हैदराबादने गुजरातला पराजयाचा स्वाद चाखवत आठ गडी राखून दिमाखदार विजय

हैदराबादने गुजरातला पराजयाचा स्वाद चाखवत आठ गडी राखून दिमाखदार विजय
हैदराबादने गुजरातला पराजयाचा स्वाद चाखवत आठ गडी राखून दिमाखदार विजय

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सोमवारी (११ एप्रिल) आयपीएल २०२२ मधील २१वा सामना झाला. हा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दोन्हीही संघांच्या कर्णधारांनी धुव्वादार फलंदाजी करत अर्धशतके केली. मात्र गुजरातच्या गोलंदाजांना अपेक्षित प्रदर्शन न करता आल्यामुळे हैदराबादने ८ विकेट्सने या सामन्यात बाजी मारली. हा त्यांचा हंगामातील दुसराच विजय आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने २० षटकात ७ बाद १६२ धावा केल्या होत्या. गुजरातच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने ५ चेंडू राखून सामना जिंकला. त्यांनी १९.१ षटकांमध्येच २ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा करत गुजरातचे लक्ष्य पार केले.

Advertisement

गुजरातच्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून कर्णधार केन विलियम्सनने कडकडीत अर्धशतकी खेळी केली. त्याने ४६ चेंडू खेळताना ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५७ धावा फटकावल्या. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. सलामीवीर अभिषेक शर्मा यानेही ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटी निकोलस पूरन (३४ धावा) आणि ऍडम मार्करम (१२ धावा) यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचे काम केले. या डावात गुजरातचे गोलंदाज अपयशी ठरल्याचे दिसले. गुजरातकडून फक्त राशिद खान आणि हार्दिक पंड्यालाच विकेट घेता आल्या.

Advertisement

सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने २० षटकांत १६२ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने केलेलं संयमी अर्धशतक आणि अभिनव मनोहरची २१ चेंडूत ३५ धावांची फटकेबाजी याच्या बळावर गुजरातला ही धावसंख्या गाठता आली. पहिल्या डावात हार्दिकने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरीही चर्चा मात्र अभिनव मनोहरची रंगली. हैदराबादचे फिल्डर्स गुजरातच्या अभिनव मनोहरवर मेहेरबान झाल्याचं दिसून आले. एक वेळ अशी आली की स्वत: फलंदाज अभिनव मनोहरला देखील हसू आवरले नाही.

हार्दिक पांड्या एका बाजूने संयमी खेळी खेळत असताना डेव्हिड मिलर बाद झाला. त्याच्या जागी अभिनव मनोहर फलंदाजीसाठी आला. त्याने आल्यापासूनच फटकेबाजीला सुरूवात केली. त्यातच त्याला हैदराबादच्या खराब क्षेत्ररक्षणाची साथ लाभली. अभिनव मनोहरचे हैदराबादच्या फिल्डर्सने तब्बल तीन वेळा झेल सोडले. त्यामुळे त्याला जीवदान मिळालं आणि त्यालाही हसू अनावर झाल्याचं दिसून आले.

Advertisement