पेशवाईचा अंत झाल्यानंतर पुण्यातील जीवनाची मोठी वाताहत झाली. पेशव्यांच्या पदरी असलेले सर्व सैनिक बेरोजगार झाले. सैनिकांप्रमाणे पुण्यातील सावकारांवर सुद्धा मोठी आपत्ती कोसळली. हे सावकार पूर्वी पेशव्यांना कर्जावू रकमा देत असत.
लढाईवर जाताना अथवा ऐनवेळी पैसा लागला की हे सावकार पेशव्यांना मोठ-मोठ्या रकमा देत असत, तसेच सरदारानांही हे सावकार कर्ज देत होते पण पेशवाई बुडाल्यानंतर सावकारांचे लाखो रुपये येणे होते. जेथे पेशवे व सरदार यांचीच व्यवस्था कशी लागावी हा प्रश्न होता, तिथे सावकारांचा विचार कोण करणार.
सावकारांप्रमाणे इतरांवरही बाका प्रसंग आला होता, जवळ असलेले किडुक मिडूक विकुन गुजराण करायचा प्रसंग त्यांच्यावर आला होता. आदित्यवार पेठेत जुन्या दागिन्यांचे ढीग झाले होते. पुर्वी रविवार पेठेस आदित्यवार पेठ संबोधले जाई. इतर व्यापार बंद पडून गहाण ठेवणे व घेणे याच व्यापारात लोक गुंतलेले दिसत होते.
सन.१८१८ नंतर पुण्याची लोकसंख्या घटू लागली. सन.१८२२ साली येथील लोकसंख्या ७८,९१५ एवढीच होती. बहुतेक करून मंगळवार, सोमवार, नारायण, रविवार या पेठांमधून मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर करीत होते.
या स्थंलातरामुळे पुण्यातील मोठ-मोठाले वाडे भयाण वाटू लागले होते. सावकारांनी व लोकांनी मिळून पुण्यातील वड्यांचा व घरांचा विकून फडशा पाडला होता.
पुण्याची ही स्थिती सन. १८५५ साला पर्यंत कायम होती.