नागपूर13 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार त्यांच्या समर्थकांसह दिल्लीत दाखल झाल्याचे समजते. पटोलेंच्या कार्यपद्धतीवरून वडेट्टीवार आणि केदार व त्यांचे समर्थक नाराज आहेत. नितीन राऊतही त्यांच्याशी फटकून वागतात. नुकतेच निलंबित केलेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी तर पटाेलेंना मुख्यमंत्र्यांकडून खोके येतात असा आरोप केला होता. कर्नाटक निवडणुकीनंतर पटोलेंचे सिंहासन काढून घेण्याचे संकेत श्रेष्ठींनी दिले होते. त्यामुळे त्यांचे विरोधक सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत वडेट्टीवार समर्थकांची पटोलेंविरुद्ध नाराजी दिसून आली. दुसरीकडे, केदार यांच्याशीही पटोले यांचे मतभेद आहेत. काँग्रेस आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, केदार, वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय स्थिती व संघटनात्मक कार्यपद्धतीची माहिती दिली. सोनिया गांधीची भेट होऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे.
काय सांगितले नाना विरोधकांनी : महाराष्ट्रावर आता लक्ष न दिल्यास दोन प्रादेशिक पक्षांमुळे पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा धोका या नाना विरोधक नेत्यांनी श्रेष्ठींकडे व्यक्त केला. राज्यात पक्षाची व्होट बँक हळूहळू संपुष्टात येत आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे संघटनात्मक दृष्टीने आताच ठोस पावले उचलण्यात यावी, अशी भूमिकाही शिष्टमंडळाने मांडली.
काँग्रेस कार्यसमितीची येत्या ८-१० दिवसांत रचना करण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रात “ऑपरेशन’ करण्याचे संकेत दिल्लीतील बड्या नेत्यांनी दिल्याचे कळते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरातही अलिप्त असल्यासारखे आहेत. या नेत्यांना सक्रिय केल्यास लाभ होईल, असेही असंतुष्टांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधींशी चर्चेनंतर नानांविषयीचा निर्णय होणार आहे.
माझ्याबद्दल नानांच्या मनात द्वेष असावा, अमित शाहांना भेटणार : देशमुख
दरम्यान, काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनीही पटोलेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपची खासदारकी सोडून नाना काँग्रेसमध्ये आले. त्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष असावा. मी काँग्रेसमध्ये राहूच नये म्हणून नोटिसीला समाधानकारक उत्तर देऊनही मला पक्षातून बडतर्फ करण्यात आले. माझ्याकडे सरचिटणीस पद होते. मी प्रदेश पार्लमेंटरी बोर्डावर होतो. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राज्याची शिस्तपालन समिती माझ्यावर बडतर्फीचा निर्णय घेऊ शकत नाही. तो अधिकार अखिल भारतीय समितीला आहे. या बडतर्फीच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात दाद मागायची का, हे ठरवावे लागेल. एखाद्या पक्षाच्या संविधानाला कोर्टात आव्हान देता येते. कोर्टाने जर हा बडतर्फीचा निर्णय अमान्य केला तर एक चांगली चपराक या लोकांना बसू शकते, असे देशमुखांचे म्हणणे आहे. मी भाजपच्या वाटेवर नाही, असे म्हणणाऱ्या देशमुख यांनी आपण लवकरच अमित शाहांना भेटणार असल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले.