पुणे10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी माणसाच्या भावस्पर्शाची जागा ते घेऊ शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्र अत्याधुनिक होत असले, अनेक उपचार सुलभ होत असले, तरी डॉक्टरांच्या हाताचा स्पर्श रुग्णांना दिलासादायक असतो. त्यामुळे डॉक्टरांनी नवतंत्रज्ञानाचा अंगीकार करत आपल्याला वैद्यकीय सेवेला अधिक व्यापक करायला हवे असा सूर राष्ट्रीय परिषदेत उमटला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च यांच्यातर्फे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तत्रंज्ञानाचा वैद्यकशास्त्रावर होणार परिणाम’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांना सन्मानित करण्यासाठी ‘सूर्यदत्त धन्वंतरी राष्ट्रीय पुरस्कार 2023’ सोहळ्याचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती आणि योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण गंगवाल यांच्या हस्ते डॉक्टरांना धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. संचेती यांना ‘सुर्यरत्न-द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-2023’ पुरस्कार, तर डॉ. विनोद आणि डॉ. गंगवाल यांना ‘सूर्यभूषण ग्लोबल अवॉर्ड 2023’ प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, अंकित नवलाखा, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ. शुभदा जोशी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिकेत जोशी, डॉ. सुरेश शिंदे व डॉ. पुष्कर खेर यांनी चर्चासत्रामध्ये आपले विचार मांडले.
डॉ. संचेती म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांचा कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. एका रुग्णाच्या वेदना आणि त्याला होणारा त्रास फार काळ लक्षात ठेवता कामा नये. कारण बाकीच्या रुग्णांवरही त्याच ओलाव्याने उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला अत्यंत सकारात्मकपणे भेटणे आवश्यक असते. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, तरी डॉक्टर-रुग्णांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावा कायम राहायला हवा. प्रामाणिक व सचोटीने रुग्णसेवेचा वसा जपला पाहिजे. डॉक्टरांनी माणुसकीचे काम केले तर पुढील पिढ्यांसाठी एक आशादायक जग निर्माण होईल.
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, ज्याप्रमाणे आई आपल्या पाठीवरून मायेने हात फिरवते, तसाच रुग्णांसाठी डॉक्टरांचा दिलासादायी स्पर्श असतो. त्यामुळे ‘एआय’चा वापर वाढला, तरी भावनिक स्पर्शाची अनुभूती त्याच्याकडून मिळणार नाही. त्यासाठी देवरूपी डॉक्टर हवाच आहे. समाजातील त्यांची आवश्यकता कायम राहणार आहे. माणसाला आयुष्य जगण्यासाठी माणुसकीचे नाते अपरिहार्य असते.