अहमदनगर3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन देण्याची योजना राज्य सरकारमार्फत राबवली जाते. योजनेंतर्गत 785 प्रस्ताव दाखल झाले होते पैकी 100 प्रस्तावांना जिल्हास्तर समितीने मंजुरी दिली आहे. शासनाकडून दिले जाणारे उद्दिष्ट अत्यल्प असल्याने 685 कलावंत मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन योजनेंतर्गत कलावंतांना मानधन देण्याची योजना राबवली जाते. शासनाकडून जिल्ह्यासाठी अवघे 100 कलावंतांनाच मानधन देण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. त्यातुलनेत 785 प्रस्ताव समितीसमोर निवडीसाठी होते. शासनाकडून अल्प उद्दिष्ट दिल्यामुळे कलावंत असूनही मोठ्या संख्येने कलावंत या योजनेपासून वंचित राहतात.
जिल्हा परिषदेत झालेल्या जिल्हास्तर निवड समितीच्या बैठकीत 100 वृध्द साहित्यिक व कलावंतांच्या मानधनास मंजुरी देण्यात आल्याची माहिती या योजनेचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देव्हढे यांनी दिली.
कलावंतांचे अ वर्ग, ब वर्ग, तसेच क वर्ग अशी वर्गवारी करून त्यांना मानधनाची रक्कम निश्चित केली जाते. अ वर्गसाठी 3150, ब वर्ग कलावंतासाठी 2700 तर क वर्ग कलावंतासाठी 2250 रूपये मानधन दिले जाते. बैठकीसाठी समितीचे अध्यक्ष नाना महाराज गागरे (राहुरी), नवनाथ महाराज म्हस्के (राहता), शाहीर निजामभाई शेख (श्रीगोंदा), लावणी सम्राज्ञी राजश्री काळे (नगर), विकास महाराज गायकवाड (राहाता), महादेव महाराज झेंडे (श्रीगोंदा) आदी सदस्य उपस्थित होते.
जिल्हाभरातून दाखल झालेल्या 785 प्रस्तावांची छाननी करून 100 कलावंतांच्या मानधनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी राघवेंद्र चव्हाण व कार्यालय अधीक्षक आर. ए. फंड उपस्थित होते.