नागपूर14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय जनता पार्टीचे विदर्भाचे माजी संघटनमंत्री अरविंद शहापूरकर यांचे शुक्रवारी रात्री एम्समध्ये निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. शनिवारी दुपारी 4 वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडला.
शहापूरकर यांच्या जाण्यामुळे भाजपाने एक उत्तम संघटक गमावला आहे अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. विदर्भातील काना-कोपरा आणि तेथील संघटनेची स्थिती याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असायची. सातत्याने प्रवास करून त्यांनी भाजपा बळकट करण्यासाठी परिश्रम केले.
सातत्याने नेते-कार्यकर्त्यांच्या भेटी आणि पक्षाचे चिंतन त्यांनी कधी सोडले नाही असे फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहापूरकर यांच्या जाण्यामुळे आपली वैयक्तिक हानी झाल्याचे म्हटले आहे. संघर्षाच्या काळात पराभवाने कधीही न डगमगता कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद जागवण्याचे काम शहापुरकर यांनी केल्याचे गडकरी शोकसंवेदनेत म्हटले आहे.
1980 मध्ये नागपूरमधून एमकाॅम झालेल्या शहापूरकर यांनी नोकरी न करता रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून निघायचे ठरवले. नागपूर जिल्ह्यातील नरखेडमधून प्रचारक जीवनाला सुरूवात केली. अमरावती महानगर व खामगाव येथेही प्रचारक म्हणून 1990 पर्यत काम केले. 1990 च्या प्रांत बैठकीत तत्कालिन प्रांत प्रचारक मोहन भागवत यांनी शहापुरकर यांना भाजपाचे काम करण्याचा आदेश दिला. तेव्हापासून ते भाजपाचे काम करीत होते.