इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील अंतिम सामना २९ मे रोजी पार पडणार आहे. मात्र, या सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी महिला टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना सुपरनोव्हाज विरुद्ध वेलोसिटी संघात दिमाखात पार पडला. अटीतटीचा हा सामना हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील सुपरनोव्हाज संघाने ५ धावांनी जिंकला. यासोबतच महिला टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धेची ट्रॉफीही आपल्या नावावर केली.
या सामन्यात वेलोसिटी (Velocity) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, सुपरनोव्हाज (Supernovas) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना सुपरनोव्हाज संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १६५ धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटी संघाला १६० धावाच करता आल्या. त्यामुळे सुपरनोव्हाजने ५ धावांनी सामना खिशात घातला.
वेलोसिटी संघाकडून फलंदाजी करताना लॉरा वोल्वार्ड हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने ३४ चेंडूंचा सामना करताना आपले अर्धशतक साजरे केले. यामध्ये २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तिने यावेळी सर्वाधिक ६५ धावा केल्या. तसेच सिमरन बहादूर हिने गोलंदाजीव्यतिरिक्त फलंदाजीतही आपला दम दाखवला. तिने ९ चेंडूत १९ धावा चोपल्या. या धावा करताना तिने १ षटकार आणि ३ चौकार मारले. शेफाली वर्मा आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी १५ धावा चोपल्या. तसेच, यास्तिका भाटिया आणि केट क्रॉस यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले.
यावेळी वेलोसिटी संघाकडून गोलंदाजी करताना अलाना किंग हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने ४ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त सोफी एक्लेस्टन आणि डिएंड्रा डॉटीन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच, पूजा वस्त्राकर हिने १ विकेट घेतली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाज संघाकडून डिएंड्रा डॉटीन हिने सर्वाधिक धावा केल्या. तिला सामनावीराचा आणि मालिकावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिने ४४ चेंडूत ६२ धावा चोपल्या. या धावा करताना तिने १ चौकार आणि ४ षटकारांचा पाऊस पाडला. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ४३ धावा चोपल्या. तसेच, प्रिया पुनिया हिने २८ धावांचे योगदान दिले.
यावेळी वेलोसिटीकडून गोलंदाजी करताना केट क्रॉस, कर्णधार दीप्ती शर्मा आणि सिमरन बहादूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. यांच्याव्यतिरिक्त आयाबोंगा खाका हिनेही एक विकेट घेतली. सुपरनोव्हाजने तिसऱ्यांदा पटकावली ट्रॉफी..अटीतटीच्या सामन्यात वेलोसिटीला नमवत सुपरनोव्हाज संघाने ही ट्रॉफी जिंकली. विशेष म्हणजे, महिला टी२० चॅलेंज स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्याची ही सुपरनोव्हाज संघाची तिसरी वेळ होती. यापूर्वी त्यांनी महिला टी२० चॅलेंज २०१८ आणि २०१९ स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला होता.