वर्धा26 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या आठ दिवसांनी वर्ध्यातील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर होत आहे. याकरिता राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, महामंडळाने आज विदर्भ साहित्य संघाला २५ लाखांचा निधी सुपूर्द केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान वर्धेत होत असून संमेलनासाठी ५ कोटींचा खर्च लागणार असा अंदाज समितीकडून व्यक्त केला जात आहे. या संमेलनाकरिता राज्य शासनाच्या वतीने ५० लाखांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. २५ जानेवारी रोजी मुंबई येथील साहित्य महामंडळाला सांस्कृतिक विभागाने ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. पैकी २५ लाख रुपये नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाला सुपूर्द करण्यात आले आहेत. उर्वरित २५ लाख रुपये संमेलन सुरू होण्याआधी मिळणार असल्याची माहिती विदर्भ साहित्य संघाचे तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप दाते यांनी दिली.