अहमदनगर4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
केडगाव उपनगरातील हजारो मालमत्ताधारकांची नावे प्रॉपर्टी कार्डवरून गायब झाली आहेत. जर नागरिकांची पिळवणूक महसूल विभागाच्या सिटीसर्व्हे कार्यालयाने थांबवली नाही, तर काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
महसूल विभागाच्या पळवणुकीला कंटाळून संतप्त झालेल्या नागरिकांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता. काळे यांनी गुरुवारी रात्री केडगाव परिसरात भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली. यापाश्वभूमीवर शुक्रवारी दुपारी काळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काळे म्हणाले, महसूल मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना निवेदन दिले जाणार आहे. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात ही दुरावस्था असून स्वकष्टाने कमावलेल्या मालमत्तेसाठी नागरिकांना प्रशासकीय यंत्रणेच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तक्रारीची प्रकरणे २१ दिवसांत निकाली काढावी, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील तीन महिन्यात सर्व मालमत्ताधारकांच्या नोंदी अद्यावत करण्यात याव्यात. तातडीची प्रकरणे 21 दिवसात निकाली न काढल्यास काँग्रेससह कृती समिती आक्रमक होत रस्त्यावर उतरेल.
महसूल मंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचे आता नगर शहरात शासकीय कार्यालय देखील आहे. वेळप्रसंगी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कार्यालया समोर काँग्रेसच्या वतीने उपोषणाला बसण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात मालकी हक्क बचाव कृती समिती काळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केल्याची माहिती दिली.
काय आहेत अडचणी ?
जानेवारी 2022 पासून केडगावच्या तलाठी कार्यालयाने सातबारे उतारे देणे बंद केले आहे. सर्व रेकॉर्ड सिटी सर्व्हे कार्यालयास हस्तांतरित केले. मात्र या कार्यालयाने कोणत्याच रेकॉर्डच्या नोंदी अद्यावत केलेल्या नाहीत. त्यामुळे जुन्या मालकांची नावे उताऱ्यावर आहेत. त्यामुळे वारस नोंद लागत नाही. मोजणी नकाशे मिळत नाहीत. अशा अनेक बाबींवर काँग्रेसने बोट ठेवले.
केडगावचे 186 खातेदार बाधीत
केडगाव मधील सर्व्हे क्रमांक 424 व 426 मधील सुमारे 186 खातेदार बाधित आहेत. त्यात सुमारे 800 भूखंडधारकांना अडचणी येत आहेत. वारंवार हेलपाटे मारूनही प्रश्न सुटत नसल्याचे उपस्थित नागरिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षादेशाचे पालन करणार
नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत विचारले असता, किरण काळे यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून केले जाईल. पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले जाणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आमदार बाळासाहेब थोरात हे शस्त्रक्रियेमुळे मुंबईत रुग्णालयामध्ये आहेत. ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत, असे सांगितले.