नवख्या लखनौ सुपर जायंट्स संघाने केन विल्यमसनच्या हैदराबादला १२ धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने १६९ धावा केल्या होत्या. त्यात कर्णधार लोकेश राहुल (६४) आणि दीपक हुडा (५१) यांच्या अर्धशतकांचा मोठा वाटा होता. हे आव्हान पार करणं सनरायजर्स हैदराबादला जमलं नाही. राहुल त्रिपाठी (४४) आणि निकोलस पूरन (३४) यांनी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर हैदराबादचा सलग दुसरा पराभव झाला. या पराभवानंतर सुप्रसिद्ध समालोचक व क्रिकेट जाणकार हर्षा भोगले आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
“आज हैदराबादने मैदानात उतरवलेला संघ हा त्यांचा सर्वोत्तम संघ होता. तरीदेखील त्यांचा पराभव झाला हे चिंता वाढवणारं आहे. त्यांना जर यंदाच्या आयपीएल मध्ये आपला ठसा उमटवायचा असेल तर त्यांच्या संघातील स्टार खेळाडूंना आपापली जबाबदारी समजून खेळणं गरजेचंच आहे. आता त्यांच्या संघ व्यवस्थापनाची देखील कसोटीच असेल”, असं ट्वीट हर्षा भोगले यांनी केलं. तर, “यंदाच्या हंगामात हैदराबाद साठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे यावेळी तब्बल १० संघ स्पर्धेत आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिकच कठीण आहे”, अशी सूचनावजा आठवण आकाश चोप्राने करून दिली.
दरम्यान, लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्ले मध्ये तीन गडी गमावले होते. क्विंटन डी कॉक (१), एविन लुईस (१), मनिष पांडे (११) लवकर बाद झाले होते. त्यानंतर लोकेश राहुल आणि दीपक हुडा जोडीने तडाखेबाज खेळी केली. दीपक हुडाने ५१ तर राहुलने ६८ धावांची खेळी केली. १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसन (१६), अभिषेक शर्मा (१३), एडन मार्करम (१२) हे सर्व जण स्वस्तात बाद झाले. राहुल त्रिपाठी आणि निकोलस पूरन या दोघांनी दमदार फलंदाजी केली. पण त्रिपाठी ४४ आणि पूरन ३४ धावांवर बाद झाल्यावर हैदराबादने सामना गमावला.
लखनौच्या संघाकडून आवेश खानने अप्रतिम कामगिरी केली. त्याने पॉवरप्ले मध्ये हैदराबादचे दोन्ही सलामीवीर बाद केले. त्यानंतर १८व्या षटकाने त्यानेच सामना फिरवला. फॉर्मात असलेल्या पूरनला त्याने बाद करत एकाच षटकात दोन बळी घेतले. आवेश खानने ४ षटकांत २४ धावा देत ४ बळी घेतले. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.