अक्षय देवरस
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस न पडणे ही गोष्ट आता आपल्या अंगवळणी पडली आहे. जगभरात बिनचूक हवामान अंदाज वर्तवले जात असताना आपल्याकडेच असे का व्हावे, हा प्रश्न सामान्यांना भेडसावत असतो. त्याचे कारण संशोधनातील सातत्याचा अभाव, तसेच नवनव्या तंत्रज्ञानांच्या आधारे पाऊसमानाचा वेध घेण्याची क्षमता विकसित करणे अशा गोष्टींत आपण कमी पडतो आहोत. यात आता आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.
भारतीय हवामान खाते आणि त्यांच्याकडून केले जाणारे मोसमी पावसाचे भाकित हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी मोसमी पाऊस कोणत्या भागात कधी दाखल होणार याचा दीर्घकालीन अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही आणि अचानक मोसमी पाऊस दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली. मोसमी पावसाच्या भाकितातील या अनिश्चिततेमुळे भारतातला शेतकरी, तो करत असलेली शेती आणि त्यावर अवलंबून असलेले अर्थकारण असे सारेच प्रभावित होत आहे.
भारतीय हवामान खात्याने यावर्षी मोसमी पाऊस २७ मे रोजी(+/- ४ दिवस) केरळात दाखल होईल असा अंदाज १३ मे रोजी दिला. या अंदाजानंतर २६ मेपर्यंत खात्याकडून निश्चितपणे असे काहीही सांगण्यात आले नाही. केरळात होणाऱ्या मोसमी पावसाच्या आगमनाबद्दल अचानक २७ मे रोजी दुपारी एक वाजून ३० मिनिटांनी दिल्ली मुख्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात २९ ते ३० मेदरम्यान मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ मे रोजी दुपारी एक वाजून ३० मिनिटांनी पुन्हा एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात ३० ते ३१ मेदरम्यान मोसमी पावसाच्या आगमनासाठी स्थिती अनुकूल असल्याचे सांगण्यात आले. आणि अचानक २९ मे रोजी सकाळी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा खात्याने केली. सलग तीन दिवसांच्या या पत्रकांमधून मोसमी पावसाच्या आगमनाबाबत खात्याच्या अंदाजामध्येच अनिश्चितता असल्याचे स्पष्ट झाले. पावसाच्या आगमनाच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात मोसमी पाऊस सामान्य तारखेच्या बराच आधी दाखल होईल असे चित्र निर्माण झाले असतानाच दोन जूनला प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कोकणातील मोसमी पावसाच्या आगमनाबाबत काहीच नमूद केलेले नव्हते. प्रत्यक्षात हवामान खात्याच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ३ जूनपर्यंत अपेक्षित असलेला मोसमी पाऊस दहा जूनला कोकणात दाखल झाला. यादरम्यान मोसमी पावसाच्या आगमनाबाबत बरीच अनिश्चितता निर्माण झाली आणि पावसाच्या आगमनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्येही गोंधळ निर्माण झाला. केरळ आणि कोकणातील पावसाच्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजांमध्ये इतकी मोठी तफावत आणि सातत्याने त्यांत केलेला बदल ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. केरळ आणि कोकणातील अंदाजांच्या या तफावतीनंतर भारताचे हवामान मॉडेल्स सातत्याने चुकत आहेत का, याबद्दलची चर्चा आता सुरू झाली आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळात केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनाची घोषणा कधी करायची यावर बरेच संशोधन झाले. पी. व्ही. जोसेफ, आर. अनंथक्रिष्णन, एम. के. सोमण यांच्यासारख्या बऱ्याच संशोधकांनी त्यांच्या संशोधन करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा मोसमी पावसाच्या केरळमध्ये दाखल होणाऱ्या आगमनावर घालवला. केरळमधील मोसमी पावसाच्या आगमनाबाबत कोणताही गोंधळ नको म्हणून २००६ पासून या संशोधनकर्त्यांच्या निष्कर्षांनुसार वस्तुनिष्ठ मापदंडाचा वापर करणे हवामान खात्याने सुरू केले. त्यानुसार दहा मेनंतर केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमधील १४ हवामान स्थानकांमधील किमान आठ स्थानकांवर सलग दोन दिवस किमान २.५ मिलीमीटर प्रति दिवस इतका पाऊस पडला तर मोसमी पावसाचे आगमन दुसऱ्या दिवशी घोषित केले जाते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे केरळजवळ असलेल्या अरबी समुद्रावर योग्य प्रकारचे ढग हवे आणि अरबी समुद्रासह दक्षिण केरळ आणि दक्षिण तामिळनाडूवर योग्य मोसमी पावसाचे वारे असावेत. मात्र, भारतीय हवामान खात्याला अलीकडच्या काही वर्षांत एकतर मोसमी पावसाच्या घोषणेची अतिघाई झालेली असते, किंवा मग मोसमी पावसासाठी संशोधकांनी ठरवलेले निकष त्यांच्याकडून डावलले जातात. यावर्षी निकषांनुसार २८ मे रोजी योग्य पाऊस पडला. पण २९ मेच्या सकाळी खात्याने केलेली घोषणा फसली. कारण या दिवशी १४ ठिकाणांपैकी केवळ पाच ठिकाणीच योग्य पाऊस पडला. पुढे ३० आणि ३१ मे रोजी योग्य पाऊस पडला, ज्यामुळे ३१ तारखेला केरळात मोसमी पावसाच्या आगमनाची घोषणा करणे उचित होते. खात्याच्या या घोषणेच्या अतिघाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तेव्हा निकषांनुसार पाऊस पडला नाही तर फारसा काही फरक पडत नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले; जे आश्चर्यकारक आहे! खात्याला मोसमी पावसाच्या घोषणेचे निकष पाळायचेच नाहीत तर ते खात्याने काढून तरी टाकायला हवेत.
हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी जगभरात हवामानशास्त्रज्ञ हवामान मॉडेल्सचा वापर करतात. हवामानाचे भाकित करता येऊ शकते का, यावर कितीतरी दशकांपासून संशोधन सुरू आहे. १९६० नंतर एडवर्ड लॉरेन्झ यांच्या संशोधनामुळे हवामानाचे अंदाज देण्याच्या प्रक्रियेला प्रचंड चालना मिळाली. त्यानंतर संगणक आणि सुपर संगणकामध्ये झालेल्या प्रगतीमुळे हवामान अंदाजामध्ये अचूकता वाढली. आजच्या परिस्थितीनुसार आजपासून पुढच्या सुमारे १५ दिवसांपर्यंतचे हवामानाचे भाकित हे मॉडेल्स सांगतात. सोप्या भाषेत सांगायचे तर हवामान मॉडेल्स हे जटिल संगणक कार्यक्रमासारखे असतात; ज्यात भौतिकशास्त्राची भरपूर समीकरणे असतात आणि मोठय़ा प्रमाणात गणना करावी लागते. हे माणसाला स्वत:ला करणे अशक्य असल्यामुळे जगभरात सुपर संगणकाचा वापर होतो. आजची हवामानाची स्थिती कशी आहे याची माहिती देण्याकरिता हवामान मॉडेल्सना उपग्रह, जहाज, विमान आदी स्रोतांच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती लागते. अमेरिकेतील सुपर संगणक दोन क्वाड्रिलियन (दोन आकडय़ांच्या समोर १५ शून्य लावणे) इतके गणित प्रत्येक सेकंदात करतात. ही माहिती समजेल अशा सोप्या रचनेत- म्हणजेच नकाशांमध्ये हवामानाची भविष्यवाणी करणाऱ्यांकडे येते. आलेली माहिती समजून घेऊन, त्यांचे ज्ञान आणि अनुभवाचा वापर करून हवामान अंदाज आणि सल्ला देणे हे त्यांचे काम असते. हवामानाच्या अंदाजात चुका होणेही स्वाभाविक आहे, कारण ही प्रक्रिया किचकट आहे. मात्र, केरळ आणि कोकणाबाबत २४ तासांचे अंदाजसुद्धा कसे चुकले, हा एक मोठाच प्रश्न आहे. कारण २१ व्या शतकात २४ तास आधीसुद्धा मोसमी पाऊस कधी दाखल होईल हे भारतीय हवामान खात्याला सांगता येत नसेल तर खात्याच्या विश्वासार्हतेवरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
इंग्लंड, युरोप किंवा अमेरिकेत हवामानाचे अंदाज अचूक असतात असे आपण बऱ्याचदा ऐकतो. दुपारी दोन वाजता पाऊस पडणार असेल तर तो पडतोच. मग भारतात हवामानाचे अंदाज का चुकतात? भारताजवळ योग्य हवामान मॉडेल्स नाहीत का? आधुनिक तंत्रज्ञान नाही का? असे बरेच प्रश्न उपस्थित होतात. भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. येथे बराच पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो. संपूर्ण भारतात वार्षिक पावसाच्या ७५ टक्क्यांहून अधिक पाऊस हा मोसमी पावसासारख्या विशाल हवामानाच्या स्थितीमुळे पडतो. युरोपीयन देशांमध्ये मोसमी पाऊस नसतो. तिथे बऱ्याच प्रमाणात अटलांटिक समुद्र किंवा भूमध्य सागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे पाऊस पडतो. हे कमी दाबाचे पट्टे आणि त्यामुळे पडणारा पाऊस हा भारतात पडणाऱ्या मोसमी पावसाच्या किंवा वादळी पावसापेक्षा अधिक विश्वसनीय असतो. आजच्या स्थितीत भारताकडे निश्चितपणे चांगले हवामान मॉडेल्स आहेत. ते एकतर अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांतून आयात करण्यात आले आहेत. त्यात कधी बदल करण्यात आले आहेत. तसेच भारतातही हवामानाचे मॉडेल्स विकसित करण्यात आले आहेत. कारण एकाच हवामान मॉडेलवर कुणीही अवलंबून राहत नाही. जगभरातील बरेच मॉडेल्स वापरण्याची परवानगी हवामान खात्यातील लोकांसह इतरांना असते. भारतासह इतरही देशांच्या हवामान मॉडेल्समध्ये मे महिन्याच्या शेवटीच हे स्पष्ट झाले होते की, यंदा सामान्य तारखेच्या आधी कोकणात मोसमी पाऊस दाखल होणार नाही. तरीदेखील हवामान खात्याच्या अंदाजामध्ये अनिश्चितता व तफावत आढळून आली. म्हणजेच हवामानाची भविष्यवाणी करणाऱ्यांनी त्याचे व्यवस्थित विश्लेषण केले नाही, हे स्पष्ट आहे. येणाऱ्या काळात हवामानाच्या अंदाजामध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी हवामान मॉडेल्समध्ये सतत बदल होणे, सुधारणा होणे आवश्यक आहे. मात्र, ही एक संथ प्रक्रिया असून त्यात भरपूर संशोधन आणि आर्थिक गुंतवणूक लागते.
परंतु भारतात या संशोधनाचीच वानवा आहे. हवामानाचे अंदाज चुकले तर ते विनासंकोच मान्य करणे, नेमके ते का चुकले याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देणे आणि अधिक सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. म्हणजेच हवामानाचे अंदाज वर्तवण्याच्या प्रक्रियेत अधिक व्यवहार्यता आणणे आवश्यक आहे. मात्र, भारतीय हवामान खात्यातील अधिकारी त्यांच्या चुका मान्यच करायला तयार नाहीत. ‘आमचा शब्द अखेरचा..’ हा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि येथेच खात्याच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.व्यावसायिकता विकसित करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण गरजेचे आहे. हवामानाचे अंदाज वर्तवण्याच्या बाबतीत मोठय़ा स्तरावर अशी स्पर्धा भारतात नाही. इंग्लंड, युरोप आणि अमेरिकेत ही स्पर्धा दिसते. त्या ठिकाणी अधिकृत अंदाज वर्तवणाऱ्या संस्था आहेत, पण त्याचबरोबर या देशांतील खासगी संस्थादेखील हवामानाचे अचूक अंदाज वर्तवत असतात. ब्रिटनमध्ये १९२२ साली बीबीसी आणि ब्रिटनच्या हवामान खात्याच्या (युके मेट ऑफिस) मदतीने पहिला हवामान अंदाज दिला गेला. पुढील अनेक वर्षे हे सुरू होते. मात्र, २०१८ पासून नेदरलँड्सच्या ‘मिटिओग्रुप’ या खासगी संस्थेला बीबीसीकडून कंत्राट देण्यात आले. भारताची या देशांशी तुलना केली तर या देशांतील हवामान खाते आणि खासगी संस्थांचे मोबाईल विनियोग आणि संकेतस्थळे खूप चांगली असतात. डॉपलर हवामान रडार आणि उपग्रहांचा वापर करून हवामानावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते; ज्यामुळे त्यांचे हवामानाचे इशारे अचूक ठरतात. दूरचित्रवाणी व आकाशवाणीवर माहिती देणारे तसेच प्रसार माध्यमांमध्ये मुलाखतीद्वारे हवामानाची भविष्यवाणी करणाऱ्यांना कमीत कमी शब्दांत आणि लोकांना समजेल अशा भाषेत हवामानाची माहिती कशी द्यायची हे चांगलेच माहीत असते. त्यामुळे त्यांचे प्रसिद्धी पत्रक आणि त्यांनी दिलेले सल्ले समजण्यास सोपे असतात. त्यामुळे प्रसार माध्यमे, सरकार आणि नागरिकांचा या संस्थांवरील विश्वास वाढतो. भारतात याच्या विपरित परिस्थिती आढळते. हवामानाचे योग्य इशारे ही दूरचीच गोष्ट; परंतु लोकांना समजेल अशा सहज, सोप्या भाषेत दिलेले अंदाज कमीच पाहायला मिळतात. त्यामुळे गोंधळ वाढतो.
विदेशात तंत्रज्ञानाची माहिती असणारा मोठा तरुणवर्ग या क्षेत्रात काम करत असतो. ब्रिटनबद्दल बोलायचे झाले तर तेथे पदवीचे शिक्षण घेत असताना कितीतरी विद्यार्थी ब्रिटनच्या हवामान कार्यालयात किंवा खासगी हवामान कंपनीत इंटर्नशिप करतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी नोकरी करतात. म्हणजेच हवामान अंदाज देण्याच्या क्षेत्रात करिअर करणे हे इतर क्षेत्रांत करिअर करण्यासारखेच गृहीत धरले जाते. भारतात अशी स्थिती नाही आणि तरुणाईदेखील या क्षेत्राकडे करिअर म्हणून वळत नाही. इतर देशांमध्ये हवामान खात्याकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्यासाठी बोलावले जाते. भारतात अशी संधीच दिली जात नाही. परिणामी तरुण मंडळी या क्षेत्राकडे वळत नाही. मानवनिर्मित हवामानबदल हे वास्तव आहे. परिणामी टोकाचे तापमान आणि पावसात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात हवामानाचा अंदाज वर्तवणे हे आणखीनच आव्हानात्मक होणार आहे. येत्या काळात हवामान अंदाज या विषयात भारताने कामाची तीच ती परंपरागत पद्धती सोडून वेगवेगळ्या स्तरांवर काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी हवामान मॉडेल्समध्ये सुधारणांबरोबरच मोठय़ा संख्येने डॉपलर हवामान रडार स्थापन करावे लागणार आहेत. त्यासाठी या विषयातील तज्ज्ञांना- विशेषकरून तरुणाईला याकडे आकर्षित करणे, हवामान अंदाजाची व्यवहार्यता वाढवणे आणि हवामानविषयक सल्ला थेट, जलदगतीने, योग्य पद्धतीने आणि अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचवता यावा यादृष्टीने हवामान खाते आणि त्यातील अधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे. भारतीय हवामान खात्याबद्दल बहुतांश नागरिकांना काहीच माहिती नसते. खात्याची यंत्रणा कशी काम करते हेदेखील माहीत नसते. मात्र, खूप उशीर होण्यापूर्वी देशातील तरुणवर्गाला या क्षेत्राकडे आकर्षित करण्याचे काम हवामान खात्याने करणे गरजेचे आहे.
(लेखक इंग्लंडमधील रेडिंग विद्यापीठात हवामान अभ्यासक आहेत.)
akshaydeoras@hotmail.com