स्वातंत्र्य १६ सेकंदांचं!


स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव १९९७ साली साजरा झाला त्या वेळेस वेगळेच चैतन्य होते. जागतिकीकरणाची फळे दिसायला सुरुवात झाली होती.

Advertisement

विनायक परब –  @vinayakparab / [email protected]
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव १९९७ साली साजरा झाला त्या वेळेस वेगळेच चैतन्य होते. जागतिकीकरणाची फळे दिसायला सुरुवात झाली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा भावी प्रवास, महासत्ता वगैरे स्वप्ने रेखाटणे सुरू होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात एका घरात एकच चपलेचा जोड असायचा. तिथपासून ते सुवर्ण महोत्सवापर्यंत एका घरात प्रत्येकाचे चपलांचे दोन जोड या प्रवासापर्यंत सारे बोलले आणि लिहिले गेले. भूत आणि भविष्य असे थेट दोन तुकडे होते आणि वर्तमान बऱ्यापैकी स्पष्ट होते. मात्र अमृत महोत्सव साजरा करतानाचा पुढचा कालखंड हा विरोधाभासात्मक बाबींचा आणि भासमानतेवर आधारलेला दिसतोय. त्यात स्वातंत्र्यही बरेचसे धूसर झाले आहे. आता जागतिक परिस्थितीही बरीच वेगळी आहे.

म्हटले तर जग अधिक सुखासीन आणि सारे काही तळहाताच्या एका बोटावर, ‘क्लिक’वर आले आहे. तंत्रज्ञानाने घेतलेल्या हनुमान उडीने अनेक गोष्टी कवेत घेतल्या आहेत. मात्र तंत्रज्ञान हे नैतिक-अनैतिक नव्हे, तर ते ननैतिक असते. ते वापरणारा त्याची दिशा ठरवतो. इंटरनेट आणि समाजमाध्यमामुळे जग जोडले जात असतानाच दुसऱ्या बाजूस आपला खासगीपणा कसा आणि कधी गहाण पडला हे कळलेच नाही. समोरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या बाबी आता आयुष्यात कधी नव्हे एवढे अनंत पर्याय आयुष्यात मिळाल्याचे समाधान देताहेत. पण पलीकडे हे पर्याय कुणी तरी ठरवून आपल्यासमोर आणतो आणि दाखवतो आहे, याचे भान आपल्याला नाही. आपल्याला वाटते आहे की, यापूर्वी कधी नव्हे एवढे व्यक्तिस्वातंत्र्य किं वा अभिव्यक्तिस्वातंत्र्य आपल्याला लाभले आहे. पूर्वी ते केवळ लेखक- पत्रकार- विचारवंतांनाच लाभले होते. आता कुणीही जागतिक पटलावर थेट व्यक्त होऊ शकतो/ शकते आणि त्याचे/ तिचे म्हणणे जगात ऐकले जाऊ शकते. किती ही मोठी ताकद? त्यानेच तर जगभरात उलाढाली घडवल्या. ‘अरब स्प्रिंग’ही आणला. मात्र त्यामागे दडलेल्या क्लृप्त्या तेव्हा लक्षात नाही आल्या. नंतर ‘केंब्रिज अ‍ॅनालेटिका’ आणि अलीकडे ‘पेगॅसस’ प्रकरणानंतर त्याचा जागतिक चेहरा उघडा पडला. आपण मात्र तोवर फुकट मिळालेल्या त्या आभासी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्याच जाळ्यात अडकलेले होतो. स्वातंत्र्य की फुकटात मिळवलेले पारतंत्र्य? काहीच कळेनासे झाले होते. आता तर ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ सांगणारा १९८४चा तो जॉर्ज ऑरवेलही जुना होत गुळगुळीत झालाय!

Advertisement

आता लस न घेतलेले ओळखायचे कसे, त्यासाठी भारतीय रेल्वेही चेहरे ओळखणारे आणि त्यातून तुमचा इतिहास १६ सेकंदांत सांगणारे सॉफ्टवेअर वापरणार आहे. या अवस्थेत खासगी काय राहणार? आपण जोडलेले असणार की चक्क कपडे घातलेले असतानाही ‘त्या’ नजरेत उघडेवाघडे? एक म्हण होती, हमामखान्यात सगळेच नागडे! आता सार्वजनिक आयुष्यात कपडे घालूनही आपण या कॅमेरा आणि चेहरा ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरखाली नग्नच असणार! कदाचित मग आपल्याला या नवस्वातंत्र्यासाठी तिसरे स्वातंत्र्ययुद्ध पुकारावे लागेल. कारण चेहरा पाहून सॉफ्टवेअरने आपला इतिहास सांगण्याआधीचे १६ सेकंद हेच आपले खरे स्वातंत्र्य असेल!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement