सोयरे सहचर : घर चैतन्याने भरून टाकणारे दोस्त..‘मी ऑफिसमधून येताना स्वागतासाठी हजर होणारा आणि हक्कानं ‘कॅडबरी’ चॉकलेटची मागणी करणारा ‘काळू’.. जेवण करताना आजूबाजूच्या माणसांनी आपल्याशी बोलत बसायला हवं, असा लाडिक हट्ट धरणारी ‘डोरा’.. ठरावीक वेळी येऊन ‘ताजीच चपाती हवी’ म्हणून पंगतीला बसणारा कावळा आणि केकाटी.. आमच्याकडे आलेल्या या पाहुण्यांनी आमचं घर कायम चैतन्यानं भरून टाकलं..’ सांगताहेत प्राणिप्रेमी नीता शेरे.   

Advertisement

जवळजवळ १७ वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या बोरिवलीच्या घरी मांजरीची सहा पिल्लं आणि त्यांची आई असा मोठा परिवार होता; पण ही मनी तिची पिल्लं अगदी लहान असतानाच त्यांना सोडून गेली. आमच्या इमारतीत एक विहीर होती. कदाचित पहाटे कधी तरी ती खाली गेली असेल आणि तिच्या पाठी कुत्रा लागला असेल. सकाळी अजून मनी का नाही आली म्हणून आम्ही खाली जाऊन शोधू लागलो, तर तिचा देह विहिरीत पाण्यावर तरंगून वर आला होता. आम्ही तिच्या सर्व बाळांना सांभाळण्याचं ठरवलं.

  आमच्यात पिढीजात प्राणिप्रेम आहे. आम्ही पिल्लांना ड्रॉपरनं दूध पाजत होतो, त्यांची काळजी घेत होतो; पण या सहा पिल्लांमधली तीन जगली नाहीत. उरलेली तीन बहीणभावंडं मात्र चांगली मोठी झाली. त्यातली एक मनी होती आणि दोन मन्या होते. ही आमची छोटी मनीमाऊ बाळं! ही छोटी मनी खूपच देखणी होती. तपकिरी आणि पांढरा रंग, तपकिरी डोळे आणि लालचुटुक नाक होतं. आम्ही तिला ‘मनी’च म्हणू लागलो. खूप भित्री होती ती! तिच्या भावंडांतला एक मन्या- जो खरबट (ग्रे) रंगाचा होता त्याचं आम्ही ‘खरबू’ नाव ठेवलं. दुसरा मन्या छान काळा होता, त्याला ‘काळू’ म्हणून हाक मारू लागलो. आम्ही या तिघांना बाथरूमच्या जाळीवर प्रातर्विधी करायला शिकवलं होतं. त्यांना रात्री १० नंतर बाहेर जाऊ देत नव्हतो. तिघंही माझ्या अंथरुणात झोपायला असायची. त्यांना आंघोळ फारशी आवडायची नाही, पण तेही आम्ही करत होतो. त्यांचा खाऊ म्हणजे सकाळ-संध्याकाळी दूध आणि दुपारी-रात्री मासे-भात. आम्ही एक कोळीण कायम केली होती, ती आठवडय़ात तीन वेळा मासे आणायची. मनी भित्री, तर खरबू द्वाड होता. काळू मात्र खूप हुशार होता. त्याला मोगऱ्याचं फूल खेळायला फार आवडायचं. म्हणून आम्ही गमतीनं म्हणायचो, की हा राजवंशीय असावा! काळू फिरत फिरत आजूबाजूच्या दोन इमारतींपर्यंत जायचा. मी संध्याकाळी ऑफिसमधून येताना त्याला कसं कळायचं माहिती नाही, पण बरोबर इमारतीच्या कुंपण भिंतीवर येऊन ‘म्याव म्याव’ करून माझं लक्ष वेधून घ्यायचा. मग त्याला खांद्यावर घेऊनच आमची वरात घरी यायची! घरी आल्यानंतर काळूला कॅडबरी चॉकलेट लागायचं! त्यामुळे मला पर्समध्ये नेहमी कॅडबरी ठेवायला लागायची. मग खेळण्याचा कार्यक्रम व्हायचा. मगच मी माझी कामं करायचे. काळू माझ्या बहिणीचा लाडोबा, तर खरबूला माझ्याविषयी जास्त प्रेम होतं. त्यामुळे खरबू नेहमी माझ्या मांडीवर बसत असे, तर काळू बहिणीच्या मांडीवर बसत असे. मनी मात्र अंगावर बसणं वगैरे काही फारसं करत नसे. कालांतरानं मांजरं वयात आल्यावर आम्ही ठरवलं की त्यांचा कुटुंबकबिला वाढू द्यायचा नाही. त्यांचाच कायम सांभाळ करायचा. त्याप्रमाणे आम्ही त्यांना बैल-घोडा परळ इथे हॉस्पिटलमध्ये ठेवून सर्व काही करून घेतलं. बैल-घोडा हॉस्पिटल म्हणजे आमच्यासारख्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांचं माहेरघर आहे. तिथे सर्व प्राण्यांवर आमच्यासारखंच प्रेम करताना पाहून खूप छान वाटायचं आणि वाटतंसुद्धा. मांजरांना मोठय़ा बास्केटमधून न्यायचो, पण ती खूप अस्वस्थ होत. त्यामानानं कुत्रा प्रवासाला खूप चांगला असतो. त्यामुळे आमच्या मन्या-मनीला घेऊन जायचं म्हणजे एक दिव्यच असायचं. ते मी आणि माझा भाऊ करायचो. पुढे मात्र आमची मांजरं थोडी आजारानं त्रस्त व्हायला लागली. त्यांना जो मासा आवडायचा, तो बहुदा त्रासदायक होऊ लागला होता. हॉस्पिटलमध्ये ठेवूनही खूप उतार पडला नाही. जवळजवळ दोन वर्ष आमच्याकडे एक डॉक्टर दर आठवडय़ाला तिघांना इंजेक्शन देऊन जायचे, मग त्यांना थोडा आराम पडायचा. त्या तिघांना रोज सकाळी मासे वाफवून, काटे काढून, पेज घालून लहान बाळासारखं मांडीवर घेऊन भरवायला लागायचं. एकदा आमच्या काळूचा कान कुणा उनाड बोक्यानं चावला. मग हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला टाके घालून आणलं. आमची मांजरं कायम पोटभर खात असल्याने तृप्त असायची होती, त्यामुळे त्यांचा शेजारीपाजारी कुणाला त्रास नव्हता. मात्र काळ कुणालाही अमरत्व देत नाही हे जीवनाचं अटळ सत्य आहे. जवळजवळ १३ वर्ष मांजरांच्या सहवासानं मिळालेला आनंद संपण्याची एक दिवस वेळ आलीच. त्या सर्वानी कालांतरानं- थोडय़ा थोडय़ा फरकानं आमचा निरोप घेतला. माझ्या मांडीवर त्यांनी प्राण सोडले आणि आम्ही त्यांना आमच्या घराच्या आवारातच पुरलं. तेव्हाच्या भावना कशा सांगू.. जणू आमची मनीबाळं सर्व घर रिकामं रिकामं करून गेली होती!

Advertisement

या सर्व काळात माझी आई आणि आजोबा यांची अनमोल साथ होती. मांजरं गेल्यावर आम्हाला खूप रितेपण आलं होतं. म्हणून परत असं जीव गुंतवणारं काही करायचं नाही असं ठरवलं होतं. आमच्याकडे खूप वर्ष एक पोपटही होता. तो खूप छान शिट्टी वाजवायचा. पिंजऱ्यात बोट घातलं की बोटावर येऊन बसायचा. आम्ही बरीच वर्ष घरात फिश टँकही ठेवला होता. माशांच्या हालचाली पाहाणं हा सुंदर विरंगुळा होता. 

मांजरांनंतर आमचा कुठलाही प्राणी न सांभाळायचा निश्चय फार काळ काही टिकला नाही. आमच्या आयुष्यात एका खारुताईनं शिरकाव केला. ती कुठून तरी जखमी होऊन आली होती. तिला बरं केलं आणि झाडावर सोडून दिलं. पण परत ती फिरून आमच्याकडे आली. कदाचित ती निसर्गात राहाण्यास घाबरू लागली असावी. झालं! आम्ही तिचंही स्वागत केलं. तिला एका बास्केटमध्ये घर करून दिलं. तिची जबाबदारी पूर्णपणे माझ्या भावानं आणि त्याच्या मुलीनं घेतली होती. तिला ते बास्केटमधून गावीही घेऊन गेले होते, कारण त्यांना तिला एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. तिला बास्केटमधून बाहेर काढलं, की ती भावाच्या खांद्यावर बसून फिरत राहायची. कालांतरानं तिनंही भावाला खूप लळा लावून आमचा सर्वाचा निरोप घेतला. 

Advertisement

 नंतर भावाच्या मुलानं आणि त्याच्या बायकोनं एक ‘जर्मन शेफर्ड’ कुत्री सांभाळली आहे. ती ‘डोरा’. डोरा अतिशय देखणी, प्रेमळ आणि बुद्धिमान आहे. आम्ही तिच्याशी काहीही बोलू लागलो, की तिचे कान आणि डोळे फिरत राहतात! आइस्क्रीम हा तिचा वीक पॉइंट! तिला लहानपणापासून माझ्या भाच्यानं कारमधून फिरायला शिकवलं आहे आणि तसं फिरायला तिला खूप आवडतंही. तिला ते खूप लांब फिरायला नेतात. तिला नैसर्गिक विधींसाठी नेणं हा एक कार्यक्रमच असतो. तो सर्व भाग भाऊ सांभाळतो. तिला खायला लावणं हा एक दुसरा मोठा कार्यक्रम! कारण ती खाताना तिच्याशी बोलत बसावं लागतं! दही-भात तिचा आवडता. जेव्हा भावाची सून घरी असते, तेव्हा ती तिच्या खाण्याकडे लक्ष देते. माझी वहिनी प्रथम डोराला खूप घाबरायची; पण नंतर तिचीही तिच्याशी मैत्री झाली. डोराला पाण्यात खेळायला आणि आंघोळ करायला खूप आवडतं. माझ्या आईलाही तिची भीती वाटायची, पण तिच्या मऊशार केसांवरून हात फिरवायला तिला फार आवडायचं. माझ्या बहिणीकडे असाच कुणी तरी सांभाळलेला कुत्रा सोडून गेलं होतं. तोही तिच्या खाऊ वगैरे घालून जीव लावण्यानं घराचा कधी सदस्य झाला हे कळलंच नाही. त्याला पेढा खूप आवडायचा. त्याचं कालपरत्वे आजारानं निधन झालं.

  आमच्याकडे कावळे आणि केकाटी नावाचा पक्षीसुद्धा चपाती खायला यायचे, तेसुद्धा ठरावीक वेळी. त्यांना शिळी चपाती आवडायची नाही! ते पावसात नाही येऊ शकले तर आम्हालाच चुकल्या चुकल्यासारखं व्हायचं. मध्यंतरी आम्ही घर बदललं आणि बहिणीनं तिच्या परसात येणाऱ्या मन्यांना दूध घालण्यात जीव गुंतवला आहे.

Advertisement

    मांजर-कुत्रा हे प्राणी आपल्यासाठी ‘स्ट्रेस बस्टर’सारखं काम करतात. मला आठवतं, एकदा ‘संजय गांधी उद्याना’त दुपारच्या वेळी निवांत झोपलेला सिंहराज जवळून बघायला मिळाला होता. अर्थात बऱ्याच वर्षांपूर्वी. आता उद्यानाचे नियम खूप बदलले आहेत; पण ते चित्र मला आजही स्मरतं. त्याच्या देखणेपणाचं वर्णन करावं तेवढं थोडंच! अजूनही कुठे मनीमाऊ दिसली, जवळ आली, तर तिच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय जिवाला बरं वाटत नाही. आजही पाऊस येण्याआधी कोकिळेची मंजूळ शीळ कान तृप्त करते. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर फिरणारे मनीमाऊ, कुत्रा, वन्यप्राणी यांचे लाडिक व्हिडीओ जिव्हाळय़ाचा विषय असतात. खरं तर ‘जिवो जीवस्य जीवनम्’ हा निसर्गनियम आहे हे खरं, पण शैक्षणिक वाहिन्यांवरच्या कार्यक्रमांमध्ये सिंह-वाघ जेव्हा हिंस्र होतात, झेप घालून भक्ष्य पकडतात, तेव्हा मात्र मी तो कार्यक्रम पाहू शकत नाही! असो!

 पाळीव प्राण्यांसाठी आपण कुणी तरी मोठे, महत्त्वाचे, प्रेमाचे आहोत, ही जाणीव ते बरोबर असताना प्रत्येक क्षणी होत असते. आमचं प्राणिप्रेमही चार माणसांसारखं स्वाभाविक होतं आणि आहे. मात्र आमच्या ओळखीच्या झालेल्या प्राण्यांनी त्या बदल्यात आमचं घर कायमच चैतन्यानं भरून टाकलं. असे हे आमचे सर्व सगेसोयरे! ते आमचं आयुष्यच होते, आहेत आणि असणारही आहेत!

Advertisement

npshere@gmail.comSource link

Advertisement