‘स्मृती आख्याना’च्या या शेवटच्या टप्प्यात विस्मरणाचा आजार म्हणजेच ‘डिमेन्शिया’विषयीची माहिती विस्तृतपणे घ्यायला हवी.
|| मंगला जोगळेकर
विस्मरणाचा आजार हा वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या प्रश्नांपैकीच एक प्रश्न आहे, असा अनेकांचा चुकीचा समज असतो. सामान्य स्वरूपाच्या विस्मरणाच्या अनुभवांबद्दल आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली आहे. आता टप्पा आहे गंभीर आजार वेळेतच ओळखायला शिकण्याचा. सामान्य विस्मरण आणि गंभीर स्वरूपाचं विस्मरण यात काही लक्षात येण्याजोगे फरक आहेत. विस्मरणाचा आजार- अर्थात ‘डिमेन्शिया’ लवकर लक्षात आला, तर पुढचा उपचारांचा टप्पा निश्चित सोपा होईल.
मागील काही लेखांमध्ये आपण मेंदूसाठी परिणामकारक अशा जीवनशैलीतील बदलांबद्दल माहिती घेत होतो. ‘स्मृती आख्याना’च्या या शेवटच्या टप्प्यात विस्मरणाचा आजार म्हणजेच ‘डिमेन्शिया’विषयीची माहिती विस्तृतपणे घ्यायला हवी. मेंदूची योग्य काळजी घेतली जावी, डिमेन्शियाची भीती कमी व्हावी, म्हणून हा लेखप्रपंच के ला. परंतु डिमेन्शिया आजाराचं वाढतं प्रमाण, त्याबद्दल असणारे गैरसमज आणि रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबद्दलची अपुरी माहिती बघता डिमेन्शियाबद्दल आवश्यक माहिती असायला हवी. सुरुवातीच्या लेखांमध्ये सर्वसाधारण विस्मरणाबद्दल आपण पुरेशी माहिती घेतली आहे, त्यामुळे आता गंभीर विस्मरणाविषयी.
विस्मरणाचा आजार हा वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या प्रश्नांपैकीच एक प्रश्न आहे, असा अनेकांचा चुकीचा समज असतो. गंभीर विस्मरण हे वृद्धत्वाचे लक्षण नाही. म्हणजे म्हातारपणी प्रत्येकाचे केस पांढरे होतात, त्वचा सुरकुतते, तसं प्रत्येक ज्येष्ठामध्ये गंभीर विस्मरण नसतं. अलीकडे वयाच्या साधारण ७५ वर्षांपर्यंत किंवा त्यापुढेही अनेक व्यक्ती मेंदूच्या बाबतीत सक्षम असतात. निवृत्तीनंतर नवनवीन जबाबदाऱ्या घेऊन त्या कार्यक्षमतेनं पार पाडतानाही दिसतात. त्यामुळे वृद्धत्वाची व्याख्या करताना ७५ वर्षांपर्यंत ‘तरुण-वृद्ध’ असं आता म्हटलं जातं. डिमेन्शिया हे वृद्धापकाळातील दुखण्यांपैकी एक दुखणं नव्हे, हे पक्कं लक्षात घ्यायला हवं.
सर्वसाधारण विस्मरण आणि गांभीर्याकडे वाटचाल करणारं विस्मरण, यातील फरक न कळल्यामुळेही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खेड्यापाड्यात तर जाऊ द्या, शहरी, सुशिक्षित व्यक्तींमध्येही या आजाराच्या माहितीचा अभाव दिसून येतो. निवृत्तीमुळे आपल्या जबाबदाऱ्या कमी केल्यामुळे आजाराची लक्षणं समजायला वेळ लागू शकतो. कधी कधी एकंदरच वृद्धांच्या प्रश्नांना ‘वयपरत्वे असं होणारच’ म्हणून दुर्लक्षित के लं जातं. स्त्रिया आपले प्रश्न इतरांना सांगत नाहीत. अशा विविध कारणांमुळे लक्षणं सुरुवातीला समजत नाहीत आणि त्यामुळे लवकरच्या टप्प्यात उपचार चालू होत नाहीत.
गंभीर विस्मरणाची लक्षणं एकाएकी वाढत नसतात. असं घडलं, तर औषधांचा परिणाम किंवा दुसऱ्या कुठल्या आजारपणाचा परिणाम असावा असं म्हणायला हरकत नाही. गंभीर विस्मरणाची सुरुवात आपण काही उदाहरणांवरून समजून घेऊ या.
– कावेरीताईंचं सारखंच काहीतरी हरवतं असं दिसून येत होतं. नाहायला जाताना त्यांनी त्यांचं सोन्याचं कानातलं कागदात गुंडाळून ठेवलं, ते कुठे ते त्यांना आठवेना. कचऱ्यात गेलं की काय, अशी शंका आल्यानं बघितलं, तर खरंच ते कचऱ्याच्या डब्यात सापडलं.
– सुरेखाताई रिक्षा स्टँडवर गेल्या, रिक्षात बसल्या. पण कुठे जायचं ते त्यांना सांगता येईना. मग त्या तशाच थांबून राहिल्या. पाठीमागून सून आली आणि तिनं रिक्षावाल्याला पत्ता सांगितला.
– ज्येष्ठ नागरिक संघात व्याख्यानाला जाताना नेहमीच जयाताई आणि शुभाताई एकत्र जातात. पण अलीकडे जयाताईंचा कार्यक्रमाचा दिवस लक्षात ठेवण्यात गोंधळ उडतो. मग त्या शुभाताईंना सकाळी फोन करून सारख्या विचारत राहतात.
– बँकेची कामं ही जयंतरावांची जबाबदारी. पण अलीकडे ते कंटाळा करताना दिसत होते. कधी नातवाला सांग, नाही तर मुलाकडून करून घे, असं चाललं होतं. बायकोनं ‘तुम्हीच बँकेत जा’ असं त्यांना सांगितल्यावर ते जायला लागले खरे, पण काही ना काही चुका होऊ लागल्या. शेवटी त्यांनी बँकेत जाणं थांबवलं.
– सुरेशभाई सोसायटीचे सेक्रेटरी. त्यांच्या कामामुळे सोसायटीत त्यांना खूप मान मिळायचा. हल्ली मात्र त्यांचे अनेक लोकांशी खटके उडताना दिसत होते. त्यांच्या कामात काही चुका व्हायला लागल्या होत्या. त्यांना काही सांगायला जावं, तर ते लगेच हमरीतुमरीवर येताना दिसत होते.
– रेणूताईंना घरात शिवणाचं मशीन सापडेना. त्यांची भाची त्यांना भेटायला आली होती. त्यांनी तिला फोन केला आणि चक्क विचारलं, की ‘तू माझं मशीन घेऊन गेलीस का?’ तिनं नाही म्हटल्यावरही त्यांनी तो विषय लावून धरला. तिनंच आपलं मशीन नेलं, या संशयाचं आरोपात रूपांतर झालं.
– समेळकाका आणि काकूंना सिनेमाचं अतिवेड. त्यांच्या आवडीच्या हिरो-हिरोइनचे सिनेमे ते अजिबात सोडत नाहीत. पण हल्ली काकांना सिनेमामध्ये काही रसच उरलेला दिसत नव्हता.
– सासवडे काकू भगवद्गीता पाठांतर वर्गात गेलं वर्षभर जात होत्या. परंतु त्यांना पाठांतर जमत नव्हतं. वर्गात त्या काहीतरी भलतेच विषय काढायच्या, सभासदांना खासगी माहिती विचारायच्या. त्यांच्यामुळे तिथल्या कामकाजावर परिणाम व्हायला लागला.
इतकी उदाहरणं देण्याचं कारण हे, की प्रत्येकामध्ये दिसणारी लक्षणं वेगळी असतात हे समजावं. हे अनुभव तुम्हाला येणाऱ्या अनुभवांपेक्षा वेगळे वाटतात ना? या दोघांमधील फरक आणखी स्पष्ट करू या.
बँकेत जाऊन पेन्शन काढण्याचं काम केव्हा करायचं हे ठरलेलं असतं. मोबाइलचं बिल, दुधाचं बिल, विजेचं बिल, सगळ्यांच्या आपापल्या तारखा असतात. ही बिलं भरताना तुमची तारीख मागे-पुढे होईल, पण ते वेळेत भरलं जाईल. परंतु विस्मरणाशी झगडणारी व्यक्ती ते वेळेवर करेलच असं नाही. आपल्याला बिलं द्यायची आहेत, हेच त्या व्यक्तीच्या लक्षात राहणं अवघड होऊ शकतं, किं बहुना आपले विस्मरणाचे अनुभव त्यांच्या लक्षात राहणार नाहीत. समजा, तुमच्या आवडत्या भाचीचं लग्न ठरलं आहे, तर तुम्ही ती तारीख बिलकुल विसरणार नाही. केळवण कधी करायचं, काय आहेर द्यायचा, सगळं तुमच्या मनात घोळत राहील. पण गंभीर विस्मरण झालेली व्यक्ती पुन्हा पुन्हा लग्नाची तारीख विचारत राहील. पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीबद्दल बोलत राहाताना दिसेल. याशिवाय रोजच्या जीवनात सतत काहीतरी अनुभव येतच राहतील. पत्ते खेळायला बसलात तर डाव कसा लावायचा, बँके च्या चेकवर सही कुठे करायची, तारीख कुठे टाकायची, पाहुण्यांसाठी चहा करताना आधण किती ठेवायचं, अशा स्वरूपाच्या गोष्टींमध्ये गोंधळ उडताना दिसू शकेल.
वरील वर्णनावरून आणि खाली नमूद के लेल्या गंभीर विस्मरणाच्या लक्षणांवरून सर्वसाधारण विस्मरण आणि त्याच्या पुढे काही पायऱ्या गेलेलं गंभीर विस्मरण, यातील फरक ओळखणं सोपं जाईल.
गंभीर विस्मरण कसं ओळखावं?
वेगानं वाढत जाणारं विस्मरण
परिचयाची कामं करण्यात अडचणी
रोजचं जीवन जगण्यात अडचणी
नवीन माहिती लक्षात ठेवणं अवघड
नवीन गोष्टी शिकणं अवघड
तात्पुरत्या स्मरणशक्तीत घसरण
भाषाज्ञानात उणिवा
संभाषणाचं कौशल्य कमी
स्थळकाळाचं भान कमी
नियोजन करणं आव्हानात्मक
सारासार विचारशक्तीत उतरण
समाजात मिसळण्यास नाखुशी
दृष्टिदोषात वाढ (वस्तूंमधील अंतर न समजणं, रंग न समजणं इत्यादी.)
(ही सर्वसाधारण लक्षणं आहेत. ही सर्वच लक्षणं जशीच्या तशी प्रत्येकात आढळून येतील असं नाही. व्यक्तीगणिक लक्षणांत, त्यांच्या तीव्रतेत फरक असू शकतो.)
यासाठी कुटुंबातील व्यक्तींचं निरीक्षण महत्त्वाचं आहे. विस्मृतीच्या आजाराचं निदान करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींच्या निरीक्षणाला फार महत्त्व असतं. खरं तर नातेवाईकांच्या निरीक्षणाशिवाय या आजाराचं निदान करणं अशक्य ठरावं, इतकं त्याचं महत्त्व आहे. जेव्हा कुटुंबातील इतरांच्या मनात एखाद्या व्यक्तीच्या विस्मरणाबाबत ‘नक्कीच काहीतरी झालंय’ अशी धोक्याची घंटा वाजू लागते, त्या वेळी (ती व्यक्ती वयस्क असली तरी) तिथेच न थांबता त्या बाबतीत पावलं उचलण्याची आवश्यकता निर्माण होते. या निरीक्षणासाठी खालील मुद्दे बघा.
गोष्टी आठवायला वेळ लागतो का?
आपल्या विस्मरणाच्या प्रसंगांची आठवण पुसली जाते का?
आठवत नाही म्हणून डायरीत, कागदावर, ‘पोस्ट-इट’ नोट्सवर स्वत:ला मदत म्हणून गोष्टी लिहून ठेवल्या जातात का?
अलीकडे घडलेले प्रसंग आठवत नाहीत असं दिसतं का?
सहसा जे प्रसंग विसरले जाणार नाहीत, असे प्रसंगही विसरले जातात असं दिसतं का?
स्वत: गोष्टी करू शकू हा आत्मविश्वास कमी होताना दिसतो का?
पुन्हा पुन्हा माहिती विचारणं, तेच तेच प्रश्न विचारले जातात का?
खरं तर काहीतरी वेगळं घडतं आहे, हे त्या व्यक्तीला आणि कुटुंबीयांना जाणवत असतं. सुरुवातीच्या काळात अशी लक्षणं किंवा वेगळे अनुभव मधून मधून घडले तरी एरवी रोजचं जीवन ठीक चाललेलं असतं. अशा घटना ‘एखाद्या वेळी घडलं असेल काहीतरी’
असं म्हणून झटकून बाजूला केल्या जातात. नंतर जेव्हा प्रमाण जास्त वाढतं, तेव्हा काहीतरी बिनसलं आहे याची खात्री पटायला लागते. थोडक्यात, जो फरक एखाद्या वेळी दागिना हरवणं आणि अनेक वेळा किमती वस्तू
हरवणं यात आहे, अगदी तसाच फरक साधं विस्मरण आणि विस्मृतीच्या आजारात (डिमेन्शिया) आहे.
हा आजार ६५ वर्षांच्या पुढील लोकांना होताना दिसतो. जसं वय वाढतं, तसं या आजाराचं प्रमाण वाढत जातं. म्हणजे ६५ वर्षांवरील मंडळींपेक्षा ८५ वर्षांवरील मंडळींमध्ये तुलनेनं तो अधिक प्रमाणात असतो. तरुण लोकांमध्ये हा आजार नसतो असं नाही, पण त्याचं प्रमाण अत्यल्प असतं. लहान वयात जेव्हा आजार होतो, तेव्हा तो आनुवंशिक असण्याची शक्यता असते. कोणतेही वर्गभेद या आजारामध्ये नाहीत. व्यासंगी माणसांमध्ये, शिक्षणाची आस असणाऱ्या व्यक्तींमध्ये तो कमी प्रमाणात असतो असं दिसतं. (अधिक ज्ञानग्रहणामुळे पेशींमधले दुवे मजबूत असतात, हे आपण बघितल्याचं तुम्हाला स्मरत असेल.)
तात्पुरत्या स्मरणशक्तीचा ऱ्हास
अल्झायमर्सच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तात्पुरती स्मरणशक्ती (शॉर्ट टर्म मेमरी) दुबळी होताना प्रामुख्यानं दिसून येते. परंतु तात्पुरती स्मरणशक्ती गोठायला लागली, तरी कायमस्वरुपी स्मरणशक्ती शाबूत असते. त्यामुळे या व्यक्तीला आपलं जेवण झालं आहे की नाही, हे कित्येकदा आठवत नाही, पण भूतकाळातील आठवणी मात्र न अडखळता सांगता येतात. या विसंगतीमुळे कुटुंबीयांना अशा व्यक्तीला स्मरणशक्तीचा काही प्रश्न असू शकेल अशी पुसटशी शंकादेखील येत नाही. म्हणूनच विस्मरणाच्या विकारांना छुपे हल्लेखोर असंही म्हटलं जातं.
डिमेन्शियाचं निदान अचूक होणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. उदा. रक्त, लघवी तपासणी, थायरॉइड, ‘एमआरआय’, पेट स्कॅ न. लक्षणांबद्द्ल चर्चा केली जाते. दुसऱ्या कुठल्या कारणास्तव विस्मरण होत नाही ना, याची खातरजमा केली जाते.
लवकर निदानाचे फायदे –
डिमेन्शियासाठी जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचा सुरुवातीच्या काळात जास्त फायदा होतो. त्यामुळे आजाराच्या पहिल्या स्थितीतील आयुष्य सामान्यपणे जगता येतं.
कुटुंबाला आणि आजारी व्यक्तीला हे निदान स्वीकारण्यास वेळ मिळतो.
आजाराच्या सुरुवातीच्या काळात रुग्णाची निर्णयक्षमता शाबूत असते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक निर्णय घेणं, अथवा इतरही गोष्टींची काळजी घेणं शक्य होतं.
डिमेन्शियाच्या निदानामुळे आजारी व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडू शकते. परंतु त्यावर वेळीच उपचार करून ती सांभाळता येऊन पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते.
डिमेन्शिया आजाराबद्दल अधिक माहिती काढता येते. डिमेन्शिया रुग्णांसाठी कुठल्या संस्था काम करतात, काय सोयीसुविधा आहेत, अशा प्रकारची माहिती काढता येते.
डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीशी कसं वागावं? चांगली काळजी घेणं म्हणजे काय?, अशा प्रकारचं प्रशिक्षण घेता येतं.
व्यावसायिकांच्या मदतीनं कुटुंबीय अनेक चुका टाळू शकतात.
या माहितीमुळे डिमेन्शियाचा आजार ओळखणं सोपं जाऊन त्याचं निदान लवकर होऊ शकेल अशी आशा वाटते. त्यामुळे अनेक वृद्धांचं आयुष्य सुसह्य होऊ शकेल.
mangal.joglekar@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.