नागपूर4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सावनेर तालुक्यातील हेटी-सुरला शिवारात शेतात काम करताना वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. वासुदेव उर्फ कवडू रेवाराम खंगारे (43, पहलेपार, ता. सावनेर) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गुरूवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. पावसाची दाट शक्यता होती. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.
शेतातील झाडाखाली घेतला होता आश्रय
पावसाची सुरुवात होताच खंगारे हे शेतातील एका झाडाखाली आश्रय घेण्याकरीता गेले. त्याचवेळी अंगावर वीज पडल्याने ते जमिनीवर कोसळले. ही बाब शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आली. त्यांच्याकडे धाव घेत आरडाओरड सुरू केली. तत्काळ शासकीय रुग्णालय सावनेर दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले व दोन लहान भाऊ, असा आप्त परिवार आहे. वासुदेव हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
नागपूर शहरासह जिल्ह्यात गुरूवारी कमी अधिक प्रमाणात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. गुरूवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस आला. या पावसाळ्यात पहिल्यांदा चांगला पाऊस झाला. नागपुरातही दुपारी ४ वाजता नंतर हलका पाऊस आला. मात्र सायंकाळी ७ नंतर दोन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने गर्मीपासून दिलासा मिळाला.