सिल्लोडकाही सेकंदांपूर्वी
- कॉपी लिंक
सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मराठा आरक्षणासाठी अधिकच आक्रमक झाले असून,आज सोमवार रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात पिठलं भाकर आंदोलन करण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करीत सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मागील आठ दिवसांपासून विविध आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज सोमवारी (दि.11) सकाळी दहा वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयाच्या आवारात मराठा समाज बांधवांनी ठिय्या मांडलेला होता. या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी पिठलं भाकरी बनवून आंदोलन केले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनात तहसील कार्यालयाच्या आवारातच चूल पेटवून स्वयंपाक करण्यात आला.
याप्रसंगी मराठा बांधवांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या व मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा दिला. आजच्या आंदोलनानंतर मराठा समाज बांधवांचे हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
मंगळवारी रास्ता रोको आंदोलन
मंगळवारी सकाळी दहा वाजता सिल्लोड कन्नड रस्त्यावरील धानोरा फाटा येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको, तिरडी व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी सिल्लोड तालुक्यातील जास्तीत जास्त सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माधवराव काकडे यांनी केले आहे.