स्वागत..ध्येयहीन तरुणाईचे!आज १५ ऑगस्ट..

Advertisement

आज आपण स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत पदार्पण करतो आहोत. या वाटचालीत पंचविशी, पन्नाशीचे दोन महत्त्वपूर्ण टप्पे आपण पार केलेत. आता आलीय पंचाहत्तरी! या दीर्घ प्रवासात देश म्हणून, देशाचे नागरिक म्हणून आपणही हळूहळू बदलत गेलो. जागतिकीकरणामुळे तर या बदलांची तीव्रता झंझावाती झाली. विविध टप्प्यांतील या बदलांकडे निरनिराळ्या पिढय़ा कशा तऱ्हेने पाहतात याचा धांडोळा घेणारे विशेष लेख..

राजरत्न भोजने

Advertisement

‘भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आली’ या विचाराने जेवढं भारावून जायला होतं, तेवढंच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘मिशन २०२०’मधलं २०२० सुद्धा गतवर्षीच सरल्याची आठवण झाली की या भारावलेपणाची जागा अतीव अस्वस्थता घेते. कारण एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धातल्या आम्हा भारतीय तरुणांनी आपलं तारुण्य कलामांनी दाखवलेल्या या ‘२०२०’च्या स्वप्नाच्या आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याच्या भडीमारात घालवली. शाळा-कॉलेज, शिक्षक-पालक, व्यक्ती-समाज, देश-विदेश अशा सगळ्यांनीच आम्हाला नेहमीच या जबाबदारीच्या जाणिवेच्या वलयात वाढवलं. मग साहजिकच स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा आनंद होण्यापेक्षा ‘२०२०’ची वर्षपूर्ती जास्त भेडसावते. अर्थातच मनाला शिवलेला हा विचार कलामांना काय किंवा वर नमदू केलेल्या कुठल्याही गटाला काय, दोष देण्यासाठी शिवला नसून, स्वत:चं प्रगतीपुस्तक काढण्याच्या हेतूनेच आला आहे. आणि या प्रगतीपुस्तकावरचा शेरा ‘नापास नाही’,  पण ‘पास तर मुळीच नाही’ असा मध्येच कुठेतरी घुटमळतो आहे, एवढं नक्की!

मागच्याच महिन्यात टोकाच्या नैराश्यातून माझा एम.बी.ए. झालेला एक मित्र मला म्हणाला, ‘साला पारतंत्र्यात असतो तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलो तरी असतो. पण आता नक्की काय करायचंय तेच कळत नाही.’ त्याच्या या वाक्याने अनेक देशभक्तांना त्याला शिव्या द्याव्याशा वाटत असल्या तरी मला या वाक्यामागची भीषणता आतून अक्षरश: जाळून टाकतेय. आणि शिव्या द्यायच्या म्हटलं तरी कुणाकुणाला द्याल? ‘नक्की करायचंय काय?’ हा आजच्या तरुणाईला भेडसावणारा प्रश्न वाटतो तितका सोप्पा नाहीए. आजच्या तरुणांसमोर उभा असलेला हा राक्षसरूपी प्रश्न, ही भयाण ध्येयहीनता त्या तरुणावर आणि एकूणच समाजावर किती दूरगामी परिणाम करू शकते याची जाणीव त्या तरुणाइतकीच समाजाला असायला हवी, ही अपेक्षा. या प्रश्नावर- ‘तुम्हा लोकांसमोर आमच्या पुढय़ात होते त्यापेक्षा नक्कीच जास्त पर्याय आहेत.. मग डोंबल्याची आलीये ध्येयहीनता?’ असं उत्तर आमच्या बापजाद्या समाजाकडून आलं की हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच क्लिष्ट होत जातो. हा प्रश्न कुठल्या तरी करीअर कौन्सिलरच्या कौन्सिलिंग सेशनमधून सुटणारा नाही हे आपण इथे लक्षात घ्यायला हवं. नाहीतर इंजिनीअर, डॉक्टर, प्रोफेसर, मॅनेजर, जर्नालिस्ट अशा कितीतरी पदवीधर तरुणांना हा प्रश्नच मुळी पडला नसता. थोडय़ाथोडक्याने समाधान न मानणाऱ्या आणि स्वत:कडून असामान्य अपेक्षा ठेवणाऱ्यालाच हा प्रश्न अधिक त्रास देतो आहे हे आपण इथे गृहीत धरायला हवं. कारण समाजसुद्धा अशाच तरुणांकडे अपेक्षेने बघत असतो. उपरोक्त प्रश्न विचारणारा माझा कुठलाही तरुण मित्र अनेकांच्या लेखी नालायक ठरत असला, तरी हा नालायकपणा काही त्याने स्वेच्छेने कवटाळलेला नाही. त्याची ध्येयहीनता ही आज बळावत चाललेल्या बेरोजगारीचं फलित आहे, हे नक्की.

Advertisement

खुल्या अर्थव्यवस्थेच्या, उच्च व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणाच्या उंबरठय़ावर जन्मलेली आमची ही आजची तरुण पिढी कळत्या वयाची होईपर्यंत आपोआपच हा उंबरठा ओलांडून स्पर्धेच्या घरात वावरायला लागली होती. आणि या सगळ्या गोष्टींच्या वाढीचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असल्याच्या जाणिवेने धास्तावली होती. त्यात ही स्पर्धा फक्त आपल्या वर्गमित्राशी किंवा देशमित्राशी नसून, देशाबाहेरही आपल्याशी स्पर्धा करू पाहणाऱ्या अनेक तरुणांशी आहे, हे कळल्यावर आमची ही पिढी आणखीनच बिथरली. कारण आत्ताचा काळ हा जागतिकीकरणाचा आहे, हेच आमच्यावर बिबवलं गेलं. अर्थात यात चुकीचं काहीच नाही. पण ज्या तरुणांकडून आपण या जागतिक स्पर्धेत उतरण्याची, लढण्याची, टिकण्याची आणि यशस्वी होण्याची अपेक्षा करतो, त्याच्या शिक्षणावर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण किती खर्च करतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिक्षणावर खर्च करणाऱ्यांच्या यादीत जागतिक क्रमवारीत भारताचा ऐंशीवा क्रमांक लागतो. सहा ते सात टक्के खर्चाची गरज असताना त्याच्या फक्त निम्माच खर्च केला जातोय, ही तशी शरमेचीच बाब. त्यात उच्च दर्जाच्या (समजल्या जाणाऱ्या) शैक्षणिक संस्था आणि शिक्षण मंडळांमध्ये शिकणाऱ्या तरुणांचं निभावून जातं. पण त्या तरुणांची संख्या असून असणार तरी किती? आणि उरलेल्यांच्या शिक्षणाच्या दर्जाची जबाबदारी कुणाची? उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर शिक्षणात ही विषमता तुलनेने कमी असली तरी या सगळ्याचा पाया असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचीच गोची झाल्यावर स्पर्धेच्या जगात पाऊल टाकायला बळ येणार कुठून? अर्थात याला काही तरुण स्वकर्तृत्वाने अपवाद ठरतातच. तरी कलामांच्या ‘मिशन २०२०’ची मक्तेदारी फक्त त्या ‘उच्च दर्जाचं’ शिक्षण घेणाऱ्या काही टक्के तरुणांची नसून, अखिल भारतीय तरुणाईची आहे याचा या व्यवस्थेला विसर पडतो आहे की काय अशी शंका येते. मग यातूनच एकीकडे ‘अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मायबोलीतूनसुद्धा!’ आणि दुसरीकडे ‘मराठी शाळांना विद्यार्थ्यांची वानवा’ अशी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होते. अशा अनेक कारणांमुळे आजचा तरुण अधिक दिशाहीन होतो आहे. आणि याची जबाबदारी इथल्या व्यवस्थेने घ्यायलाच हवी. त्याची ध्येयहीनता ही आज बळावत चाललेल्या बेरोजगारीचं फलित आहे, हे नक्की.

कणांचा वेग आणि स्थान यांच्या अनिश्चिततेबद्दलचा ‘अन्सर्टेन्टी प्रिन्सिपल’ हाइजनबर्ग याने मांडला आणि भौतिकशास्त्राला मोलाचं योगदान मिळालं. पण आजच्या तरुणांच्या मनावर घिरटय़ा घालणाऱ्या भविष्याला घेरून असलेल्या अनिश्चिततेचा- म्हणजेच सोप्या भाषेत (दुर्दैवाने) ‘अन्सर्टेन्टी प्रिन्सिपल’च्या प्रश्नावर कुणी तरी आपलं लक्ष वेधू इच्छित आहे का? तरुणांच्या पायाखालची जमीन सरकवणारा हा आणखी एक यक्षप्रश्न. पण तो बहुतेक वेळेला फक्त तरुणांनाच दिसतो आहे आणि इतरांसाठी धूसरच राहतोय, हे फारच गंभीर. मर मर करून आमचे आई-बाप आम्हाला शिकवतात. पण तशीच मर मर करून आम्ही शिकतो, डिग्य्रा घेतो आणि तुलनेनं सुरक्षित वाटणाऱ्या कॉलेज कॅम्पसमधून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा ही अनिश्चितता आमच्यासमोर आ वासून उभी असते. नोकरी मिळण्याची- त्यातही हवी ती नोकरी मिळण्याची अनिश्चितता, ती टिकण्याची अनिश्चितता, योग्य मोबदल्याची अनिश्चितता, तो मोबदला भविष्याला पुरेल याची अनिश्चितता, त्यात यशस्वी होण्याची अनिश्चितता, मन मारून काम करत राहावं म्हटलं तर त्यातून मानसिक समाधान मिळेलच याची अनिश्चितता, त्यातून आपली ध्येयपूर्ती होईलच याची अनिश्चितता, मग जगाच्या पटलावर आपण नावलौकिक मिळवूच याची अनिश्चितता.. आणि या सगळ्यामुळे आपल्यावर पडणारा नालायकपणाचा शिक्का मात्र निश्चित. अशा वेळी आपण करत असलेल्या कामातून योग्य ते मानसिक समाधान आणि आनंद त्या कामगाराला मिळतच नसेल तर त्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर आणि आत्मीयतेवर परिणाम होऊन राष्ट्राच्या एकूण उत्पादनक्षमतेवर आणि त्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, हा अर्थशास्त्रातील साधा नियम मला अर्थशास्त्रापेक्षा जीवन जगण्याच्या शास्त्राचा अधिक वाटतो. आता तरी माझ्या ‘ध्येयहीन’ तरुण मित्रांची विदारक अवस्था तुमच्या डोक्यातून मनात उतरली असेल अशी आशा बाळगतो.

Advertisement

या सगळ्यातून खालावत चाललेली तरुणांची मानसिक अवस्था हा तर जणू अस्पृश्यच विषय! त्याच एम.बी.ए. मित्राचं पुढचं  वाक्य- ‘१९२१ चं अध्र्या जगावर आलेलं ग्रेट डिप्रेशन आता माझ्या एकटय़ावरच कोसळल्यासारखं वाटतंय..’ असं होतं. पैसा फक्त जगायला नाही तर दाखवायलासुद्धा लागतो, हीच आजच्या चंगळवादी संस्कृतीची शिकवण असेल तर तरुणांना वेगळं काय वाटणार? शिवाय व्यसनाधीनता, पोर्नोग्राफी, समाजमाध्यमांच्या कचाटय़ात सापडल्याने आलेला ‘सोशल डीलेमा’, अवाजवी शर्यत यांतून आलेली असंवेदनशीलता, त्यातून वाढत जाणारी गुन्हेगारी, एका अर्थाने अंधाराकडे नेणारी देशातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती, स्वत:च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ढासळत चाललेला आत्मविश्वास.. आणि हे सगळं बदलायला आपण कसे षंढ आहोत ही बळावत चाललेली भावना असे अजून कितीतरी प्रश्न आजच्या तरुणाईला खात आहेत. मग कसली आलीये ‘स्वातंत्र्याची पंचाहत्तरी’ आणि कसलं ‘२०२०’? अर्थात एका परीक्षेला बसून एका झटक्यात सुटणारा हा पेपर नव्हे. करोनाने या सगळ्या प्रश्नांना खतपाणी घातलं असलं तरी याचं बी रुजून रोप व्हायला कधीच सुरुवात झाली आहे. त्याचं झाड होण्याआधी ते छाटून टाकायला हवं. वर मांडलेलं सगळं जरी तरुणांपेक्षा त्यांच्याकडे अपेक्षेने बघणाऱ्या नजरांसाठी जास्त असलं तरी जाता जाता माझ्या खचलेल्या सगळ्या ध्येयहीन तरुण मित्रांसाठी आणि त्यांनीच एकमेकांना सावरण्यासाठी कवी सौमित्रच्या ओळी स्वमुक्तीच्या नाऱ्याप्रमाणे द्याव्याशा वाटतात..

‘आता पाऊलेही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे..!’

Advertisement

[email protected]

The post स्वागत..ध्येयहीन तरुणाईचे! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement