हिंगोली: पातोंड्यात वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांचा हल्ला, दगडफेकीत 11 जण जखमी, वन विभागाकडून हवेत गोळीबार, पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी


Advertisement

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

हिंगोली तालुकयातील पातोंड येथे वन जमीनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये वन विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह 11 जण जखमी झाले आहे. यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी वनविभागाने हवेत तीन राऊंड फायर केले. बुधवारी (ता. 5) सकाळी हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Advertisement

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या पातोंडा शिवारात असलेल्या 33 एकर जागेवर नऊ जणांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणधारकांनी या जमीनीवर पिकांची पेरणीही केली होती. तसेच या जागेवर झोपड्या देखील बांधल्या होत्या. मात्र अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नऊ जणांना एक महिन्यापुर्वी नोटीस देऊन तातडीने अतिक्रमण हटविण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मात्र, त्यानंतरही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेच नाही शिवाय त्या ठिकाणी पुन्हा पेरणीच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यानंतर वन विभागाने नोटीस देऊन आज अतिक्रमण काढण्याचे कळविले होते. मात्र त्यांनी अतिक्रमण काढलेच नाही. त्यानंतर आज सकाळी वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, विनोद जांभुळे यांच्यासह ३० जणांचा ताफा जेसीबी मशीनसह पातोंडा शिवारात अतिक्रमण काढण्यासाठी गेला होता. वन विभागाचे पथक येत असल्याचे लक्षात येताच अतिक्रमणधारकांनी त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यास सुरवात केली. या दगडफेकीत वनपरिक्षेत्र अधिकारी टाक, जांभूळे, कर्मचारी ए. आर. अहिनाले, एस. एस. सावंत, के. बी. आयनले, प्रकाश केंधळे, पी. ए. लष्करे यांच्यासह ११ जण जखमी झाले. तर यावेळी वन विभागाने प्रत्युत्तरात केलेल्या लाठी चार्जमध्ये दोन गावकरी जखमी झाले. जखमींना सिरसम येथील प्राथमिक आरोग्य केद्र व हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हवेत तीन राऊंड फायर केले.

Advertisement

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार नाना पोले, मगन पवार यांच्यासह दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरवात झाली आहे.

दरम्यान, गावात तसेच घटनास्थळाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने या भागाला छावणीचे रुप आले आहे. या प्रकरणात पोलिस कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement