आषाढ वारी – 700 वर्षांची अखंड परंपरा

Image Source: Mahesh Lonkar

“वैकुंठ तें घर | सांडूनिया निरंतर ||१|| 

तो हा पुंडलिका द्वारीं | उभा कर कटावरी ||२|| 

Advertisement

क्षीर सागरींची मूर्ती | तों हा रुक्मिणीचा पती ||३||

नये योगियांचे ध्यानीं | छंदे नाचतो कीर्तनी ||४||

Advertisement

नामा म्हणें आला | सर्व परिवार आणिला ||५||

आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढपूरपर्यंत केलेली पदयात्रा. वारीच्या ह्या आनंद सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस फक्त ‘वारकरी’ असतो, तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो. भक्ती आणि समर्पण हि त्याची ठळक ओळख असते.

Advertisement

लाखोंच्या संख्येने जमणाऱ्या भक्तांची अत्यंत शिस्तीने पार पडणारी हि वारी म्हणजे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा. आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तर देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून त्या पंढरपुरात येतात, हा पालखी सोहळा म्हणजे वारीचे आकर्षण. वारीचा हा इतिहास जुना आहे. संत ज्ञानदेवांच्या घराण्यात वारीची परंपरा असल्याचे उल्लेख आढळतात. वारकरी धर्म म्हणजेच भागवत धर्म. हि भागवत धर्माची पताका सर्व थरातील लोकांना एकत्र करून ज्ञानदेवांनी फडकवली. पुढे संत तुकाराम, संत एकनाथ आणि इतर संतश्रेष्ठांनी व वारकरी संप्रदायाने पुढे चालवली.

आमुचे मिरासी पंढरी | आमुचे घर भीमातिरी ||

Advertisement

पांडुरंग आमुचा पिता | रखुमाई आमुची माता ||

भाऊ पुंडलिक मुनि | चंद्रभागा आमुची बहिणी ||

Advertisement

तुका जुनाट मिराशी | ठाव दिला पायांपाशी ||

भक्त पुंडलिकापासून  वारीचा हा इतिहास चालू होतो. ज्ञानदेव पूर्व काळ – भक्त पुंडलिकाचा काळ, ज्ञानदेव – नामदेव काळ, भानुदास – संत एकनाथ काळ, तुकाराम महाराज- निळोबा यांचा काळ आणि त्या नंतरचा ३ ते ४ शतकांचा हा कालखंड इतकी प्रदीर्घ अशी सातशे वर्षांची अखंड अशी वारीची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. 

Advertisement

आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व संतांच्या पालख्या त्यांच्या गावातून पंढरपुरात एकादशीला दाखल होतात. ‘पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ अशी वारकरी संप्रदायाची भावना आहे.

“विठू तुझ्या राउळात 

Advertisement

संत झाले सारे गोळा

आली तुकयाची पालखी

Advertisement

चाले वैष्णवांचा मेला ||”

पालखी सोहळ्या सोबतच ‘रिंगण’ आणि ‘धावा’ हि वारीची वैशिष्ट्ये आहेत. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात, यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर माउलींचा घोडा धावतो ‘माउलींचा अश्व’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्वावर ज्ञानेश्वर महाराज स्वतः आरूढ होता अशी धारणा आहे. कडूस फाटा, वेळापूर, आणि वखारी येथे रिंगण होते. तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रिंगणे हि जेवणापूर्वी तर दोन जेवानंतर होतात. दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूने होतात. माउलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्री क्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायी आणला जातो. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातल्या जातात. रिंगणानंतर होणारा ‘उडीचा कार्यक्रम’ हा अवर्णनीय असतो.

Advertisement

“आषाढीला चाले माझ्या 

ज्ञानदेवाची पालखी

Advertisement

खेळे पाऊली रिंगण

नाम विठ्ठलाचे मुखी ||”

Advertisement

तर ‘धावा’ म्हणजे धावणे. असे म्हणतात कि पंढरपूरला जातांना तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्या टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि पांडुरंगाच्या ओढीने तिथून पंढरपुरापर्यंत ते धावत गेले. या आख्यायिकेचे स्मरण म्हणून वारकरी देखील हा शेवटचा टप्पा धावत पार करतात.

‘जन्माजन्मीची संगत | भेटी झाली अकस्मात ||

Advertisement

आतां सोडितां सुटेना | तंतु प्रीतीचे तुटेना ||

माझे चित्त तुझ्या पायां | मिठी पडली पंढरीराया ||

Advertisement

तुका म्हणे अंति | तुझी माझी एक गती ||

लाखोंच्या संख्येने लोक सामील होतात परंतु वारीत भांडण-तंटे किंवा वारीमुळे इतर जीवनमानात कधी अडचण झाल्याचे ऐकिवात नाही.  काही असेलच तर वाद रात्री तळावर सोडविण्यात येतात. वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबा यांच्या पासून चालत आल्या आहेत व त्यांचे पूर्वज आजही अत्यंत श्रद्धेने त्या पार पाडत आहेत. वारीत चालत असतांना म्हणावयाच्या अभंगांचा क्रम  आणि नियम ठरलेला असतो. ठराविक वरांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. प्रत्येक दिंडीत मात्र एकावेळी एकच अभंग ऐकू येतो. विसाव्याच्या जागी जोवर माउली विसावत नाही तोवर दिंडी देखील विसावा घेत नाही. काही वारकरी संपूर्ण वारीभर पाणी वाटपाचे कार्य करतात, काही अनवाणी चालतात. निष्काम सेवेचा धडा या वारीतून मिळतो. 

Advertisement

वारीमध्ये अखंडपणे  ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर चालू असतो. एक शब्द श्वास आहे तर दुसरा म्हणजे उच्छ्वास. या दोन नावांत माउलींच्या पूर्वीचे, दोघांच्या दरम्यानचे व तुकोबारायांच्या नंतरचे सर्व संत सामावले आहे अशी मान्यता आहे.

अत्यंत पराकोटीच्या प्रेमाचा, भक्तीचा, श्रद्धेचा हा सोहळा म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी ह्या आनंदाला आपण मुकलो असलो तरी श्री पांडुरंगाचे प्रेम आणि भक्तांची ओढ यामुळे आपण लवकरच सावरू. 

Advertisement

वारी म्हणजे फक्त भक्ती नाही तर तो एक ‘निष्काम कर्म योग आहे. अखंड सेवा आणि त्यागाची वृत्ती आहे. समर्पणाची सीमा आहे. प्रेमाची व्याख्या आहे. शिस्तीचा परिपाठ आहे. जरी आपण वारीला जात नसलो, त्याचा भाग कधी झालो नसेल तरी वारीचे हे विशेष आणि गुण आयुष्याचा भाग बनवणे हि देखील ईश्वर सेवाच घडेल. आयुष्याला दिशा देण्याचे, समाधानाचा मार्ग दाखवण्याचे कार्य ह्या भावांतून नक्कीच साध्य होत असावे. वारीबद्दल जाणून घेतल्यावर त्याचा भाग होण्याची इच्छा न होणारा मनुष्य विरळाच भेटेल. वारी म्हणजे वारकरी संप्रदयाची वर्षभराचीप्रतीक्षा असते. वर्षभर पैसे जमवून, आपले सांसारिक कर्तव्य पार पाडूननेमाने ते वारीला जातात, पण ह्या वर्षी कोरोनामुळे ह्या आनंदाला तेमुकणार. विठ्ठलाच्या मनात काय आहे हे तोच जाणे पण त्यालाही त्रासहोतंच असणार. शासकीय सर्व नियम पाळून परंपरेचे पालन होणार आहेपण दरवर्षीप्रमाणे लाखो भक्तांच्या प्रेमाने उजळणारा सोहळा पाहायलाआपण मुकणार आहोत ह्याचे वाईट वाटते.

हा नामदेवांच्या गाथेतील अभंग म्हणजे संपूर्ण आषाढ वारीच्या, साक्षात पांडुरंग आणि त्याच्या प्रिय भक्तांच्या भावनांचे यथोचित शब्दांकन आहे. 

Advertisement

आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे पांडुरंग ||१||

पतितपावन मी तो आहे खरा | तुमचेनि बरा दिसतसे ||२||

Advertisement

तुम्ही जातां गांवा हुरहुर माझे जीव | भेटाल केधवां मजलागीं ||३||

धांवोनिया देव गळां  घाली मिठी | स्फुंदूनस्फुंदून गोष्टी बोलतसे ||४||

Advertisement

तिन्हीं त्रिभुवनीं मज नाहीं कोणी | म्हणे चक्रपाणि नामयासी ||५||

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here