औरंगाबाद5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यात संकल्पना- सक्षमतेवर आधारित प्रश्न, बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा प्रश्नपत्रिकेत समावेश केला आहे. हा बदल नवीन शैक्षणिक धोरणनुसार करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी हा झालेला बदल सरावासाठी संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला असून, या बदलानुसार आता विद्यार्थ्यांना पूर्वी 25 टक्के प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरुपात होते. त्यात बदल करत ते 40 टक्के वस्तुनिष्ठ स्वरुपात करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई बोर्डाच्या वतीने दहावी – बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्या अनुषंगाने वेळापत्रकही जाहिर करण्यात आले आहे. तर आता नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यामुळे येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या बदलांविषयीची माहिती सीबीएसईने शाळांना पत्राद्वारे कळवली आहे. या बदलानुसार आता प्रश्नपत्रिकेत अधिक विश्लेषणात्मक, संकल्पनात्मक, स्पष्टता विशद करणारे तसेच विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण बौद्धिक आकलन तपासणाऱ्या बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न विचारले जातील. त्यात ५० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित म्हणजे विश्लेषणात्मक प्रकारचे प्रश्न असतील. तर ४५ टक्के बहुपर्यायी प्रश्न दोन अथवा एक गुणांसाठीचे असतील. बदलेल्या स्वरुपाची विद्यार्थी, शिक्षक, पालकांना माहिती होण्यासाठी विविध विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप https://cbseacademic.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. असे तज्ज्ञांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी फायदा
दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. परंतु हा बदल याच शैक्षणिक वर्षातील परीक्षेपासून असेल की नाही. याबद्दल स्पष्ट करण्यात आलेली नाही. हा बदल नवीन शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आला आहे. पूर्वी २५ टक्के प्रश्न हे वस्तुनिष्ठ होते. ते आता ४० टक्के करण्यात आले आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना जेईई, नीट अथवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे. – गणेश तरटे क्लोव्हरडेल स्कुल प्राचार्य