आयपीएल हंगामाचा पहिला टप्पा संपला असून आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान, यावर्षी सर्वच संघ बदललेले दिसून आले आहेत. आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा मोठा लिलाव पार पडला होता. या लिलावातून प्रत्येक संघाने आपली संघबांधणी पूर्ण केली. पण, या लिलावाआधी जुन्या ८ संघांना आपल्या किमान ४ खेळाडूंना संघात कायम करण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांना ३ खेळाडूंना लिलावाआधी आपल्या संघात स्थान देण्याची परवानगी होती.
या नियमानुसार प्रत्येक संघाने आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात कायम केले. या खेळाडूंवर संघांचा सर्वाधिक भार होता. पण, यातील काही खेळाडू आता आयपीएल २०२२ चा पहिला टप्पा संपल्यानंतरही छाप पाडू शकले नाहीत. या लेखातही आपण त्या चार खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, लिलावात संघात कायम केल्यानंतर छाप पाडू शकले नाहीत.
१. एन्रीच नॉर्किया – दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्कियाने गेल्या दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना शानदार कामगिरी केली होती. त्याच्या वेगवान चेंडूंचे कौतुकही झाले होते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने त्याला आयपीएल २०२२ साठी संघात ६.५ कोटी रुपयांसह कायम केले. मात्र, तो संघात दुखापतीनंतर सामील झाला आणि त्याचा फॉर्मही हरवलेला वाटला. त्याने या हंगामात केवळ १ सामनाच खेळला. यातही त्याने २ बीमर टाकले म्हणून पंचांनी त्याला गोलंदाजीपासून थांबवले होते. त्यानंतर त्याला दिल्लीने अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिलेली नाही. यापुढेही त्याला कितपत संधी मिळणार आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
२. कायरन पोलार्ड – मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल चर्चा झाली, तर कायरन पोलार्डचे नाव आल्याशिवाय राहत नाही. त्याने आत्तापर्यंत या संघासाठी अनेकदा महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. इतकेच नाही, तर गोलंदाजीतही त्याने आपले योगदान दिले आहे. त्यामुळे जवळपास एक दशकाहून संघात असलेल्या पोलार्डला मुंबईने आयपीएल २०२२ साठी संघात कायम केले होते. मात्र, पोलार्ड या हंगामात खास काही करू शकलेला नाही. त्याने ९ सामने खेळताना १२५ धावा केल्या. तसेच ३ विकेट्स घेतल्या. त्याने एकदाही मुंबईसाठी मॅचविनिंग कामगिरी केली नाही.
३. यशस्वी जयस्वाल – भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ साठी तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून संघात कायम केले होते. मात्र, तो या हंगामात छाप पाडण्यात यशस्वी ठरला नाही. त्याला केवळ या हंगामात ३ सामने खेळण्याचीच संधी देण्यात आली. तसेच तो देखील या ३ सामन्यात फार मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने ३ सामन्यात केवळ २५ धावा केल्या.
४. वेंकटेश अय्यर – आयपीएल २०२१ मध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने वेंकटेश अय्यरने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्याच्या या खेळाकडे पाहून त्याची भारताच्या संघातही निवड झाली होती. तसेच कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी त्याला संघात कायम केले होते. पण, आयपीएलच्या १५ व्या हंगामात वेंकटेश अय्यरची कामगिरी खास झाली नाही. त्याला ९ सामन्यानंतर कोलकाताने अंतिम ११ जणांच्या संघातूनही वगळले. वेंकटेशने या हंगामात ९ सामन्यात १३२ धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजी करताना एकही विकेट घेतली नाही.