जळगाव7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मोदी सरकारने सत्तेत येण्यासाठी जनतेला दिलेली पंधरा लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्यांसह इतर आश्वासने तसेच देशात आणि राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना,महागाई अशा विविध मुद्यांवर होऊ द्या चर्चा अभियानांतर्गत ठाकरे गट जनतेत चर्चा करणार आहे. या अभियानाचा कार्यक्रम मातोश्रीवरुन ठरवून देण्यात आला आहे. या अभियानात नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराविरोधात बोलते करणे हा प्रमुख उद्देश आहे.
अभियानाच्या नियोजनासाठी सोमवारी लेवा भवनात बैठक घेण्यात आली. ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन,उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, सुनील महाजन, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ठाकरे गटाचे फर्ड्या वक्त्यांची नावे यासाठी निश्चित करण्यात येणार आहेत. शहर व ग्रामीण भागात सभा, बैठका घ्यावयाच्या आहेत. गावात, शहरातील वार्डात ठाकरे गटाचे पदाधिकारी जाणार आहेत.
गावातील पार, बसस्थानक, चौकात चर्चा करणार आहेत.नागरिकांनाही त्या चर्चेत सहभागी करून घेणार आहेत. तेथील नियोजनाची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर देणार आहेत. लोकसभा मतदार संघातील सभा, बैठकांचे नियोजन जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख यांच्याकडून मागवण्यात आले आहे. अभियानाचा दुसरा टप्पा 1 ते 12 ऑक्टोबर या दरम्यान आहे. या कालावधीत सभा, बैठका घेण्यात येणार आहेत.
चांगला आवाज असणारा स्पिकर, दोन माईक, छोटा बॅनर, खुर्च्याची व्यवस्था करण्यात येईल. या बैठकांना पदाधिकारी तसेच नागरिकांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोरोना संसर्ग,शेतकरी कर्जमाफी व इतर चांगले निर्णयही ठाकरे गटाचे पदाधिकारी जनतेला सांगणार आहेत.
नागरिकांनी उलट प्रश्न विचारल्यास तयारी…
वक्त्यांना दिलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करावा. कदाचित उपस्थित नागरिकांकडून वक्त्यांना उलट प्रश्न विचारले जावू शकतात. त्याची उत्तरे वक्त्यांना देता आली पाहिजेत. वक्त्यांकडून आक्षेपार्ह विधान होणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानात नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराविरोधात बोलते करणे,हा मुळ उद्देश आहे.