सोयरे सहचर : ..तू माझा सांगाती!भरत दाभोळकर

Advertisement

प्राणी-पक्षी तुमच्या आयुष्यात आले की ते नुसतेच सोबती नसतात, तर तुमच्यात आणि त्यांच्यात एक विलक्षण असं मैत्री तयार होतं. जिवाभावाचं. मग त्यात त्यांचं रुसणं ही आलं, नि रागावणंही! पण त्यांच्यासारखं निर्व्याज, निरपेक्ष प्रेम करणारं, जीव लावणारं कुणीही नाही हेही तितकंच खरं. अशाच अनुभवांचं हे सदर. कुणी आपल्या कुत्रा-मांजरांविषयी बोलणार आहे, कुणी हत्तींविषयी तर कुणी मकाऊ, मार्मोसेट वा काकाकुवांविषयी.. कुणी अगदी जंगली प्राण्यांविषयीसुद्धा. काय दिलं या साऱ्या मुक्या साथीदारांनी त्यांना, कसं बदललं त्याचं आयुष्य त्यांच्या सहवासात, हे सांगणारं ‘सोयरे सहचर’ सदर दर शनिवारी..

‘‘भावंडं नसल्याची उणीव मला कधी भासलीच नाही, कारण माझं बालपण प्राणी-पक्ष्यांचा मुक्त संचार असलेल्या माझ्या घराजवळच्या वनराईतच गेलं. आयुष्याचं पहिलं मैत्र मला त्यांच्यात गवसलं आणि माझं आयुष्य त्यांच्यासाठी मुक्त दार झालं. करिअरला सुरुवात झाली तेव्हाही ना आमचा सहवास कमी झाला ना आमच्यातलं प्रेम. कारण जंगलाचा भास निर्माण करणारं ऑफिस आणि त्यात मुक्तपणे वावरणारे खरेखुरे प्राणी-पक्षी सतत बरोबर असत. आज माझ्या घरी सहा कुत्रे, दोन पिग्मी बकऱ्या, मांजर, दोन काकाकुवा, दोन बगळे आहेत. माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर्स असणारे, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ असणारे, हे सारे माझे सोयरे सहचर आहेत,’’ सांगताहेत प्रसिद्ध ‘अ‍ॅडगुरू’ भरत दाभोळकर.

Advertisement

माझं सारं बालपण मलबार हिल (वाळकेश्वर) परिसरात गेलं. आमच्या बंगल्याभोवती मोठाले वृक्ष आणि गर्द झाडी होती. आंबे, वड, चिकू, पिंपळ अशा झाडांच्या घनगर्द सान्निध्यातलं माझं ते रम्य बालपण! या परिसराचे जे उपकार माझ्यावर आहेत, त्या ऋणांची उतराई आजही होऊ शकलेली नाहीये. म्हणजे असं, की माझ्या आई-वडिलांचा मी एकुलता एक मुलगा. दुसरं भावंडं नसलं, तरी कुणाबरोबर खेळायचं हा प्रश्न मला कधी भेडसावला नाही. घराच्या आजूबाजूची हिरवीगार वनराई म्हणजे अनेक पक्षी आणि पशूंसाठी हक्काचं घर होतं. निसर्ग आणि पशूपक्षी यांच्या सहवासातच मी वाढू लागलो.. त्यांच्यातच मला पहिलं मैत्र गवसलं.

आमच्या बंगल्याच्या परिसरातही कुत्री, मांजरी, गायी, बकऱ्या, खार, विविध पक्षी यांची मुक्त वस्तीच होती. घरी माझा मुक्काम फक्त जेवणापुरता आणि रात्री निजण्यापुरता असे. शाळेतला गृहपाठ नियमित करणं माझ्या स्वभावाला फारसं मानवणारं नव्हतं. मग काय, प्रत्येक सुट्टीचा दिवस, शनिवार-रविवार माझा मुक्काम दिवसभर या गर्द झाडीत आणि सगळय़ा प्राण्यापक्ष्यांच्या सहवासात जाई. याच वनराईत अनेक पांढरी कबुतरं थव्यानं येत. माझी त्यांच्याशी दोस्ती न होती तरच नवल होतं! गिरगावच्या आर्यन शाळेत मी शिकलो. माझ्या गणवेशाच्या खिशात एखादं तरी कबुतर कायम असेच. माझ्या वर्गमित्रांना माझा त्यामुळे हेवा वाटे. आमच्या घरच्या वनराईत अनेक खारी होत्या. साहजिकच त्यांना पाळणं ओघानं आलंच. खारींची पिल्लं खूपदा जखमी होत. मग त्यांना घरी आणून मी त्यांच्यासाठी कापसाचा बिछाना करत असे. त्यांना कापसाच्या बोळय़ानं दूध पाजवणं माझं अत्यंत आवडीचं काम असे. याच काळात एकदा झाडावरून घुबडाचं पिल्लू खाली पडलं. मी तिथंच होतो, त्यामुळे त्या जखमी पिल्लाला घरी आणलं आणि त्याच्या सेवेत रुजू झालो. त्या पिल्लाला कायमचं घरात ठेवण्याचा माझा मानस होता, पण आईनं ठणकावून सांगितलं, ‘‘तू आमचं इतर काही ऐकत नाहीस, पण घुबडाच्या पिल्लाला मात्र मी घरात ठेवू देणार नाही. घुबड अशुभ असतं!’’ आईचा हा ठाम पवित्रा बघून माझा नाईलाज झाला आणि ते पिल्लू बरं झाल्यावर मी त्याला परत वनराईत ठेवून आलो. नंतर  माझ्या ऐकण्यात, वाचनात आलं, की घुबड हे लक्ष्मीचं वाहन असतं. मग ते अशुभ कसं असेल? हा विचार मनात आला आणि नंतर मात्र त्याच्या अशुभ असण्यावर माझा कधीही विश्वास बसला नाही. एक मात्र खरं, की प्राण्यांना जीव लावणं, त्यांचा सांभाळ करणं हेच माझं बालपण होतं. . पुढे पुढे तर माझ्यामुळे आईलाही मी पाळलेल्या प्राण्यांचा लळा लागत गेला. तिनंही माझ्या या दोस्तांची देखभाल केली. वडिलांना मात्र वाटे, की त्यांचा चिरंजीव वेळ व्यर्थ घालवतोय. त्यांना तेव्हा प्राण्यांची आवड नव्हती.

Advertisement

माझ्या आईचं माहेर बेळगाव. माझ्या या आजोळी घराभोवती मोठं कंपाऊंड होतं. या आवारातदेखील गायी-म्हशी, मांजरी-कुत्री यांचा वावर असायचा. मग काय, माझी याही तमाम मुक्या दोस्तांशी गट्टी जमली. इतकी, की मी ज्या ज्या गल्लीबोळातून फिरायचो, मैदानात खेळायला जायचो, तिथे तिथे या दोस्तांपैकी एक तरी माझी सोबत करत असे. अगदी ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ या न्यायानं! आजोळी असताना एका सुट्टीत एका म्हशीच्या पारडूशी मैत्र जुळलं. आमची मैत्री इतकी बहरली, की ते माझं सोबती झालं. मैदान ते घराचा दरवाजा, दरवाजा ते मैदान आम्ही सतत एकत्रच फिरायचो. आजूबाजूच्या आळीतदेखील माझी ही पारडूशी असलेली मैत्री आणि आमचं सदोदित एकत्र फिरणं, एकत्र असणं हा चर्चेचा विषय झाला होता, जो त्या वेळी माझ्या गावीही नव्हता! मला मात्र त्याचे डोळे मोह घालायचे, कारण त्यात मला कायम माझ्याविषयीची आस्था, कळकळ, प्रेम दिसायचं.

इतकंच काय, लहानपणी माझं सारं लक्ष रस्त्यातून चालणारे भटके कुत्रे, गायी-म्हशी, बैल, गाढवं, खेचरं, पक्षी यांच्याकडेच असे. सगळेच प्राणी आवडत. इतके, की मी रस्त्यातून चालणाऱ्या गाढवांचे मुकेदेखील घेई! आत्तापर्यंत अनेक भटक्या, खूपदा घायाळ झालेल्या कुत्र्यांना मी थेट घरी आणून त्यांची जिवाभावानं सेवा करत राहिलो. माझ्या अवतीभवती कायमच प्राणी-पक्षी राहिले, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आजवर एकही प्राणी चावलेला नाही की कुणी कधी इजा केली नाही.

Advertisement

लहानपणीच एकदा घराच्या आवारात एक कुत्र्याचं पिल्लू आलं आणि ते घराजवळच रेंगाळत राहिलं. या कुत्र्याच्या पिल्लाला मी घरी आणलं आणि त्याच्या गळय़ात पट्टा बांधून त्याचं नामकरणही केलं. जेव्हा हा नवीन दोस्त आमच्याकडे आला, तेव्हा आईनं फारशी खळखळ केली नाही, पण बाबांचा त्रासिक चेहरा बरंच काही सांगत होता! माझं प्राणीविश्व सतत माझ्यासोबत असल्यानं माझ्या अभ्यासावर त्याचा काही अनिष्ट परिणाम वगैरे होईल असं त्यांना वाटत असे बहुधा, पण तसं नाही झालं. उलट त्यांच्या सहवासात माझा स्वभाव अंमळ प्रेमळच झाला, असं मला वाटतं. त्यांच्या मूक भाषेचा अर्थ मला सहज लागत जातो, माझ्या जडणघडणीत या मुक्या दोस्तांचं फार मोठं योगदान आहे. १० वर्षांनंतर हा कुत्रा वारला आणि घर ओकंबोकं वाटू लागलं. शेवटी वडिलांनीच मला सांगितलं, की ‘‘तुला आवडतं ना, मग दुसरं कुत्र्याचं पिल्लू घेऊन ये!’’ पडत्या फळाची आज्ञा मानून मी लगेच एका गावठी पिल्लाला घरी आणलं आणि हिरमुसलेलं घर पुन्हा प्रफुल्लित झालं आणि घरी पक्षी-प्राणी पाळणं हा सिलसिला अबाधित चालू राहिला..

पुढे मोठा झालो, पायांवर उभा राहिलो. प्रचंड व्यग्र झालो, परंतु या मुक्या मित्रांसाठी वेगळा वेळ काढण्याची मला गरज पडली नाही. जणू त्यांचं अस्तित्व माझ्यासाठी ‘हार्ट टू हार्ट’ होतं. माझा बुलडॉग आणि माझं नातं तर इतकं घट्ट होतं, की तो रोज माझ्याबरोबर माझ्या गाडीत बसून ऑफिसमध्ये येई. कधी माझ्या केबिनच्या कोपऱ्यात बसून राही, तर कधी ऑफिसमधल्या कुठल्याही कोपऱ्यात बसे. मी एक लॅटिन अमेरिकी माकडदेखील पाळलं होतं. या पिटुकल्या खारीएवढय़ा आकाराच्या माकडांना ‘मार्मोसेट’ म्हणतात. हे माकडही माझ्या ऑफिसचा एक महत्त्वाचा भाग बनून गेलं होतं. त्यातून स्फुर्ती घेऊन बहुधा मी ऑफिसचं दार अनेक प्राणी, पक्ष्यांसाठी कायमचं उघडलं. महाकाय मासे, सिंगापुरी मोठाले विविधरंगी पोपट, पांढरे आणि तपकिरी ससे, बोलणारी मैना अशा विविध पशुपक्ष्यांच्या सहवासात मी आणि माझे अनेक सहकारी निसर्ग आणि पशुपक्ष्यांच्या निव्र्याज जगण्याचा निर्भेळ आनंद लुटत दैनंदिन कामकाज करत असू. यातली बोलणारी मैना तर अनेक अभ्यागतांसाठी आकर्षणाचा केंद्रिबदू होऊन गेली होती. माझं ऑफिस पूर्वी वरळीला होतं. त्याची सजावटही जंगलाचा, निसर्गाचा फील यावा अशी होती. कृत्रिम झाडांच्या फांद्या सहकाऱ्यांच्या टेबलवर येत. एका अचाट आणि अफाट मोठय़ा ‘फिश टॅन्क’ची रचना फ्लोअर म्हणून केली होती. त्यावरून चालणं हा अनेकांसाठी विस्मयकारी अनुभव असे. त्यात अनेक सुंदर मासे, कासवंही होती. ऑफिसमध्ये काही मकाऊ पक्षीदेखील होते. त्यानंतर मी ‘कमला मिल्स कंपाऊंड’ ऑफिसमध्ये गेलो तिथेही हा सारा गोतावळा माझ्याबरोबर असे.

Advertisement

 माझ्या या मैत्रीची माहिती अनेकांना होती. त्यामुळे काही घडलं तर मला ते बोलवून घेत. अनेक नाटकांतला माझा सहकारी कलाकार सतीश शाह याचा एकदा सकाळीच फोन आला. तो म्हणाला, ‘‘माझ्या घरासमोर पंख तुटलेलं बगळय़ाचं पिल्लू पडलं आहे. त्याची तडफड पाहवत नाही. त्याला ठेवून घेणं तुला शक्य आहे का?’’ मी फोन ठेवून लगेच गाडी त्याच्या घराकडे नेली आणि ते बगळय़ाचं पिल्लू घेऊन माझं घर गाठलं. हा बगळा आता माझ्या घराचा सदस्य होऊन किमान ३-४ वर्ष झालीत. हा माझा दोस्त तेव्हा आजारी होता, पण थोडय़ा शुश्रूषेनंतर मस्त ठणठणीत झाला. तो एका विशिष्ट प्रकारचेच मासे खातो, जे मी त्याच्यासाठी नियमित घेऊन येतो. माझा मित्र अभिनेता मिथुन चक्रवर्तीकडेही डझनभर कुत्रे आहेत. त्याच्याही आठवणी विचक्षण आहेत.

आज माझं राहतं घर प्राणी-पक्ष्यांचं मुक्त आवास आहे. सध्या माझ्या घरी सहा कुत्रे, दोन पिग्मी बकऱ्या, एक मांजर, दोन काकाकुवा, पांढरे बगळे आहेत. सहांपैकी तीन कुत्रे माझ्या अंथरुणात, माझ्याशेजारी झोपतात. तर तीन कुत्रे सोफ्यावर विराजमान असतात. कुत्रे-मांजरी एकमेकांचे वैरी असतात म्हणे, पण मला तसा कधीही अनुभव आला नाही. हे सगळे पशुपक्षी गुण्यागोविंदानं राहतात. प्रत्येक जणाचं बोलणं वेगळं, आवाज वेगळा, उच्चाराची पद्धत वेगळी, पण त्यांचं साद घालणं, पक्षांचा गुंजारव माझं जीवन स्वरमयी करतो. त्यांचं एकमेकां- बरोबरचं सहजीवन माणसाला खरं तर खूप काही शिकवून जाणारं आहे. माझ्या घरी आलात कधी तर त्यांचा मेळावा पाहत राहावा असा. कधी बगळा बकरीच्या मानेवर बसलेला असतो, तर कधी कुत्रे-मांजरी-बकऱ्या यांची एकत्र पंगत बसलेली असते. त्यांची एकमेकांबरोबरची मस्ती, मजा हा न विसरता येणारा अनुभव. 

Advertisement

पशुपक्षी आपले ‘स्ट्रेस बस्टर्स’ असतात हा माझा अनुभव आहे. त्यांच्या सहवासात आपण आपले ताणतणाव विसरतो, चिंतामुक्त होतो. माझ्या सुदैवानं माझ्या आयुष्यात ताणतणाव फारसे कधी निर्माण झाले नाहीत, पण तरीही मला त्यांचा सहवास कायमच हवाहवासा वाटत आला. या  मुक्या दोस्तांकडून मला नेहमीच सात्त्विक, निरागस आणि निरपेक्ष प्रेम मिळालं. माझा मित्र, दिग्दर्शक अनंत महादेवन नेहमी घरी आला की मला म्हणतो, ‘‘तुझ्या घरी खूप पॉझिटिव्ह व्हाइब्ज जाणवतात!’’

२०२० आणि २०२१ चा टाळेबंदीचा जवळपास दीड वर्षांचा काळ मी घराबाहेर पडलोच नाही. पण मला एकटेपणा, कंटाळा, औदासीन्य, निराशा कधीही जाणवली नाही. माझ्या या पाळीव प्राण्यांची नावं कदाचित तुम्हाला गमतीशीर वाटतील. ‘बिर्याणी’ असं नाव असलेली बकरी हात पुढे करून ‘शेकहॅण्ड’ करते. माझ्याकडची एक कुत्री ट्रेडमिल वापरत असे. मी वेळेअभावी ट्रेडमिल वापरू शकलो नाही तरी ही कुत्री मात्र दिवसाला ७-८ मिनिटं ट्रेडमिल वापरत असे. कुणी तिच्या ट्रेडमिलला हात लावलेला तिला खपत नसे. ही कुत्री ६ महिन्यांपूर्वीच वारली. माझ्या एका कुत्र्याचं नाव माफिया आहे, तर एका कुत्रीचं नाव आहे फूलनदेवी! त्यांच्या पिलावळीचं नाव दाऊदभाई आणि ओसामाभाई! तिलोत्तमा हे आणखी एका कुत्रीचं नाव. एका रॅश येणाऱ्या कुत्र्याचं नाव ‘शैतान’ ठेवलंय! माझ्या या विश्वात मी आनंदी असतो. आमचं जाहिरातींचं, नाटकांचं कामही तसंच होतं. मी पशुपक्ष्यांना ‘शो पीस’ मानणाऱ्यांतला नाही. माझ्यासाठी हा न आटणारा आनंदाचा झरा आहे. निव्वळ, निखळ आनंदाचं दुसरं नाव म्हणजे माझे हे मूक साथीदार!

Advertisement

शब्दांकन- पूजा सामंत

[email protected]

Advertisement

The post सोयरे सहचर : ..तू माझा सांगाती! appeared first on Loksatta.Source link

Advertisement