89 हजार वीज बिलांच्या छापील कागदाचा वापर बंद: महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ला पर्यावरणस्नेहींचा मोठा प्रतिसाद


पुणे25 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे परिमंडलातील 88 हजार 925 पर्यावरणस्नेही ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये 14 हजार 140 ग्राहकांचा सहभाग वाढला आहे.

Advertisement

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ते ‘गो-ग्रीन’ योजनेतील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाईनद्वारे तात्काळ भरण्याची सोय उपलब्ध आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे असे एकूण 12 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळस्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

Advertisement

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील 47 हजार 574 तर पिंपरी चिंचवड शहरातील 26 हजार 117 तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली तालुक्यामध्ये 15 हजार 234 ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती देत पर्यावरणपुरक योजनेत सहभाग घेतला आहे. महावितरणची ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement