american painter mark rothko zws 70 | अभिजात : शापित चित्रकार

american painter mark rothko zws 70 | अभिजात : शापित चित्रकारअरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com

Advertisement

कला हे गहन अभिव्यक्तीचं माध्यम आणि कलेची निर्मिती ही एक नैतिक कृती मानणारे चित्रकार मार्क रॉथको (१९०३-१९७०) हे अतिशय मनस्वी रसायन होतं. त्यांच्याविषयी कलाजगतात सर्वश्रुत असलेली कहाणी म्हणजे न्यू यॉर्कच्या ‘फोर सीझन्स’ या विख्यात उपाहारगृहाने रॉथकोंना त्यांच्या डायिनग हॉलसाठी ६०० चौरस फूट भव्य म्युरलसारखी कॅनव्हासेस बनवण्याचं काम दिलं होतं.. अर्थातच भरपूर मानधन देऊन. रॉथको मुद्दाम फ्लोरेन्सला जाऊन मायकेलएंजेलोची म्युरल्स बघून आले आणि त्यांनी गडद रंगांत देखणी चित्रं काढली, ती साग्रसंगीत इच्छित स्थळी लागली, वगैरे, वगैरे. नंतर एकदा ते तिथे जेवायला गेले आणि संतापाने फणफणत घरी परतले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मानधनाचे पैसे परत केले आणि आपली चित्रं परत मागितली. ‘‘इथे येणारी असली पोकळ श्रीमंत माणसं जर या किमतीचं असलं खाणंपिणं करणार असतील तर त्यांना माझ्या चित्रांकडे पाहायची दृष्टी कुठून असणार?’’ हे त्यांचं म्हणणं. मुख्य म्हणजे त्या काळात रॉथकोंना आर्थिक स्थैर्य अजिबात नव्हतं. काही वर्षांनी त्यांनी ती नऊ कॅनव्हासेस लंडनच्या टेट मॉडर्नला दान करून टाकली. आज टेटमध्ये रॉथकोंचा छोटासा कक्ष आहे आणि त्यात त्यांचं ‘सायलेन्स इज सो अ‍ॅक्युरेट’ हे विधानही लिहिलेलं आहे.   

रॉथकोंचा जन्म लात्वियामधील एका ज्यू कुटुंबातला. शिल्पकार मॅक्स वेबरकडून रॉथको प्रिन्ट मेकिंग वगैरे तांत्रिक गोष्टी शिकले. पण बाकी ते स्वत:च्या अनुभवातून, अंत:प्रेरणेतून घडत गेले. लहानपणीच त्यांचं कुटुंब अमेरिकेत येऊन स्थायिक झाल्याने त्यांच्यात लात्विअन ज्यू रशियन मूळ आणि अमेरिकन बहुसांस्कृतिक अनुभवांचं मिश्रण आणि चार भाषांवर प्रभुत्व होतं.   

Advertisement

रॉथको सुरुवातीला फिगरेटिव्ह आणि इम्प्रेशनिस्टिक शैलीत काम करत. त्यांची काही चित्रं सíरअलिस्टिकही आहेत. पण त्यांना कोणा आर्ट मूव्हमेन्ट किंवा शैलीशी बांधिलकी नको होती. त्यांनी रंग, आकार आणि प्रकाशावर केंद्रित ‘कलर फिल्ड पेंटिंग्ज्’ ही एक वेगळीच शैली निर्माण केली. विसाव्या शतकात जोमाने वाढलेल्या अमूर्त एक्सप्रेशनिस्ट शैलीतून निघालेली रॉथकोंची शैली यथार्थवादी नाही, पण वास्तवातून निर्माण होणाऱ्या भावनांचं ती चित्रण करते. मोकळी जागा आणि रंगांपलीकडे जाणारं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे. एक्सप्रेशनिस्ट शैलीतले साधे आकार, चमकदार, प्रसन्न रंग आणि ब्रशचे वेगवान फटकारे त्यांच्या ऐन बहराच्या काळातील चित्रांतून दिसतात. त्यांत विविध रंगांतील आयत किंवा चौरस एकमेकांत निस्सीमपणे मिसळल्यासारखे वाटावेत, पण त्यांना स्वत:चं स्थानही असावं, असे. त्यांची चित्रं जवळून पाहिली की अंदाज येतो- रॉथको रंगांत खूप टर्पेटाइन मिसळून एका रंगावर दुसऱ्याचा हलकासा लेयर लावत आणि त्यांच्या सीमा एकमेकांत वितळू देत. पेंटिंग म्हणजे अनुभवाचं चित्रण नव्हे, पेंटिंग हाच एक अनुभव असतो असं मानणाऱ्या रॉथकोंची शैली म्हणजे रंगांचा सहजसाध्य खेळ वाटतो. पण तसं नाही, ही बाब फक्त दृश्य रंगानुभूतीची नाही, हे अनुकरण करणाऱ्याला पटकन् उमगतं.

रॉथकोंना जोन मीरो, कोरो व मातीसचं काम आवडत असे. यांच्यापैकी प्रत्येकाची शैली आणि तंत्र वेगळं असलं तरी आपल्या माध्यमाबद्दल एका मुलाखतीत रॉथको म्हणाले होते, ‘माझ्या सुरुवातीच्या चित्रांत आकार असत, आकृती असे. पण तेव्हा मी स्वत:ला शोधत होतो. जे व्यक्त करायचं होतं ते त्यातून पुरेसं व्यक्त होत नव्हतं. रंग बोलतात- स्वत:शीच आणि बरोबरच्या रंगांशीही. पाहणाऱ्याशीही. तो संवाद- कदाचित एखादंच विधान, भावना, विचार जमेल तितका समजून घ्यायचा असतो. ज्यांच्यापर्यंत तो पोहोचत नाही त्यांना मी चित्र काय सांगतंय हे समजवायला जाणार नाही. १९४० च्या दशकात व नंतर नित्शेना अभिप्रेत असलेली नि:शब्द, निराकार संगीताची भावना पेंटिंग्जमध्ये आणण्यासाठी मी चित्रांतून मानवाकृती वजा केली आणि अमूर्तता वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. चित्रकाराच्या कलेत सातत्याने स्पष्टता यायला हवी.’

Advertisement

रॉथकोंना चित्रं फ्रेममध्ये बंदिस्त केलेली चालत नसत. चित्र पुरं झालं की कॅनव्हास फ्रेमवर बसवून टांगलं जाई. चित्रांना कुठलीही बद्ध करणारी चौकट नसते.. अगदी संदर्भाचीदेखील. त्या मुक्त अनुभूतीत दर्शकाने चित्रकाराला अभिप्रेत अर्थ उकलू पाहायचा. त्यांच्यावर मोत्झार्तचा प्रभाव होता आणि ग्रीक शोकांतिकांचाही! अव्यक्त वेदना त्यांना चित्रांत मांडावीशी वाटे. मोकळ्या जागा- काही सुनेपणाची पोकळी सुचवणाऱ्या, काही भावनेचं गहिरेपण, तर काही आनंदकल्लोळ दाखवणाऱ्या!! फक्त एक व्यक्तिगत भावना.. अनेकांच्या मनांच्या तारा छेडणारी. म्हणूनच कदाचित रोथकोंच्या प्रदर्शनाला आलेल्या दर्शकांमध्ये काही माणसं आतून हललेली दिसतात, डोळे पुसताना दिसतात. त्यांना त्यांची चित्रं प्रदर्शनाच्या िभतींवर जमिनीच्या जवळ लावलेली आवडायची. पाहणाऱ्याला चित्रांत शिरता यावं या भावनेनं. १९६०-७० दरम्यानची रॉथकोंची चित्रं संपृक्त, गडद रंगात दिसतात. आयुष्याच्या शेवटच्या दशकात हे रंग करडय़ा, काळ्या, राखाडी रूपात बदलले हे त्यांच्या खिन्न मन:स्थितीचं प्रतििबब असावं का? आधीचं माध्यम ऑइल ऑन कॅनव्हास त्यांचं खऱ्या आवडीचं. पण नंतर ढासळत चाललेल्या शारीरिक ताकदीला ते झेपेना, म्हणून अ‍ॅक्रॅलिक वापरायला सुरुवात केली. कॅनव्हासचा आकारही लहान करावा लागला. आणि अशा गोष्टी रोथकोंच्या मनाला िपजत राहत.         

आर्थिक स्थिती चांगली नव्हती तेव्हाही कोणी सधन व्यक्ती त्यांच्या स्टुडिओत येऊन चित्रं विकत घेण्याचा प्रयत्न करत असेल तर वाटेल ती किंमत घेऊन चित्र विकलं असं कधी झालं नाही. आयुष्याच्या सायंकाळी त्यांना कलेच्या जाणकारांची भरघोस दाद व लोकमान्यता मिळाली आणि पैसाही. माणूस चित्र कसं पाहतोय, त्याची प्रतिक्रिया काय होतेय हे रॉथको न्याहाळत असत. चित्र सुस्थळीच पडायला हवं असा त्यांचा हट्ट असे. जर त्या व्यक्तीकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर दारी चालून आलेल्या लक्ष्मीला परतीची वाट दाखवली जाई. हाच दंडक आर्ट डीलर्सशी सौदा करताना! जिथे प्रदर्शन मांडायचं त्या गॅलरीसाठीही ते मांडणी, प्रकाशव्यवस्था याबाबत अतिशय चोखंदळ असत. आपली चित्रं भावंडांसारखी एकत्र राहावीत, कोणा बडय़ा घरात जाऊन एकटी पडू नयेत असंही त्यांना वाटायचं. ते त्यांनी मित्रांजवळ बोलूनही दाखवलं होतं. दोन्ही मुलं त्यांच्या अचानक शेवटाच्या वेळी लहान असल्यानं त्यांच्याशी व्यावसायिक निरवानिरवीचं बोलणं झालं नव्हतं. १९५४ मध्ये रॉथकोंनी मातीसना श्रद्धांजली म्हणून केलेलं ‘होमेज टू मातीस’ हे पेंटिंग खूप गाजलं आणि त्यांच्या माघारी ते ख्रिस्तीजच्या लिलावात २२.४ मिलियन डॉलर्सना विकलं गेलं. रॉथकोंची चित्रं न्यू यॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट आणि मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पाहता येतात. लात्वियाच्या रिगा या राजधानीत- जिथे रॉथको लहानाचे मोठे झाले तिथे- त्यांच्या नावाने एक कला केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यात त्यांच्या चित्रांच्या ४० हून अधिक प्रतिकृती कायमस्वरूपी प्रदर्शनात ठेवल्या गेल्या आहेत.

Advertisement

रॉथकोंची नि:शब्द, निराकार चिंतनशीलता भावणाऱ्या मेनील नावाच्या जोडप्यानं त्यांना ुस्टनमध्ये एक चॅपल बनवायचं काम दिलं. अंत:सज्जेत काळ्या छटांची भव्य पॅनल्स असलेलं हे अष्टकोनी प्रार्थनास्थळ १९७१ मध्ये सर्वासाठी खुलं झालं. या गंभीर, आत्मिक शांतीच्या उदात्त हेतूने साकार केलेल्या वास्तूची दारं जनसामान्यांना उघडी होण्याआधीच काही महिने रॉथकोंनी जगाचा निरोप घेतला होता. हे प्रार्थनास्थळ इथे येणाऱ्या प्रत्येकाला चिंतनासाठी, धर्मामधील संवादासाठी आणि मानवी मूल्यं व हक्कांसाठी असणारं स्थान असावं, हा त्यामागचा विचार होता. जगाला शांतीसाठी इतकी प्रशांत वास्तू देणाऱ्याला आयुष्यभर मन:शांती अप्राप्य राहिली, हा खरोखर दैवदुर्विलास! मद्यपानाच्या आहारी गेलेल्या रॉथकोंचा शेवट मात्र फार दु:खद झाला. अनेक मित्रमैत्रिणी होत्या, पण त्यांच्या स्टुडिओत क्वचितच कोणाला प्रवेश असे. काम करताना फक्त मोत्झार्तची साथ असायची. सदैव. वयाच्या ६६व्या वर्षी रॉथको त्यांच्या मॅनहटनमधील स्टुडिओत रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण अवस्थेत सापडले. ब्लेडने त्यांनी हाताची रक्तवाहिनी घाव घालून कापून टाकली होती आणि खूप झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. आत्महत्येचं कारण अज्ञात राहिलं. रंगांच्या शब्दकोडय़ाचे क्ल्यूजच हरवून जावेत तसं..

Source link

Advertisement