प्रतिनिधी | हिंगोलीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी हिंगोलीत असे बलून उभारले होते. मात्र, शनिवारी रात्रीच ते कापण्यात आल्याचे समोर आले आहे.
हिंगोलीच्या रामलीला मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठकारे यांच्या स्वागतासाठी उभारलेले बलून कापून टाकल्याचा प्रकार आज रविवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजच्या माध्यमातून बलून तोडणाऱ्याचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
ठाकरे गटाची एका महिन्यापासून तयारी
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर आज दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांची सभा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची मराठवाड्यातील ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष या सभेकडे लक्ष लागले आहे. या सभेच्या तयारीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी उपसभापती अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांच्यासह पदाधिकारी मागील एक महिन्यापासून तयारीला लागले आहेत.
प्रचारासाठी ठिकठिकाणी फलक
दरम्यान, या सभेला जास्तीत जास्त गावकऱ्यांनी उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी गावोगावी बैठका घेऊन गावकऱ्यांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या सभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी फलक देखील उभारण्यात आले आहेत. या शिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी रामलीला मैदानाच्या सभेच्या ठिकाणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे दोन बलून उभारले होते. शनिवारी (ता. २६) दुपारी हे बलून उभारण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तीने बलून कापल्याचा प्रकार आज सकाळी आढळून आला.
बलून कापणाऱ्याचा शोध सुरू
बलून कापून टाकल्याप्रकरणी अजित मगर यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास बलून कापले असून यामध्ये ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी सभेच्या ठिकाणावर असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून बलून कापणाऱ्याचा शोध सुरु केला आहे.
संबंधित वृत्त
आज हिंगोलीत उद्धव ठाकरेंची निर्धार सभा:गड पुन्हा उभारू- ठाकरेंची साद; कोणाची किती ताकद कळेल, संतोष बांगरांचे प्रत्युत्तर
आज हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होणार आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगरदेखील शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे आज संतोष बांगर यांच्याविरोधात आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर