स्मृती आख्यान : मेंदू वापरा;नाहीतर विसरा!


जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते.

Advertisement

|| मंगला जोगळेकर
मेंदू वापरला नाही तर तो गंजतो, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच  मेंदूला सतत कामाला लावायला हवं. रोजच्या रोज, घरच्या घरी करता येणाऱ्या गोष्टी, कोडी यांनीही ते करता येतं. मेंदूला कृतिशील ठेवण्यासाठी जगभरात विविध ‘वेब पोर्टल्स’तर आहेत याशिवाय ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिमही सुरूझालीत. विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पुण्यासह इतरही काही ठिकाणी मेमरी क्लब सुरू करण्यात आले आहेत.

डॉडेव्हिड स्नोडन हे अमेरिकेच्या केन्टकी विद्यापीठात काम करतात. १९८६ पासून ते एका महत्त्वपूर्ण अभ्यासात गुंतले आहेत. हा अभ्यास मिनीसोटा राज्यातील आडवळणाच्या गावात चर्चमध्ये काम करणाऱ्या नन्सचा आहे. यातील बहुतेक नन्स नव्वदीच्या घरात पोहोचल्या आहेत, वा होत्या. त्यांचा अभ्यास करण्याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल; ते म्हणजे त्यांचं असाधारण आयुष्यमान. या सर्वेक्षणाद्वारे आतापर्यंत जवळजवळ ७०० नन्सचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये असं दिसून आलं, की त्यांच्या उत्साही दीर्घायुष्याचं रहस्य त्या मेंदूला देत असलेल्या व्यायामात आहे. त्यांच्या चर्चमध्ये प्रश्नमंजूषा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, इत्यादी कार्यक्रम आय़ोजित केले जातात. आपापले छंद जोपासणं, शब्दकोडी सोडवणं यालाही प्रोत्साहन दिलं जातं. याशिवाय सर्वजणी चर्चमध्ये आपली नेमून दिलेली कामं मोठ्या वयातही करतात.

Advertisement

या अभ्यासासाठी आतापर्यंत शंभराहून जास्त नन्सनी आपले मेंदू दान दिले. त्यांच्या मृत्यूनंतर केलेल्या पाहणीमध्ये त्यांच्या मेंदूच्या पेशींची मुळं (म्हणजे डेंड्राइट आणि अ‍ॅक्झान) आक्रसलेली तर दिसली नाहीतच. परंतु त्यांनी मेंदूच्या आत दळणवळणाचे नवीन मार्ग प्रस्थापित केलेले दिसले. याशिवाय निकामी झालेल्या मार्गांवर त्यांची जागा घेणारे पर्यायी मार्गही तयार झालेले आढळून आले. यावरून मेंदूच्या व्यायामांमुळे, त्याला आव्हान दिल्यामुळे डेंड्राइट्सची चांगली वाढ होते आणि पेशींमधील संदेशवहनाची क्षमता वाढते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर झालेल्या मेंदूच्या पाहणीमध्ये यांपैकी कित्येक नन्सना अल्झायमर्स झालेला होता असं आढळलं. परंतु वर्षानुवर्षं मेंदूला मिळणाऱ्या व्यायामांमुळे रोजच्या जीवनावर स्मृतिभ्रंशाचा कुठलाही दृश्य परिणाम न होता त्या आपलं आयुष्य निश्चिंतपणे जग़ू शकल्या. ही खूपच मोठी आश्चर्याची बाब आहे. या निरीक्षणाचे तरंग जगभर उमटले. त्याची चर्चा सुरू झाली.

ज्यांना शिक्षणाची आवड आहे, जे पदवीधर आहेत, जे बुद्धीला खाद्य देणाऱ्या गोष्टींमध्ये रस घेतात, वाचन, लेखन, आवडीच्या विषयांवर चर्चा, माहितीपूर्ण कार्यक्रम बघणं, नवीन भाषा शिकणं इत्यादी तऱ्हेतऱ्हेच्या प्रकारांनी ‘मेंदूचा जागर’ घडवून आणतात, त्यांच्यामध्ये ‘डिमेंशिया’ होण्याची शक्यता थोडीफार कमी होते. यासंदर्भात ‘विस्मरणाला रोखण्यासाठी’ (२६ जून) लेखात आपण माहिती घेतलीच आहे. न्यूयॉर्कमध्ये पंचाहत्तर वर्षांपेक्षा वयानं अधिक असलेल्या लोकांच्या अभ्यासातून असं दिसलं, की जी मंडळी बुद्धिबळ, सोंगट्यांसारखे खेळ नियमितपणे- म्हणजे आठवड्यातून चार वेळा तरी खेळतात, विविध प्रकारांनी मेंदूला जागृत ठेवतात, त्यांच्यात डिमेंशिया होण्याची शक्यता कमी होते. चीनमधल्या अभ्यासातूनही असं दिसून आलं, की जी मंडळी मोठ्या वयातही आव्हानात्मक गोष्टी करणं चालू ठेवतात त्यांच्या बुद्धीची झीज कमी प्रमाणात होते.

Advertisement

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते. रोजच्या रोज नवीन आव्हानं आपल्या मेंदूला ताजंतवानं ठेवतात. नित्य नवीन शिकल्यामुळे मेंदू कृतीशील राहातो. त्यातील बदलांकडे बघून शास्त्रज्ञांना पेशींच्या नवनिर्मितीचा दाखला मिळत जातो. औत्स्युक्य टिकवल्यामुळे वयानुसार होणारी झीज घडत असतानादेखील, आपली ताकद राखून ठेवण्याचा मेंदू प्रयत्न करतो. परंतु असंही दिसतं, की मेंदूला अनाठायी आराम दिल्यामुळे, निवृत्तीनंतर येणाऱ्या सुस्तीमुळे, जीवनात रस घेणं थांबवल्यामुळेही मेंदू विसावतो. आपला स्वभावधर्म सोडून, स्मरण ठेवण्याचं आपल्याला नेमून दिलेलं काम करण्यात तो कुचराई करायला लागतो. त्याचाच परिणाम म्हणून आपलं विस्मरण वाढतं. विस्मरणाऐवजी स्मरणाची गाडी द्रुतगतीच्या मार्गानं वळवण्यासाठी ‘आराम हराम हैं’ हा मंत्र लक्षात ठेवा. मेंदूला वापरायला शिका. ‘मला काम द्या, मी कामाचा भुकेला आहे,’ असं सांगणारं मेंदूशिवाय दुसरं कोणी या जगात भेटणार नाही, याबद्दल सर्वांचं एकमत व्हावं! या वृत्तीमुळे मेंदूच्या कक्षा आपण कितीही रुंदावू शकतो.

‘ड्युक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’मधील प्रोफेसर डॉ. लॉरेन्स कॅट्झ यांनी नावीन्यातून मेंदूला जागवा, असा संदेश दिला. आपण ज्या गोष्टी एरवी करतो त्या करण्याऐवजी त्यामध्ये वेगळेपण ठेवा, ही कल्पना त्यांनी मांडली. नावीन्याच्या या अनुभवाला ‘न्युरोबिक्स’ असं समर्पक नाव त्यांनी दिलं आहे. न्युरोबिक्सच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत पाचही ज्ञानेंद्रियं आणि त्याबरोबर आपलं मन, भावना अनोख्या मार्गानं वापरल्या जातात. अशा रीतीनं ज्ञानेंद्रियांना एक प्रफुल्लित अनुभव देणं म्हणजे न्युरोबिक्स.

Advertisement

फ्रान्समधील मोनिक ल पॉन्सिन यांनी असं स्पष्ट के लं आहे, की मेंदूचे व्यायाम अवघड, अनाकलनीय असण्याची काही आवश्यकता नाही. सोपे, आनंददायी व्यायाम केल्यानंसुद्धा फायदा होऊ शकतो. ‘हे व्यायाम करण्यासाठी वेळ नाही असंही कारण पुढे करू नका,’ असं त्या सांगतात. कारण प्रवास करताना, जेवणाच्या सुट्टीमध्ये, स्वयंपाक करताना, इतर काही बारीकसारीककाम करतानाही असे व्यायाम करता येऊ शकतात.

या दोघांनी सुचवलेले काही व्यायाम –

Advertisement

– आज रात्री उजव्या हातानं दात घासण्याऐवजी ते डाव्या हातानं घासून बघा. त्यानंतर तुम्हाला असं जाणवेल, की मेंदूला या क्रियेकडे लक्ष द्यावं लागलं, कारण हे काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं होतं, नवीन होतं.

– हातानं जेवण्याऐवजी कधी काट्यानं/चॉपस्टिक्स वापरून जेवा.

Advertisement

– जेवणात कधी न चाखलेल्या पदार्थाचा समावेश करा आणि त्यांचा आस्वाद घ्या.

– रोजच्या रस्त्यावर चालायला न जाता वेगळ्या मार्गानं जा.

Advertisement

– कुणाच्या घरी किंवा इतर कु ठे जाऊन आल्यावर त्या ठिकाणी जाण्याचा नकाशा कागदावर तयार करा.

– मनातल्या मनात छोटेमोठे गुणाकार, भागाकार करा. शक्यतो कॅल्क्युलेटर न वापरता हिशेब करा.

Advertisement

– टी.व्ही.वर बघत असलेल्या मालिके ची गोष्ट आपल्या शब्दात लिहा. गोष्टीचा पुढील भाग आपल्या शब्दात आधीच मांडा.

या सगळ्यातून मेंदू जागृत होऊन त्या क्रियेकडे लक्ष दिलं जाईल आणि त्यामुळे लक्षात राहाणंही आपोआप होईल. वर सांगितल्याप्रमाणे दर वेळी मेंदूचे व्यायाम आपल्याला न पचणारे, न रुचणारे करण्याची काहीच आवश्यकता नसते. ते आवडीचे असले तरच ते करावेसे वाटतील. जितक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत जाऊ तितका मेंदू आपल्याला साथ देत जाईल, याचाही तुम्हाला अनुभव येईल. अर्थातच शिकण्याचं महत्त्व आपल्याला पटून त्यामध्ये आपलं मन घालायला पाहिजे हे साहजिकच आहे. तरीही कुठल्याही व्यायामांमुळे मेंदू विचाराधीन राहिला का? ताजंतवानं वाटलं का? हे मात्र जाणीवपूर्वक बघायला हवं.

Advertisement

एकाच प्रकारचे व्यायाम सदोदित करणाऱ्यांच्या मेंदूला पुरेसा व्यायाम मिळेलच असं नाही. उदा. जे शब्दकोडं तुम्ही दहा, पंधरा मिनिटांत सहज सोडवू शकाल, जे सोडवणं तुमच्या हातचा मळ असेल, त्यातून तुम्हाला झालाच तर अत्यल्प फायदा होईल. त्यामुळे एकाच वर्तमानपत्रातील शब्दकोडं पुरेसं आव्हानात्मक नसेल, तर दुसऱ्या वर्तमानपत्रातील कोडं सोडवा. ‘कोडीमास्टरां’ना कोडी सोडवण्याऐवजी स्वत:ची कोडी तयार करून एक वेगळंच आव्हान मिळेल. एकाच प्रकारची कोडी सतत सोडवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणं केव्हाही चांगलं. त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी आव्हानं मिळतील. ‘सुडोकू’तून मिळणारं आव्हान शब्दकोड्याहून वेगळं असेल, तर बुद्धिबळातून, ब्रिज खेळण्यातून मिळणारं आव्हान आणखी वेगळं असेल. हल्ली वेगवेगळ्या कोड्यांसाठीची अ‍ॅप्स मोफत उपलब्ध असतात. त्यांचाही उपयोग करता येईल.

मेंदूला वेगवेगळे व्यायाम देऊन स्मरणशक्तीवर्धन करणाऱ्या ‘वेब पोर्टल्स’ची सुरुवात होऊन अमेरिकेत आता एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. याची सुरुवात विविध रुग्णालयांनी केलेल्या स्मरणवर्धन कार्यक्रमांतून झाली असं म्हणता येईल. ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिम अशा विविध कार्यक्रमांमधून स्मरणशक्तीच्या विषयाबाबत जागृती वाढण्याचं मोठं काम तिथे झालं आहे. परंतु आपल्याकडे हा विषय नवीन होता. आपली पार्श्वभूमी लक्षात घेऊन सगळ्यांना आवडतील, रुचतील असे मेंदूचे व्यायाम घ्यावेत अशी कल्पना मनात रुजली. डिमेंशियाला शक्य तेवढं दूर ठेवायला हवं हे उद्दिष्ट त्यापाठीमागे होतं. या विचारानं पुणे येथे २०१४ मध्ये राज्यातील बहुधा पहिला ‘मेमरी क्लब’ चालू करण्याची संधी मिळाली. आज पुण्यात बऱ्याच ठिकाणी असे क्लब सुरू आहेत. नाशिकमध्येही ते सुरु झाले आहेत. मेमरी क्लब्समध्ये आठवड्यातून एकदा एकत्र जमून मेंदूसाठी आनंददायी व्यायाम (एक्सरसाइज) घेतले जातात.

Advertisement

टाळेबंदीच्या काळात या क्लब्सनी व्हॉट्सअ‍ॅपवरून आपलं काम चालू ठेवलं. त्यावरून स्फूर्ती घेऊन असे अनेक ‘व्हॉट्सअ‍ॅप मेमरी क्लब’ स्थापन झाले. आज महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळपास २,००० व्यक्ती अशा क्लब्सशी जोडल्या गेल्या आहेत. क्लबमुळे होणारे अनेक फायदे सभासद नमूद करतात. त्यामधील प्रमुख फायदे असे आहेत- आत्मविश्वास वाढतो, मनामधील नको ते विचार बंद होतात, मेंदूला सतत खाद्य मिळतं, नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचा आनंद मिळतो, नवीन शिकणं होतं, नवीन ओळखी होतात, इत्यादी. बरेच सदस्य आपल्या ऐंशी वर्षांवरील पालकांनाही हे एक्सरसाइज सोडवण्यात सहभागी करून घेताना दिसतात. यातील काही जण तब्येत बरी नसतानाही एक्सरसाइज सोडवण्याचा आनंद घेतात. सहलीला गेल्यावर, घरात जेवणाच्या टेबलावर एक्सरसाइजच्या चर्चा रंगतात, असंही दिसतं.

हे क्लब्स वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे ते चालवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. केवळ त्यांच्याच सहकार्यावर क्लब्सचं काम चालू आहे. खरंतर मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी सुरू झालेली ही एक चळवळ आहे. या पुढाकारातून ‘एक्सरसाइजेस’चं तयार झालेलं वैविध्य केवळ अनोखं म्हणायला हवं. अर्थात हे काम पुढे जायचं तर उत्साही मंडळींची कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून आवश्यकता आहेच. मेंदूला कायम ‘फॉर्मात’ ठेवण्यासाठी त्याला नियमित खाद्य देणं अतिशय महत्त्वाचं आहे. वर्षभरात महिनाभर व्यायाम केला तर जसा शरीराला व्यायामाचा फायदा होणार नाही, तसंच वर्षभरातून चार आठवडे मेंदूला व्यायाम देऊनही तो पुरेसा होणार नाही. चार-आठ दिवसांत मेंदूला ‘सुपर पॉवरफुल’ करणारी पुस्तकं, गोळ्या आणि इतर कार्यक्रमांचा फोलपणा यावरुन लक्षात यावा. मेंदूचं कुतूहल वाढवून त्याला जागृत ठेवणं हा नित्यक्रमाचाच भाग व्हायला हवा.

Advertisement

मग करायची का सुरुवात? आजच्या मेंदूच्या अभ्यासासाठी काही सोपे प्रश्न खाली देते आहे. ते जरूर सोडवून पाहा.

‘च’ आणि ‘क’ ही दोन्ही अक्षरं असलेले शब्द लिहा. (उदा. चूक, चकवा)

Advertisement

आकाश, आभाळ या शब्दांशी नातं सांगणारे किती शब्द तुम्ही सांगू शकाल?

‘प्यार’ हा शब्द असलेल्या किती हिंदी चित्रपटांची नावं तुम्हाला आठवतात?

Advertisement

तुमचा आवडता एक खेळ, गोष्ट, वस्तू यांपैकी कशाचीही तुमच्या परदेशातील नातीला तुम्ही कशी ओळख करून द्याल?

तुम्हाला आठवतेय का लहानपणी वापरात असलेली जुन्या कपड्यांमधून बेतलेली पिशवी? बाहेर जाताना ती पटकन  खिशात कोंबली तर कधीही तिचा वापर करता यायचा. आता आधुनिक वातावरणात पिशवी हा शब्दही हद्दपार झाला आणि तिची ‘डिझाइनर बॅग’ झाली. या पिशवीचा पूर्वीपासून आतापर्यंतचा प्रवास शब्दांत टिपा; नाहीतर तिचं स्थित्यंतर चित्रांमध्ये पकडा. शाळेतल्या निबंधांचे विषय असायचे तसं ‘पिशवीचं आत्मवृत्त’चं जणू!

Advertisement

घरात वा मित्रमंडळींमध्ये असे प्रश्न तुम्हीच तयार करूनही एकमेकांना सोडवायला सांगू शकाल. अंतिमत: मेंदू तल्लख राहाणं हाच आपला उद्देश आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करणं तुमच्याच हातात आहे.

[email protected]

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement