स्त्रीवादाची धगधगती मशाल


कमला यांनाही या पुरुषसत्ताक प्रवृत्तीचे चटके  लहानपणीच बसले होते. आपल्या एका ‘टेड एक्स टॉक’ मध्ये त्यांनी हा अनुभव सांगितलाय.

Advertisement

|| आरती कदम

गेली ५१ वर्षं अखंडपणे समाजातल्या सर्व प्रकारच्या असमानतेवर घणाघाती प्रहार करणाऱ्या कमला भसीन गेल्या. त्यांचा स्त्रीवाद म्हणजे पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरुद्ध लढणारी धगधगती मशालच! देशभर आणि दक्षिण आशियाई देशांत फिरत त्या स्त्रियांचं जीवन भेदभावमुक्त, सक्षम व्हावं यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करत राहिल्या. बदल घडेल तो तरुण पिढीकडूनच, हे जाणून त्यांच्याशी संवाद साधत राहिल्या. पुरुषांचा तिरस्कार न करता पितृसत्ताक व्यवस्थेनं पुरुषांचंही किती नुकसान के लंय, हे सांगणाऱ्या ज्येष्ठ स्त्रीवादी विचारवंत, कार्यकर्त्यां आणि लेखिकाकमला भसीन यांचे विचार चिंतन करावेत, कृतीत आणावेत असेच…                                                                                                                                    

Advertisement

 ‘‘माझा स्त्रीवाद कधीही पुरुषांचा तिरस्कार करत नाही, की तो न मानणाऱ्या स्त्रियांचाही करत नाही. हो, मी ‘फे मिनिस्ट’आहे आणि मी हसतेदेखील!’’

‘फे मिनिस्ट बायकां’बद्दल अनेकांच्या मनात असणाऱ्या नकारार्थी प्रतिमेला कमला भसीन हसत हसत असा टोला लगावत आणि त्यांना ऐकणारे स्वीकृतीदर्शक हसून प्रतिसादही देत. कारण त्यांचं आत्तापर्यंतचं आयुष्य त्यांच्या याच वागण्याचं  प्रतिबिंब होतं.

Advertisement

 स्त्रीवादाच्या कट्टर पुरस्कर्त्यां ७५ वर्षीय

 कमला भसीन हे रसरशीत, उत्फु ल्ल, ऊर्जेनं काठोकाठ भरलेलं, अनेक दु:खं झेलूनही सदा हसरं व्यक्तिमत्त्व कर्क रोगाचं निमित्त होऊन नुकतंच काळाच्या पडद्याआड गेलं असलं, तरी पितृसत्ताक समाज व्यवस्थेतील असमानतेविरुद्ध चालू ठेवलेलं काम, मग ते दक्षिण आशियाई स्त्री संघटना (संगत), ‘जागोरी’ संस्थेच्या माध्यमातून के लेलं काम असो, लिहिलेली अनेक पुस्तकं , कविता, विशेषत: लहान मुलांची गाणी, स्लोगन्स असोत, की वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली भाषणं असोत, इतकं  प्रचंड आहे की पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी ते दिशादर्शक ठरू शके ल.

Advertisement

   गेली ५१ वर्षं अखंडपणे समाजातल्या सर्व स्तरांतील असमानतेवर घणाघाती प्रहार करणाऱ्या कमला यांचा स्त्रीवाद म्हणजे पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरुद्धची धगधगती मशाल होती. तिच्या प्रकाशात त्या सातत्यानं त्याविरुद्ध आवाज उठवत राहिल्या. देशभर, दक्षिण आशियाई देशांत फिरत राहिल्या. विशेषत: तरुण पिढीशी संवाद साधत राहिल्या. कारण त्यांना माहीत होतं, आता या पुढे बदलणार आहे ती फक्त तरुण पिढीच. जे सुशिक्षित आहेत,  नियमित वाचणारे आहेत, विचार करणारे आहेत, त्यांच्यापर्यंत कमला भसीन गेली काही वर्षं मांडत असलेले                              (पान ३ वर) (पान १ वरून)  विचार पोहोचलेले आहेत, पोहोचत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना आता         ते विचार नवीन वाटणार नाहीत. पण त्यांची पुन्हा पुन्हा उजळणी करणं हेही तितकं च महत्त्वाचं आहे. कारण पितृसत्ताक विचारधारेची पाळंमुळं इतकी खोलवर रुजली आहेत, की ती प्रत्येकाच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. ती चुकीची आहेत हेच मुळात काहींच्या लक्षात येत नाही. म्हणूनच जर ती मुळापासून उपटून टाकायची असतील तर पुरुषांनीच त्यावर सखोल विचार करायला हवा, असं त्यांना वाटायचं. स्त्रीमुक्तीविषयक विचारांनी स्त्रियांना मोठ्या प्रमाणात बदलवलं आहे. आता पुरुषांनी बदललं पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका होती आणि त्यांनी त्याचाच सातत्यानं पुरस्कार के ला. त्यांचं म्हणणं होतं, निसर्गात भेद आहे, भेदभाव नाही. तो माणसांनी निर्माण के ला. त्यांनीच ही पितृसत्ताक समाजव्यवस्था बनवली. आणि ही व्यवस्था पुरुषांना श्रेष्ठ मानत असल्यानं अपरिहार्यपणे त्यांना मालकांचं स्थान प्राप्त झालं आणि साहजिकच समाजाचा दुसरा घटक असणाऱ्या स्त्रिया झाल्या त्यांच्या दासी. नवरा पतीपरमेश्वर असतो आणि तो नेहमी योग्यच असतो हे मानणाऱ्या स्त्रिया आजही आहेत. आजही कित्येक जणी ‘करवा चौथ’ करत त्याची पूजा करतात आणि त्याचा मारही खातात. कमलांना याच गोष्टीची खंत वाटत आली. एका सर्वेक्षणानुसार जगभरात १ अब्ज स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात आणि भारतात ४० टक्के  पुरुष आपल्या बायकोला मारतात. यावर त्या म्हणतात, ‘‘पितृसत्ताक व्यवस्थेनं सर्वांत जास्त नुकसान के लंय ते पुरुषाचं. आई वारली तरी ते रडू शकत नाहीत, कारण पुरुषांनी रडायचं नसतं, हे त्यांना लहानपणापासून शिकवलं गेलंय. अशा पुरुषांतील संवेदनक्षमता, प्रेम, ममत्व, जणू गोठून गेलंय. त्यांच्या आतलं कोवळं, नाजूक मन मरून गेलंय, माणुसकीशी असलेलं नातं तुटलंय,  म्हणूनच ते आपल्याच माणसांवर हात उचलू शकतात. आपल्याच माणसांना रडताना, भेकताना, वेदना सहन करताना पाहू शकतात. त्यांच्यातली ही ‘हिंसात्मक मदार्नगी’ त्यांनाच माणूस होण्यापासून दूर ठेवते. जन्माला आल्यापासून समाज प्रत्येक मुलग्याचं भावनिक खच्चीकरण करत जातो आणि हळूहळू त्याचं रूपांतर पुरुषीआक्रमकतेमध्ये होतं. वर्चस्ववादात बदलत जातं. मात्र याच देशात बुद्धही जन्माला आले आणि महात्मा गांधीही, त्यामुळे ठरवलं तर ती संवेदनक्षमता आपण आपल्यात आणू शकतो. म्हणूनच पुरुषांनी आता बदलायला हवं. ’’ अर्थात या सत्तेच्या राजकारणाच्या, दमनशाहीच्या बळी बायकाही ठरतात. म्हणूनच मार खाणाऱ्या स्त्रिया जेव्हा सासू होतात तेव्हा त्याही सुनेशी तितक्याच क्रूर वागू शकतात, हे सत्य समाजाची खरी शोकांतिका ठरते.

कमला आपल्या भाषणात याचा पुनरुच्चार करत सांगत, ‘‘पितृसत्ताक व्यवस्थेनं दिलेल्या या सत्तेच्या शक्तीचा मोह अनेकांना सोडवत नाही. म्हणूनच आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींवर ती दडपशाही गाजवत राहते. आज जातीयवाद, वर्गवाद, वंशविद्वेष, धर्मांधता, दहशतवाद वाढतो आहे. त्यात पुरुषांचीच मक्ते दारी आहे. कोणत्याही धर्माचा प्रमुख हा पुरुष असतो. इतकं च नाही, तर ‘लेबर ऑर्गनायझेशन’नुसार जागतिक स्तरावरही स्त्री ही फक्त एक टक्का संपत्तीची मालक आहे. सर्व प्रकारची संसाधनं (रीसोर्सेस), सर्व प्रकारचे निर्णय घेणं(डीसिजन मेकिं ग) आणि विविध विचारधारा (आयडिऑलॉजी) पुरुषांच्याच हातात आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि त्याच विचारांच्या विहिरीतील पाणी बायकाही पीत असल्यानं त्यांनाही ते स्वीकृत असतं. मग त्या आपल्या मुलांनाही त्याच चौकटीत घडवत आपल्याच विरोधात एक समाज तयार करतात. पुढची पिढीही त्याच पावलांवर पाऊल टाकत चालत राहते. त्याचमुळे दर वर्षी हजारो मुली गर्भात किं वा त्यानंतर मारल्या जातात. पुरुषी

Advertisement

मक्ते दारी सुरूच राहते.’’ त्यांच्या म्हणण्यानुसार या पुरुषांचा दांभिकपणाही इतका, की आपल्या घरातल्या मुलींना पडदानशीन करतात, तिनं घराण्याची अब्रू वाचवायची, शील जपायचं, आणि त्याचवेळी याच पुरुषांच्या मनोरंजनासाठी काही स्त्रियांचे कपडे उतरवले जातात, त्यांना नाचवलं जातं, पोर्न फिल्ममध्ये वापरलं जातं. जेव्हा मुलीवर बलात्कार होतो तेव्हा आमच्या घराण्याची, समाजाची अब्रू गेली,असा आकांत याच पुरुषांकडून के ला जातो, तेव्हा, ‘माझा आत्मसन्मान मी माझ्या योनीत ठेवलेला नाही. तो फक्त शरीराचा एक भाग आहे. तिथे तुमच्या घराण्याची इज्जत ठेवायला कु णी सांगितलं होतं? बलात्कार झाल्यावर इज्जत जाते, ती त्या बलात्कार करणाऱ्याची, त्या बाईची नाही.’ असे खडे बोल सुनावायलाही कमला मागेपुढे पाहात नव्हत्या.

कमला यांनाही या पुरुषसत्ताक प्रवृत्तीचे चटके  लहानपणीच बसले होते. आपल्या एका ‘टेड एक्स टॉक’ मध्ये त्यांनी हा अनुभव सांगितलाय. वयाच्या ३ ते ८ या पाच वर्षांत चौदा पुरुषांकडून त्यांना लैंगिक अत्याचाराचे अनुभव आले. ते सगळे घरचेच होते. बाबांचे, भावाचे मित्र, अगदी टेलरसुद्धा. पण ८व्या, ९व्या वर्षी मात्र अशा लोकांपासून दूर कसं राहायचं याची समज आली आणि त्या स्वत:ला वाचवू शकल्या. त्यांनी स्वत:ला खमकं  बनवलं. त्या काळातही त्या अशा गोष्टी करत ज्या फक्त पुरुष, मुलगे करीत असत. मग ते मैदानावर जाऊन फु टबॉल खेळणं असो, गिल्ली दंडा (विटी दांडू) खेळणं असो, झाडावर चढणं असो, की खणखणीत शिटी वाजवणं असो. इतकं च नाही, तर त्यांच्या परिसरातल्या त्या काळातल्या मोटारसायकल चालवणाऱ्या त्या एकमेव होत्या. अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर असणारे प्रगतिशील वडील आणि भाऊ यांचा त्यांना कायमच पांठिंबा राहिला आणि म्हणूनच त्या ‘एम. ए.’पर्यंत शिकल्या. प्रचंड मेहनत करून स्कॉलरशिप मिळवून जर्मनीला गेल्या. जर्मन शिकल्या. तिथे समाजशास्त्राचा अभ्यास के ला. हुशार कमलांना जर्मन सरकारनं भरगच्च पगाराची नोकरीही दिली. पण ७-८ महिन्यांत त्यांना स्वदेश साद घालू लागला आणि त्या भारतात, राजस्थानला परतल्या. ‘सेवा मंदिर’ या ‘एनजीओ’मध्ये कामाला लागल्या त्या फक्त २५० रुपये पगारावर. त्यानंतर मात्र त्या पोहोचल्या ‘युनायटेड नेशन्स’च्या ‘फू ड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनाझेशन’मध्ये (एफएओ). काम अर्थातच ‘भुके पासून मुक्ती’चं. साहजिकच वेगवेगळ्या एनजीओंच्या माध्यमातून गरीब लोक, विशेषत: स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी के लं. त्यांचा विकास आणि सक्षमीकरणावर भर दिला. मुख्यत: दक्षिण आशियाई आणि पूर्व आशियाई देशांसाठी त्या काम करत होत्या. त्याचबरोबर ‘संगत’ (साऊथ एशियन फे मिनिस्ट नेटवर्क ) आणि  दिल्लीच्या ‘वूमन्स रीसोर्स अँड ट्रेनिंग सेंटर’ (जागोरी) यांचं सल्लागारपद, हिमाचल प्रदेशमधील ‘ग्रामीण जागोरी’मध्ये सक्रिय सदस्य, ‘पीस विमेन अ‍ॅक्रॉस द ग्लोब’च्या सहअध्यक्ष आणि ‘वन बिलियन रायझिंग’ या व्यापक चळवळीच्या दक्षिण आशियाई देशांच्या संघटक. अशा विविध पदांवर, वेगवेगळ्या स्तरावर काम करत विशेषत: स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करत राहिल्या. भारतभरात ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या, आंदोलनं उभी राहिली, त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मग ते मथुरा बलात्कार प्रकरण असो, शहाबानो प्रकरण असो, भँवरीदेवी बलात्कार प्रकरण असो, की सतीविरोधी आंदोलन. स्त्रीवादाची ज्योत त्यांनी सतत तेवत ठेवली.

Advertisement

पुढे त्यांनी लग्नही के लं. जोडीदार चांगला होता. पितृसत्ताक विचारधारेपलीकडचा, समानता मानणारा होता. घर सांभाळणारा होता. साहजिकच संसारात त्यांच्या भूमिका बदलल्या. त्यांचा पती ‘होममेकर’ झाला आणि कमला ‘ब्रेडविनर’. कमला यांचं काम जोरात सुरू होतं. मुलगी झाली मिटू. नंतर मुलगा झाला. पण दुर्दैव असं, की एका औषधांची रिअ‍ॅक्शन येऊन तो सेरेब्रल पाल्सीचा रुग्ण झाला आणि व्हीलचेअरवर जखडला, कायमस्वरूपी. आज तो ४१ वर्षांचा आहे. शोकांतिका ही, की ना त्याचे वडील त्याच्याजवळ आहेत, (कमला आणि त्यांचे पती यांचा नंतर घटस्फोट झाला) ना बहीण मिटू, आणि आता तर कमलाही नाहीत. आपल्यानंतर मुलाचं काय, ही चिंता कमला यांना कायम सतावत राहिली. त्यांनी त्याची व्यवस्था नीट के ली आहेच. त्याला सांभाळायला माणसंही आहेत. पण त्यांच्या मुलीनं जेव्हा नैराश्याचा झटका येऊन वयाच्या २७ व्या वर्षी आत्महत्या  केली, तेव्हा मात्र त्या कोसळल्या. त्यांनी म्हटलंय, ‘‘अत्यंत लाघवी, काळजी घेणारी, उत्कृष्ट नृत्यांगना, लहानपणापासूनच तीव्र बुद्धिमत्ता असणारी ही माझी मुलगी. ऑक्सफर्डमध्ये शिकली आणि तिथेच स्थायिक न होता भारतात येऊन मानवाधिकारांचं काम करू लागली. प्रचंड काम करणारी अत्यंत संवेदनशील मुलगी, लोकांच्या भल्यासाठी धडपडणारी. पण नैराश्याची शिकार बनली. आम्ही खूप प्रयत्न के ले तिला यातून बाहेर काढायचे, पण ती नाही बाहेर येऊ शकली. माझं, माझ्या मुलाचं आणि मुख्य म्हणजे समाजाचं भविष्य असणारी माझी मुलगी निघून गेली. पण तिच्या दु:खाला मी बाजूला काढू शकत होते, कारण माझ्या वैयक्तिक दु:खापेक्षा खूप मोठं काम माझ्यासमोर होतं, समाजाचं. ते नसतं तर कदाचित मी पुन्हा उभीच राहू शकले नसते.’’

आणि ते खरंच होतं. सतत माणसांच्या प्रगतीचा, त्यांना चांगलं आयुष्य देण्याचा ध्यास घेतलेल्या कमला यांचं लिखाण चालू होतंच, त्यांनी पुढे अनेक कविताही लिहिल्या, वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली आणि पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरुद्धची आपली लढाई चालूच ठेवली. ‘अंडरस्टँडिंग जेन्डर’, ‘व्हॉट इज पॅट्रियारकी’, ‘बॉर्डर अँड बाऊंड्रीज : विमेन इन इंडियाज पार्टिशन’ (सहलेखिका रितू मेनन), ‘एक्सप्लोरिंग मॅस्क्युलिनिटी’, ‘सम क्वेश्चन्स ऑन फे मिनिझम अँड इट्स रिलेव्हन्स इन साऊथ एशिया’ (सहलेखिका निगत सइद खान),‘लाफिं ग मॅटर्स’ (सहलेखिका बिंदिया थापर) आदी तीसच्या वर पुस्तकं  वा पुस्तिका समाज समजून घेण्यासाठी उपयोगी पडणारी आहेत. त्यांचं अनेक भाषांमध्ये भाषांतरही झालं आहे. मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व सांगणारी, ‘क्योंकी मैं लडकी हूं, मुझे पढना हैं’, मुलींचं सहज जगणं सांगू पाहणारी ‘उमडती लडकियाँ’ अशा त्यांच्या अनेक कविता मुलींमध्ये आशावाद पेरणाऱ्या ठरल्या आहेत. त्याही पलीकडे मुलांसाठीच्या बडबडगीतसदृश्य त्यांच्या कविता खूप लोकप्रिय ठरल्याच. याशिवाय त्यांचा ‘सब जुल्मोंसे आझादी’चा नारा तर प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात गुंजतोच आहे. 

Advertisement

माणूस मरतो तो देहानं. त्याचं काम त्याला अमर करत असतं, हे कमला भसीन यांच्या बाबतीत तंतोतंत पटणारं आहे. त्यांनी पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरुद्ध, त्यातील असमानतेविरुद्ध, वर्चस्ववादाविरुद्ध आणि त्यातून घडणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध चालू ठेवलेलं युद्ध चालूच राहणार आहे. त्यांनी हाती घेतलेली मशाल त्यांनी त्यांच्या पुढच्या तरुण पिढीकडे, पुरुषांच्या हातात दिली आहे. सगळ्यांनीच विशेषत: पुरुषांनी ‘सब जुल्मोंसे आझादी’

म्हणत स्वत:ला बदलत ती धगधगती ठेवली, तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

Advertisement

काही अपरिहार्य कारणामुळे आजच्या अंकात ‘वसुंधरेच्या लेकी’ हे सदर प्रसिद्ध होऊ शकलेले नाही.

[email protected]  

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement