादर’ न पाहताही त्याच्या जवळ जातील अशा प्रकारे उभ्या केल्या. यातून ‘गॉडफादर’ची वैश्विकताच अधोरेखित होते.

Advertisement

इथे आणखीन एक गोष्टीकडे मला लक्ष वेधावंसं वाटतं. भारतात लोक गरज नसताना इंग्रजीमध्ये का लिहितात, ते मला कळत नाही. लेखकांनी आपल्या प्रादेशिक भाषेमध्येच लिहायला हवं. इंग्रजीमध्ये भरमसाठ लिहीत असलेल्या लेखकांशी बोलत असताना लक्षात येतं की, इंग्रजी ही त्यांची प्रथम भाषा नाही. त्यामुळे आपली कथा इंग्रजी वाचकांपर्यंत, उच्चभ्रू वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांत त्यांच्या लेखनाच्या दर्जावर विपरीत परिणाम झालेला दिसतो. आपल्याकडे उत्तम कथांची कमतरता आहे असं नाही. मात्र, इंग्रजीमध्ये लिहिण्याचा अट्टहास हाच खरं तर उत्तम साहित्यनिर्मितीसाठी मारक ठरतो आहे. गोष्ट सांगण्याच्या, ती मांडण्याच्या कलेत आपण मागे पडण्याचं कारण तेच आहे. सध्या भारतात अकथात्म साहित्यामध्ये फारच उत्तम लिखाण केलं जात आहे. अकथात्म पुस्तकांमध्ये खरोखरच रंजक घटना आणि खिळवून ठेवणारी कथानकं वाचायला मिळतात. लेखकाच्या भवतालाची, घर-परिसराची जाणीव वाचकाला घडवून देणारं लेखन हे खऱ्या अर्थानं चांगलं लेखन. प्रादेशिक भाषेत असं लेखन पाहायला मिळतं. हिंदी, मराठी, तमीळ, मल्याळम् भाषेमध्ये तुम्हाला कितीतरी चांगलं लेखन आणि लेखक सापडू शकतील. मात्र, आपल्याकडे काय होतं, की इंग्रजीत गोष्ट लिहिली की सारं काही प्राप्त होत असल्याचा एक भ्रम तयार झाला आहे.

‘गॉडफादर’च्या महानतेत त्याची चित्रकृती जितकी मोलाची, तितकीच साहित्यकृतीदेखील महत्त्वाची आहे. माझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये- मग तो ‘ब्लॅक फ्रायडे’ असो किंवा ‘वासेपूर’- लेखन ही त्यातली परमोच्च गोष्ट असून, या चित्रपटांचा तो मुख्य पाया आहे. लोकांपर्यंत हे चित्रपट पोहोचले, त्यांना भावले ते त्यांच्या मूळ कलाकृतींतील ताकदीमुळे! मी त्यात कोणत्याही शहाणिवेची भर घातलेली नसून, आधी लेखनातून लेखकाला जे काही सांगायचं आहे, तेच मी पूर्णपणे लोकांसमोर आणलं आहे. ‘मॅक्झिमम सिटी’चं रूपांतर मी केलं, तेव्हाही मला त्यात अधिक आकर्षक बाबींची जोड द्यावीशी वाटली नाही. कारण जे दृश्यकथेत अचूक यायला हवं होतं, ते आधीच या महाग्रंथात दिसत होतं. माझं दिग्दर्शकीय स्वातंत्र्य मी पुस्तकाशी एकरूप असणाऱ्या दृश्यकल्पना साकारण्यात वापरलं. आपल्याकडे होतं काय, की दिग्दर्शकीय स्वातंत्र्याच्या नावाखाली मूळ लेखनात अवास्तव बदल केले जातात. दिग्दर्शक अशा बदलांतून एकसुरी आणि सरधोपट अशी निर्मिती करत राहतो. ज्या कलाकृतीवर त्याचा चित्रपट आधारलेला असतो, त्यातला मुद्दा, त्यातली जादू, गाभा हरवून दिग्दर्शकाने आखून घेतलेल्या पठडीतला सिनेमा मग तयार होतो. ‘ब्लॅक फ्रायडे’ मी बनवला तेव्हा ‘गॉडफादर’ बनवणाऱ्या २९ वर्षीय कोपोलाइतक्याच बंडखोर नवनिर्मितीच्या माझ्या सिनेधारणा होत्या. माझ्याकडे सर्वोत्तम लिखाण पुस्तकरूपात होतं. त्याचं सगळं रूपडं आशयाला धक्का न लावता मला पटकथेतून सादर करायचं होतं. त्यावेळी कौशल्य, अति अनुभव यांचा असलेला अभावच या चित्रपटाला आहे त्या स्वरूपात उभा करू शकला. आता कदाचित माझ्याकडून असं घडलं नसतं. पुस्तकावर प्रगाढ विश्वास आणि चित्रनिर्मितीवर निष्ठा ठेवून तेव्हा एका नवख्या दिग्दर्शकाच्या हातून तयार झालेल्या ‘गॉडफादर’चं अद्भुत यश म्हणूूनच कायम ठळक राहणार आहे.

Advertisement

[email protected]

Source link

Advertisement