हिंगोलीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
हिंगोली जिल्हयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून वादग्रस्त मजकूर प्रसारीत करणाऱ्या 146 जणांना नोटीसा बाजवण्यात आल्या आहेत. या शिवाय शांतता भंग करणाऱ्या 49 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्हयात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकाठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. तर हिंगोली शहरात मिरवणुक मार्ग व विसर्जन मार्गाची पाहणी देखील करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हयात आतापर्यंत शांतता भंग करणे व इतर कारणावरून 49 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय तीन जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय सोशल मिडीयावर पोलिस प्रशासनाची करडी नजर असून वादग्रस्त मजकूर प्रसारीत करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय 146 जणांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होऊ नये यासाठी खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांत विविध यात्रा व मिरवणुकीच्या काळात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या शिवाय विशेष पथकाच्या माध्यमातून बेकायदेशीर दारु विक्रीवर छापे टाकले जात असून मागील पंधरा दिवसांत 53 ठिकाणी छापे टाकून 1.81 लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. या शिवाय 37 ठिकाणी जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आले असून त्यात 86 जणांवर गुन्हे दाखल करून 5.14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात वाढीव पोलिस बंदोबस्त
हिंगोली जिल्हयात गणेशोत्सवासाठी बाहेर जिल्हयातून एक उपाधिक्षक, 10 पोलिस उपनिरीक्षक, 100 पोलिस कर्मचारी, 100 महिला पोलिस कर्मचारी, 1 राज्य राखीव दलाची कंपनी, स्थानिक जिल्हयातील 800 पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे 1 हजार जवान असा बंदोबस्त असणार आहे.