सोलापूर30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
संभाळचा निनाद. बँड पथकाचे मंगलमय स्वर. सिद्धेश्वर महाराजांची पालखी आणि मानाच्या सातही काठींची मिरवणूक. हिरेहब्बू वाड्यातून उत्सवास सुरुवात झाली. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेतील आज पहिला दिवस आहे. 68 लिंगाचा यण्णीमज्जन धार्मिक विधीने सुरू झाला. सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाना तैलाभिषेक करण्याचा हा सोहळा असतो.
सकाळी नऊच्या सुमाराला यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते काठीची पूजा झाली. त्यानंतर उत्तर कसबा, दक्षिण कसबा, दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, सिद्धेश्वर मंदिरात काठ्या आल्या. विजापूर वेस चौकात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड संस्थेतर्फे काठींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मानकरी यांचा शाल, हार देऊन सत्कार करण्यात आला. सिद्धेश्वर मंदिरात अमृतलिंग येथे तैलाभिषेक केल्यानंतर 68 लिंगाना तैलाभिषेक करण्यासाठी नंदीध्वज मार्गस्थ झाले.
सोलापुरात या उत्सवामुळे आणि दोन वर्ष करोनामुळे यात्रा झाली नव्हती. त्यामुळे सोलापुरात एक आनंद, चैतन्य आणि मंगलमय वातावरण आहे. शनिवारी यात्रेतील दुसरा दिवस असून दुपारी एक वाजता सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्याजवळ अक्षता सोहळा होणार आहे.
कर्नाटकातील बाहुल्या, पवन घोडा यंदाचे आकर्षण यंदाच्या यात्रेमध्ये कर्नाटकातील बाहुल्यांचा खेळ आणि पवन घोडा यंदाचे आकर्षण आहे. रंगीबेरंगी छत्र्या विविध प्रकारच्या बाहुल्यांचा खेळ आणि संगीताच्या तालावर नाचणारा पवन घोडा सोलापूरकरांना पाहायला मिळाला.
यात्रेचे मानकरी
राजशेखर, मनोज, जगदीश, विकास, विनोद, सागर हिरेहब्बू हे प्रमुख मानकरी आहेत. सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे दर्शन घेण्यासाठी वाड्यामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. तसेच सातही काठ्यांना पुष्पहार घालून व साज चढवण्यात आले होते.